यंदा रंगणार तृणधान्यांच्या हुरडा पार्ट्या

गुलाबी थंडीत शेकोटीची उब घेत जोडीला चटकमटक चवीचा हुरडा, दुपारच्या जेवणाला चुलीवरचे गरमागरम जेवण आणि ऊन मावळतीला शेतात फेरफटका ही दरवर्षीच्या ‘हुरडा पार्ट्यां’ची वैशिष्ट्ये. यंदा मात्र आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच हुरडा महोत्सव साजरा करीत आहे. पौष्टिक तृणधान्याचे खाद्यपदार्थ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या उपाहारगृहांमध्ये उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हुर्डा

हुर्डा

'एमटीडीसी'च्या रिसॉर्टमध्ये आयोजन; उपाहारगृहांमध्येही पौष्टिक तृणधान्यांचे पदार्थ पर्यटकांना उपलब्ध करून देणार

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

 

गुलाबी थंडीत शेकोटीची उब घेत जोडीला चटकमटक चवीचा हुरडा, दुपारच्या जेवणाला चुलीवरचे गरमागरम जेवण आणि ऊन मावळतीला शेतात फेरफटका ही दरवर्षीच्या ‘हुरडा पार्ट्यां’ची वैशिष्ट्ये. यंदा मात्र आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच हुरडा महोत्सव साजरा करीत आहे. पौष्टिक तृणधान्याचे खाद्यपदार्थ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या उपाहारगृहांमध्ये उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

यंदाच्या हुरड्यात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करण्यात आला असून, यात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या पिकांचा समावेश आहे. ही पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन यासारख्या सूक्ष्म पोषक घटकाने समृद्ध आणि ग्लुटेनमुक्त आहेत. तसेच, मधुमेह, हृदयविकार, ॲनिमिया, उच्च रक्तदाबरोधक आहेत. यंदापासून या पिकांचे लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून राबविण्यात येत आहेत .

एमटीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, सर्व उपाहारगृहांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांच्या विविध आणि रुचकर पाककृती तयार करून त्यांचा समावेश 'आरोग्यदायी पदार्थ' या सदराखाली मेन्यू कार्डमध्ये करण्यात आला आहे. इडली, डोसा, उत्तप्पा, धिरडे, खिचडी, बिस्किट, केक, मोदक, भाकरी, पापड, लाडू, उपमा आदी तृणधान्यापासून तयार होणाऱ्या स्थानिक पदार्थांचा मेन्यूत समावेश करण्यात आला आहे. हा पौष्टिक तृणधान्याचा मेनू पर्यटकांना वर्षभर उपाहारगृहात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पर्यटक निवास आणि उपाहारगृहाच्या दर्शनी भागात पौष्टिक तृणधान्य पदार्थ उपलब्धतेबाबत व त्यांच्या आहारमूल्याबाबत फलक लावण्यात आले आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने विविध पर्यटक निवास केंद्रांत हुरडा महोत्सवाचे (ज्वारी) आयोजन करण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, "हुरडा महोत्सवाचे आयोजन ३१ जानेवारी ते १  फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. स्थानिक शेतकरी ते थेट पर्यटक अशा संकल्पना राबविणे, कृषी महाविद्यालयांशी समन्वय साधून महामंडळाच्या मोकळ्या जागेमध्ये शक्य असेल त्या ठिकाणी पौष्टिक तृणधान्याची लागवड करणे. स्थानिक 

शेतकऱ्यांशी समन्वय साधून महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांची फार्म टूर आयोजित करणे, अशा संकल्पना अमलात आणून पर्यटकांना आरोग्यदायी पर्यटन घडवून आणावे, अशा सूचना व्यवस्थापकीय संचालकांनी दिल्या आहेत.''  

हरणे म्हणाले, "महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या निवास व न्याहारी व महाभ्रमण योजनाधारकांना त्यांच्या युनिटमध्ये तृणधान्याचे पदार्थ पर्यटकांना उपलब्ध करून देण्याबाबत तसेच तृणधान्याचे माहिती फलक लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. महामंडळाचे सर्वच पर्यटक निवासस्थान हे निसर्गरम्य परिसरात, डोंगररांगामध्ये, ऐतिहासिक आणि जागतिक वारसा स्थळांच्या ठिकाणी आहेत. पर्यटनाबरोबरच निसर्ग, पर्यावरण आणि आरोग्य यांची काळजी महामंडळाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे या वर्षी पर्यटकांना जबाबदार आणि आरोग्यदायी पर्यटन घडवून आणण्यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे.  

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story