भर राडारोडा आणि फेक नदीपात्रात
तन्मय ठोंबरे
बंडगार्डन रोडवरील तारकेश्वर पुलावर नदीपात्र बिघाड कार्यक्रम हाती घेतल्याचे चित्र रविवारी दुपारी दिसत होते. तारकेश्वर पुलावरील पदपथ उंच-सखल असल्याने तो समान पातळीचा करण्यासाठी खोदला आहे. खोदलेले पेव्हिंग ब्लॉक, राडारोडा आणि माती पादचाऱ्यांना अडथळा ठरत असल्याने तेथील कामगार हा राडारोडा उचलून नदीपात्रात टाकत असल्याचे रविवारी दुपारी दिसत होते. त्यामुळे पुणे महापालिकेने हाती घेतलेला नदीपात्र सुधारणा कार्यक्रम आहे की नदीपात्र बिघाड कार्यक्रम आहे अशी शंका येत होती.
दोन आठवड्यांपूर्वी बंडगार्डन रोडवरील तारकेश्वर पुलावरील पदपथाच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले. हा पदपथ उंच-सखल असल्याने पादचाऱ्यांना चालताना अडथळे येत होते. खोदलेले पेव्हिंग ब्लॉक, माती, राडा-रोडा तसाच ठेवल्याने पादचाऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली. नागरिकांनी गेल्या आठवड्यात तक्रार केल्यावर कंत्राटदाराला रस्त्यावरील पेव्हिंग ब्लॉक, राडा-रोडा तातडीने हलविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे कंत्राटदाराने आपल्या कामगारांना रस्ता साफ करण्यास सांगितले.
नदीपात्र सुधारणा कार्यक्रमाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून कंत्राटदाराचे कामगार काम करत होते. खोदलेले पेव्हिंग ब्लॉक, माती, राडा-रोडा योग्य ठिकाणी नेऊन रस्ता साफ करणे गरजेचे होते. त्याच्याऐवजी शॉर्टकट शोधून ते पेव्हिंग ब्लॉक, माती, राडा-रोडा घमेल्यात भरून चक्क नदीपात्रातच फेकत होते. पुणे महापालिकेच्या नदीपात्र सुधारणा कार्यक्रमाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासण्याचे काम बिनदिक्कत उघडपणे सुरू होते. त्यामुळे कंत्राटदारामार्फत नदीपात्र बिघाड कार्यक्रम हाती घेतला आहे की काय अशी शंका नागरिकांच्या मनात येत होती. पदपथाचे काम लवकर पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत असलेल्या नागरिकांना हा असला
बेजबाबदार प्रकार पाहून धक्का बसला. रविवारी सीविक मिररच्या प्रतिनिधीने हा बेजबादारपणा प्रत्यक्ष पाहिला.
या प्रतिनिधीने जेव्हा कंत्राटदार राजू शर्मा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांना अशा प्रकाराची कल्पना नव्हती. ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर या प्रकारात लक्ष घालण्याचे आणि या बेजबाबदार प्रकाराला कोण जबाबदार आहे ते शोधून काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पदपथ दुरुस्तीचे काम नियमाप्रमाणे आणि व्यवस्थित होईल अशी ग्वाही दिली.
कंत्राटदार आणि त्याचे कामगार हे काम कोणत्याही नियमांचे पालन न करता बेजबाबदारपणे करत असल्याबद्दल या भागातील नागरिकांनी निराशा व्यक्त केली. कंत्राटदाराने अधिक काळजीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना नजीकच्या भविष्यात घडणार नाही याची प्रशासन काळजी घेईल अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या परिसरात राहणारे सुशील राठी या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, मी येरवडा येथे राहतो. बंडगार्डन जवळ माझे ऑफीस असल्याने तारकेश्वर पुलावरून माझे दररोज येणे-जाणे असते. गेल्या काही दिवसांपासून पुलावरील पदपथ खोदलेला मी पाहात आहे. रस्ता खोदल्यानंतर पेव्हिंग ब्लॉक, माती, राडारोडा रस्त्यावर तसाच बाजूला टाकला होता. अनेक वेळा तक्रार करूनही कामगारांनी पेव्हिंग ब्लॉक, राडारोडा, माती उचलण्याकडे दुर्लक्ष केले. रस्ता अडवून ही घाण तशीच ठेवलेली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.