कार्यकर्त्यांना हवे 'उद्धव+राज'

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही उभी फूट पडल्याने राज्यातील राजकीय स्थिती चमत्कारिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची साद घातली आहे. पुण्यामध्ये तसे फलकही झळकले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 8 Jul 2023
  • 10:08 am
कार्यकर्त्यांना हवे 'उद्धव+राज'

कार्यकर्त्यांना हवे 'उद्धव+राज'

राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीमुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यात पोस्टरबाजी

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही उभी फूट पडल्याने राज्यातील राजकीय स्थिती चमत्कारिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची साद घातली आहे. पुण्यामध्ये तसे फलकही झळकले आहेत.  

गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रातील राजकीय पटलावर उलथापालथ होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतले. सेनेच्या आमदारांना गुवाहाटीला ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस काम करू देत नाही, अजित पवार निधी अडवतात असे आरोप करून शिंदे गट बाहेर पडला. महाराष्ट्राच्या विकासासाठी बंड केल्याचे सांगितले गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राष्ट्रवादीसोबत कधीही जाणार नाही, असे वक्तव्य केले होते. शिंदे गटाला भाजपने बरोबर घेऊन नुकतेच वर्ष पूर्ण केले आणि त्यानंतर अजित पवार यांना चाळीस आमदारांसह गटात ओढून घेतले. त्यानंतर पवार समर्थकांनीही महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारमध्ये सामील झाल्याचे सांगितले.

या विचित्र राजकीय उलथापालथीमुळे शिवसैनिक आणि मनसैनिक आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन करीत आहेत. मुंबई, नाशिक आणि पुण्यात कार्यकर्त्यांनी तसे फलक लावले आहेत. पुण्यातील स. प. महाविद्यालय चौक, शिवणे आणि कर्वेनगर परिसरात असे फलक मनसैनिकांनी लावले आहेत. 'तुम्ही एकत्र आल्यास महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन येईल', असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. अखंड महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी साद घालण्यात आली आहे. 'राज साहेब-उद्धव साहेब, हीच ती वेळ', असे फलकावर दिसत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसोबत राज आणि उद्धव यांची प्रतिमा पोस्टरवर दिसत आहेत.

 मनसैनिक रवी सहाणे सीविक मिररशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः चिखल झाला आहे. त्या विरोधात जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आम्हाला अनेक नागरिक भेटत असतात. आता ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी इच्छा ते आमच्याजवळ व्यक्त करत आहेत. दोघे एकत्र आले तरच काही तरी होईल. अन्यथा महाराष्ट्राचे काही खरे नाही, असे आता लोक म्हणू लागले आहेत. तीच भावना आम्ही बॅनरच्या माध्यमातून मांडली आहे. केवळ पुण्यातच नाही, तर मुंबई आणि नाशिकमधील कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. इतर ठिकाणीही फारसा फरक नसेल.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले, शिवसेना आणि मनसेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त होत आहे. सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडेही अशी भावना व्यक्त केली आहे. ही भावना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहचवणार आहोत. मात्र, अंतिम निर्णय उद्धव साहेबच घेतील.

मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे याबाबत माझ्याकडे कोणत्याही पदाधिकाऱ्याने इच्छा व्यक्त केलेली नाही. मात्र, याबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे हेच निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयाप्रमाणे काम करू.      

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story