एकाच कंपनीच्या १६ दुचाकी जप्त
पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वारंवार चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. अशाच प्रकारच्या दुचाकी चोरी करणाऱ्या तीन जणांना जणांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहरातील विविध भागातून या चोरट्यांनी चोरलेल्या तब्बल १६ आर एक्स १०० या यामाहा कंपनीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी पोलीसांनी तब्बल ४४० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत.
आरोपी आदित्य मानकर (वय १९, रा. उरुळी कांचन, पुणे), मयूर पवार (वय २०, उरुळी कांचन, पुणे) आणि अन्य एक जण अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेकदा वाहन चोरीच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार विश्रामबाग पोलीस यावर काम करत होते. उरळीकांचन परिसरात रात्रीच्या वेळी मोटर सायकल चोरी करून जात असल्याचे पोलिसांना त्यांच्या बातमीदाराच्या मदतीने माहिती मिळाली होती. त्यानुसार सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा तपास सुरू होता.
या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी केलेला तपासामधून चोरीच्या तब्बल ४ लाख ५० हजार किमतीच्या १६ दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्यांबाबत अधिक तपास केला असता त्यांच्यावर याआधी असलेले १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती विश्रामबाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने व पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.