कार अपघाताच्या तक्रारीसाठी मागितली १३ हजाराची लाच, ३ पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले रंगेहात
कारच्या अपघाताची तक्रार लाखल करण्यासाठी पोलीस हवालदाराने तब्बल १३ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच मागणाऱ्या तीन पोलीस हवालदारांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. हा प्रकार पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात घडला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित यांना अटक करण्यात आली आहे. तर रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदारांची नावे जयराम सावलकर आणि विनायक मुधोळकर अशी आहेत. या तीघांनी तक्रारदाराकडे कार अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच मागितली होती.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून आहे. त्यांच्या कारच्या अपघात झाला होता. या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस हवालदार जयराम सावळकर, विनायक मुधोळकर, राजेंद्र दीक्षित यांनी सुरूवातीला २० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम येरवडा पोलीस ठाण्यात स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीघांनाही रंगेहात पकडले आहे. यातील राजेंद्र दीक्षित यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन जणांवर येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.