नालायक
तन्मय ठोंबरे/ नितीन गांगर्डे
कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे शहरात नदीकाठसुधार प्रकल्प राबवला जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील पावसाळी नाले, ओढे, झरे यावर कचऱ्याचे ढीग, राडारोडा टाकून आणि त्यांच्यावर अतिक्रमण करून ते बुजवले जात आहेत. प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.
शहरातील जवळपास सर्वच पावसाळी नाल्यांवर अतिक्रमण झाल्याची वस्तुस्थिती आहे. सन २००० पर्यंत या नाल्यांमध्ये स्वच्छ पाणी होते आणि त्यात मासे दिसायचे अशा आठवणी नागरिक सांगतात. मात्र, त्यांची आजची अवस्था अत्यंत बिकट आहे. पाण्याचा स्रोत असलेल्या नाल्यांच्या आज केवळ मोठ्या कचराकुंड्या झालेल्या दिसत आहेत. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर हे नैसर्गिक जलस्रोत अतिक्रमणात नामशेष होण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या विविध भागातील पावसाळी नाल्यांमध्ये कचऱ्याचे आणि राडारोड्याचे ढीगच्या ढीग पडलेले आहेत. त्यामुळे हे पावसाळी नाले संपुष्ठात येत असल्याची स्थिती आहे. 'सीविक मिरर'ने शहरातील पावसाळी नाल्यांची पाहणी केली. त्यामध्ये सर्वच नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे आढळून आले. पुणे शहर परिसरात सुमारे साडेतीनशे किलोमीटर लांबीचे ओढे, पावसाळी नाले वाहात आहेत. त्यांची कमालीची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून या नाल्यांची स्वच्छता झाल्याचे दिसून येत नाही.
नगर रस्त्यावरील रामवाडीच्या बाजूला असलेल्या ओढ्यामध्ये मोठा जाहिरात फलक लावला आहे. तेथे फरशीच्या तुकड्यांचा डंपर ओढ्यात रिकामा केलेला दिसतो. त्यामुळे ओढ्याची रुंदी कमी झाली असून, आता पावसाळ्यात पाणी वाहण्यास अडथळा येत आहे. अशाप्रकारे फरशीचे तुकडे टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करायला हवी. अशा लोकांकडून स्वच्छतेचा किंवा राडारोडा उचलण्याचा खर्च वसूल करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. वानवडीतील नाल्यात मुरमाचे ढीग टाकून त्यावर झाडे लावली आहेत. उंड्रीतील भिंताडे वाडीमध्ये असलेल्या ओढ्यात कचरा आणि राडारोडा यांचे ढीगच्या ढीग पडलेले आहेत. तसेच, सुरक्षा भिंत ओढ्यात कोसळल्याचे दिसते. एन. आय. बी. एम. रस्त्याच्या भागात अनेक ठिकाणी बांधकाम चालले आहे. त्या कामाचा राडारोडा या नाल्यात टाकला जात आहे.
कडनगर येथील नाल्यात कचऱ्याचे ढीग तर आहेतच, परंतु येथे मच्छी मार्केट असल्याने दुकानदार ग्राहकांना मासे स्वच्छ करून विकतात. त्यात माशांच्या शरीरावरील टरफले, उरलेले शिल्लक मांस आदी घाण तशीच बिनदिक्कतपणे नाल्यात टाकली जाते. उन्हामुळे अनेक पक्षी पाण्याचा शोध घेत पाणी पिण्यासाठी येतात. मात्र, त्यांना नाल्यातील घाणेरडे आणि विषारी पाणी प्यावे लागत आहे. हडपसर परिसरातील भुजबळनगर येथील नाल्यात मुरुम टाकून वाहने लावण्यासाठी पार्किंग तयार करण्यात आले आहे, तर शेलारवाडी असेंन्ट इंटरनॅशल स्कूलच्या जवळ असलेल्या नाल्यात भंगारातील वाहने टाकलेली दिसतात. खराडी येथील नाल्यात राडारोडा, कचरा आणि होर्डिंग आहेत. महंमदवाडी येथील एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या शेजारी नाला बुजवला आहे. सिरम इन्स्टिट्यूट जवळील नाल्यात अनेक काटेरी रानटी झाडे, झुडपे, गचपण, कचऱ्याचे ढीग झालेले आहेत.
शहरातील सर्वच नाले अशाप्रकारे कचऱ्याने भरले आहेत. त्यात प्लास्टिकचे प्रमाण प्रचंड आहे. नाल्यात पाणीच दिसत नाही इतके कचऱ्याचे प्रमाण आहे. पावसाळा तोंडावर आला, तरीही नाले बुजलेलेच आहेत. काही ठिकाणी बाजूच्या रहिवाशांनी नाल्यात घरातील सांडपाणी सोडलेले दिसते. अनेक नाल्यांवर ठिकठिकाणी केबलचे पाईप असून, त्यात कचरा अडकत आहे. काही ठिकाणी बेकायदा बांधकामामुळे नाले आक्रसले आहेत. यामुळे पाण्याची वाट अडवली जाते. साहजिकच पावसाळ्यामध्ये हे पाणी बाहेर पडते आणि रस्त्यावर पसरते, तर काही ठिकाणी रहिवाशांच्या घरांत शिरते. सभोवताली टाकला जाणारा कचरा घेऊन वाहणारा नाला अशीच त्यांची स्थिती झाल्याची पाहावयास मिळते.
तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
'नाल्यातील गाळ अनेक वर्षे झाली उपसला गेलेला नाही. त्यामुळे हे नाले अरुंद होऊन पावसाळ्यात त्याचे पाणी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या घरात शिरते. वेळोवेळी महानगरपालिकेला याबाबत अर्ज केले. तरीही गाळयुक्त ओढ्यांकडे प्रशासन डोळेझाक करत आहे', असे आशिष मेहता यांनी सांगितले. दरवर्षी दुरुस्ती, डागडुजी, काँक्रिटीकरणाच्या नावाखाली निविदा काढून ठराविक ठिकाणीच थातूरमातूर दुरुस्ती केली जाते. ती प्रत्यक्षात कमी अन् कागदावरच जास्त असते. पाण्याऐवजी प्लास्टिक कचऱ्याने नाले दुथडी भरून वाहतात. प्रत्येक नाल्याजवळ दुर्गंधीचे साम्राज्य आहे. नाल्यांची अतिशय गंभीर अवस्था पाहता दरवर्षी स्वच्छतेसाठी दिला जाणारा पैसा जातो कुठे, असा प्रश्न आमच्यासारख्या नागरिकांना पडतो', असेही ते म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.