वर्षभर पाणीबाणी, सोसायट्यांचा टाहो

बारमाही पाणीटंचाईला तोंड देत असलेल्या नऱ्हे आंबेगाव, वाघोली, बावधन, पाषाण-सूस रोड आणि बालेवाडी परिसरातील अनेक गृहसंस्थांची अवस्था उन्हाळ्यानंतर पावसाने ओढ दिलेल्या जून महिन्यात अधिकच बिकट झाली आहे. या पाणीबाणीला वैतागून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील १०० गृहनिर्माण संस्थांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे धाव घेत आम्हाला पाणी देण्याची मागणी केली आहे. यातील ८९ गृहसंस्था या एकट्या पुणे शहरातील आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 24 Jun 2023
  • 12:23 am
वर्षभर पाणीबाणी, सोसायट्यांचा टाहो

वर्षभर पाणीबाणी, सोसायट्यांचा टाहो

शहरातील ८९ गृहसंकुलांची ग्राहक पंचायतीकडे धाव, नऱ्हे आंबेगाव, वाघोली, बावधनमधील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये बारमाही टॅंकर

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

बारमाही पाणीटंचाईला तोंड देत असलेल्या नऱ्हे आंबेगाव, वाघोली, बावधन, पाषाण-सूस रोड आणि बालेवाडी परिसरातील अनेक गृहसंस्थांची अवस्था उन्हाळ्यानंतर पावसाने ओढ दिलेल्या जून महिन्यात अधिकच बिकट झाली आहे. या पाणीबाणीला वैतागून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील १०० गृहनिर्माण संस्थांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे धाव घेत आम्हाला पाणी देण्याची मागणी केली आहे. यातील ८९ गृहसंस्था या एकट्या पुणे शहरातील आहेत.

धरण पाणलोट क्षेत्रात पावासाने अजूनही पाठ फिरवली आहे. पाऊस लांबण्याची चिन्हे असल्याने शहरात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. नऱ्हे आंबेगाव, वाघोली, बावधन, पाषाण-सूस रोड आणि बालेवाडी परिसरातील अनेक गृहसंस्थांना बारमाही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी दरमहा लाखो रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शंभर गृहसंस्थांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे ‘आम्हाला पाणी द्या,’ अशी कळकळीची मागणीवजा विनंती केली आहे.  

पुणे शहराला खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २९.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. खडकवासला प्रकल्पातून शहराला २१ टीएमसी पाणी मिळते. येरवडा परिसरातील काही भागासाठी भामा आसखेडमधून पाणी घेतले जाते. पुणे शहर पूर्वेकडे वाघोली, दक्षिणेकडे नवीन कात्रज बोगदा, नऱ्हे आंबेगाव, किरकटवाडीकडे पसरले आहे. बावधन, पाषाण, बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. मात्र, इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच झालेली नाही.

पॉश इमारती दिसत असल्या तरी येथील नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासारखी प्राथमिक गरजही पूर्ण होऊ शकत नसल्याने काही गृहसंस्थांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे यापूर्वीच ठोठावले आहेत, तर, काही गृहसंस्थांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला यात मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ८९ गृहनिर्माण संस्थांनी आम्हाला पाणी मिळत नसल्याचे सांगितले आहे, तर कल्याण, विरार, पालघर, बदलापूर, डोंबिवली, पनवेल येथील ११ गृहसंस्थांनीदेखील अशीच लेखी तक्रार ग्राहक पंचायतीकडे केली आहे.

‘‘पुणे शहरातील नऱ्हे, आंबेगाव, वाघोली, बावधन, पाषाण आणि सूस रोड परिसरात पाणीप्रश्न अत्यंत तीव्र आहे. बाहेरून सोसायट्या पॉश दिसत असल्या तरी त्यांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागते. अनेक गृहसंस्थांना काही लाखांपासून ते तीन कोटी रुपयांचा वार्षिक खर्च पाण्यावर करावा लागत आहे. समाविष्ट गावे आणि उपनगरातील पाणी पुरवठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणी पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली. त्यांच्यासमोर गृहनिर्माण संस्थांचा प्रश्न मांडला आहे. संघटनेकडे पुणे शहरातील ८९ गृहसंस्थांनी तक्रार केली आहे. तक्रार न केलेल्या गृहसंस्थांची संख्या कितीतरी अधिक असेल. या सर्व तक्रारींचा अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहोत,’’ अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक विजय सागर यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

बालेवाडी येथील एसेन्शिया गृहसंस्थेचे सदस्य किरण बुधले म्हणाले, ‘‘म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोर आमची सोसायटी आहे. या सोसायटीत २१६ सदनिका आहेत. आम्हाला २०१६ पासून पाणी विकत घ्यावे लागत आहे. दररोज १५ टँकर पाणी लागते. त्यासाठी दरमहा साडेचार लाख रुपयांचा खर्च येतो. पाण्यावर बराच खर्च असल्याने प्रत्येक सभासदाकडून देखभाल खर्चापोटी दरमहा साडेतीन हजार रुपये आकारावे लागतात. मात्र, आता ही रक्कम अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे गृहसंस्थेच्या अगामी सर्वसाधारण बैठकीत देखभाल खर्चाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवावा लागणार आहे.’’

बावधनमधील स्टारगेज सोसायटीतील रहिवासी कृणाल घारे म्हणाले, ‘‘मी २०१८ पासून या संकुलात राहायला आहे. तेव्हापासून आणि त्यापूर्वीही इथे टँकरनेच पाणीपुरवठा होतो. आमच्या सोसायटीत ५०० सदनिका आहेत. एक वर्षात ही संख्या ९०० वर जाईल. आता आम्हाला दरमहा पाण्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च येतो. बावधन परिसरातील किमान ३ हजार सदनिकाधारकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story