विमान पाहणी करताना पडून मृत्यू ; गुन्हा दाखल

पुणे विमानतळावर विमानाचा दरवाजा व्यवस्थित बंद झाला आहे की नाही, याची पाहणी करत असताना एयर एशिया कंपनीचे सुरक्षा अधिकारी यांचा खाली पडून मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी (दि. १) गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 3 Jul 2023
  • 09:10 am
विमान पाहणी करताना  पडून मृत्यू ; गुन्हा दाखल

विमान पाहणी करताना पडून मृत्यू ; गुन्हा दाखल

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पुणे विमानतळावर विमानाचा दरवाजा व्यवस्थित बंद झाला आहे की नाही, याची पाहणी करत असताना एयर एशिया कंपनीचे सुरक्षा अधिकारी यांचा खाली पडून मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी (दि. १) गुन्हा दाखल करण्यात आला.

लोहगाव येथील विमानतळावर १३ एप्रिल रोजी सकाळी ६. ४० वाजता ही घटना घडली होती. विवियन अँथनी डॉमिनिक (वय ३३) असे यात मृत्यू झालेल्या सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. डाॅमिनिक यांचे तमिळनाडू येथे अंत्यविधी झाल्यावर त्यांच्या पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी एयर एशिया कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक एस. अजय हरिप्रसाद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

डॉमिनिक हे मूळचे तमिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथील रामचंद्र नगर येथील रहिवासी होते.  मागील काही दिवसांपासून ते कामानिमित्त पुण्यात आले होते. ते एयर एशिया कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होते. १३ एप्रिल रोजी सकाळी एका विमानाचा दरवाजा बंद झाला आहे, हे पाहण्यासाठी ते शिडी लावून वर चढले होते. दरवाजाची तपासणी करत असताना त्यांची शिडी घसरली आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला. यातच त्यांचे निधन झाले.

डॉमिनिक कामावर असताना त्यांना कंपनीकडून सुरक्षिततेची कोणतीच साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. कंपनीच्या बेफिकिरीमुळे हा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या पत्नी अविला विवियन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ‘‘सुरक्षिततेसाठी सुरक्षा बेल्ट, हेल्मेट, जॅकेट, गम बूट इत्यादी साधने कंपनीने पुरवणे आवश्यक होते. मात्र डाॅमिनिक यांना ती देण्यात आली नव्हती,’’ असे त्या म्हणाल्या. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु मृताच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहायक व्यवस्थापक एस. अजय हरिप्रसाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करत आहेत.

शिडी क्लिअरन्सशिवाय आणि विमानाकडून पूर्व सूचना न देता ओढली गेली. यामुळे डाॅमिनिक यांचा मृत्यू झाला, असा आरोप अविला विवियन यांनी केला आहे. डाॅमिनिक

एअर एशिया फ्लाइट ‘आय ५-७६७’मध्ये काम करत होते.  ते १३ एप्रिल रोजी सकाळी पुणे विमानतळावरून नवी दिल्लीसाठी जाणार होते. त्यावेळी मंजुरी आणि पूर्व सूचना न देता शिडी काढून घेण्यात आली. यामुळे डाॅमिनिक विमानातून सुमारे १५ फूट उंचीवरून जमिनीवर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते. विमान कंपनीच्या सुरक्षा उपायांच्या अभावामुळे पतीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

‘‘या प्रकरणी मला अंधारात ठेवण्यात आले होते. मला वाटले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परंतु कंपनी किंवा पोलिसांकडून याबाबतीत कोणतेही  माहिती मिळाली नाही. यात कोणाचा निष्काळजीपणा आहे, किमान हे तरी मला समजायला हवे होते,’’ असे अविला विवियन यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. त्या पतीचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात आल्या त्यावेळी त्यांना घटनेबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली नव्हती. ‘‘मी सर्व काही गमावले. किमान मला हे जाणून घ्यायचे  या घटनेला कोण जबाबदार आहे,’’ असेही त्या म्हणाल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story