मुलीचा विनयभंग करणाऱ्या प्रियकरासह महिलेचे पलायन
नितीन गांगर्डे
एका विवाहित महिलेच्या प्रियकरानेच तिच्या मुलीचे लैंगिक शोषण केले. त्याबद्दल त्याला खडसावण्याऐवजी तिने पोटच्या मुलीला तोंड बंद ठेवायला सांगितले. त्यानंतर संबंधित विवाहितेने माहेरच्या घरासह स्वतःच्या घरातील रोकड, सोने घेऊन प्रियकरासोबत पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कर्वेनगरमध्ये राहणार्या एका ४३ वर्षाच्या पतीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवानंद श्रीमंत वाले (वय २९, रा. कर्वेनगर) आणि फिर्यादीच्या पत्नीविरोधात पॉक्सोकायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये फिर्यादीची १५ वर्षीय मुलगी आजारी पडली होती. आजारी असताना तिला बरे वाटावे म्हणून आरोपी शिवानंद श्रीमंत वाले हा तिचा
व्यायाम घेतो म्हणून त्यांच्या घरी येत होता. व्यायामाचे निमित्त करत तिला घराबाहेर घेऊन जात होता. व्यायामासाठी बाहेर घेऊन गेल्यावर त्याने तिचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार ऑक्टोबर २०२२ आणि १८ एप्रिल २०२३ रोजी घडला आहे. दरम्यान ज्यावेळी मुलीने घडलेला सगळा प्रसंग आपल्या आईला सांगितला. मात्र आईने वाले याला जाब विचारण्याऐवजी मुलीलाच दमदाटी केली. याबाबत कोणाकडे बोलू नको, असा दम दिला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद याच्याबरोबर फिर्यादीच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध होते. शिवानंद याने फिर्यादीच्या पत्नीशी जवळीक साधून फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. त्यासाठी आजारी मुलीची उंची वाढवण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला दिला. तसेच व्यायामानिमित्त त्याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचे प्रयत्न केले. दरम्यान हा प्रकार उघडकीस येण्यापूर्वी महिलेने शिवानंद याच्यासोबत पलायन केले. मात्र तत्पूर्वी घर सोडताना घरातून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रक्कम आणि माहेरच्या घरातून ३० हजार रुपये चोरून नेले. ही माहिती मुलीला समजताच ती मोठ्याने रडू लागली.
वडिलांनी तिला रडण्याचे कारण विचारल्यावर तिने काहीही बोलण्यास नकार दिला. त्यावर तिच्या आजी व मावशीने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर तिने तिच्यासोबत झालेला सगळा प्रकार सांगितला. शिवानंद याने मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे कळताच मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी शिवानंद याच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि आईने हा प्रकार कळूनही मुलीला धमकावून शांत बसण्यास सांगितले म्हणून तिच्यावरही पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चोरीच्या बाबतीत महिलेवर भारतीय दंड विधान अंतर्गत कलम ३८० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करत आहेत. अशी माहिती वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी 'सीविक मिरर'ला दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.