Navale Bridge : नवले पूल परिसरात वाहनांचा वेग कमी करण्यासाठी विविध उपायांचा प्रस्ताव

नवीन बोगदा ते नवले पूल या दरम्यान सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या असलेल्या साठ किलोमीटर प्रतितास वेगमर्यादेत घट करण्यात येणार आहे. नवीन बोगदा ते नवले ब्रिज या साडेआठ किलोमीटर अंतरावरील जड वाहनांचा वेग ४० की ५० किलोमीटर प्रतितास ठेवायचा याचा अंतिम निर्णय अभ्यासानंतर घेण्यात येणार आहे, तर जड वाहने केवळ डाव्या बाजूने जातील असाही प्रस्ताव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Tue, 9 May 2023
  • 07:09 am
नवले पूल परिसरात वाहनांचा वेग घटवणार

नवले पूल परिसरात वाहनांचा वेग कमी करण्यासाठी विविध उपायांचा प्रस्ताव

अपघात टाळण्यासाठी जड वाहनांना डावी बाजू राखीव, रम्बलर स्ट्रीप, साईन बोर्डाद्वारे वाहनचालकांत जागृती

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

नवीन बोगदा ते नवले पूल या दरम्यान सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या असलेल्या साठ किलोमीटर प्रतितास वेगमर्यादेत घट करण्यात येणार आहे. नवीन बोगदा ते नवले ब्रिज या साडेआठ किलोमीटर अंतरावरील जड वाहनांचा वेग ४० की ५० किलोमीटर प्रतितास ठेवायचा याचा अंतिम निर्णय अभ्यासानंतर घेण्यात येणार आहे, तर जड वाहने केवळ डाव्या बाजूने जातील असाही प्रस्ताव आहे.    

बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ २३ एप्रिलला पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात झाला होता. यात चारजणांना प्राण गमवावे लागले होते. कात्रज नवीन बोगदा ते नवले ब्रिज दरम्यानचा रस्ता हा अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये येथील जिवघेण्या अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त विजय मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, नवले ब्रिजबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत जड वाहनांचा वेग या परिसरात कमी असावा याबाबत चर्चा झाली. मात्र सध्या असलेला साठ किलोमीटर प्रतितास वेग किती कमी करावा याचा निर्णय अभ्यासानंतर घेण्यात येणार आहे. जड वाहने डाव्या लेनमधूनच जातील याबाबतही चर्चा करण्यात आली आहे.  

 वाहन न्यूट्रल केल्याने होतो घात

नवीन बोगद्यातून वाहन बाहेर पडल्यानंतर तीव्र स्वरूपाचा उतार सुरू होतो. त्यानंतर दरी पूल येतो. हा पूल ओलांडताना तीव्र वळण आहे. त्यानंतर पुन्हा उतार सुरू होतो. रात्रीच्या वेळेस या रस्त्यावर जड आणि लांब पल्ल्याची खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. अनेकदा जड वाहतूक करणारे आपले वाहन न्यूट्रल करतात. काही प्रमाणात इंधन वाचवण्यासाठी अशी कृती केली जाते. मात्र, त्यामुळे ब्रेक न लागण्याचा अथवा वाहनावरील नियंत्रण गमावण्याचा धोका असतो. या कारणामुळे जड वाहने न्यूट्रल करू नका, असे सांगणारे अनेक फलक नवीन कात्रज बोगदा ते नवले ब्रिज या दरम्यानच्या रस्त्यावर ठराविक अंतराने लावण्यात आले आहेत.      

या झाल्या सुधारणा....

नवीन कात्रज बोगदा ते नवले ब्रिज दरम्यानचा सुमारे साडेआठ किलोमीटर रस्ता अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे वाहनचालकांच्या मनावर ठसावे, यासाठी साताऱ्याकडून येणारी वाहने बोगद्यात प्रवेश करताना अपघाती क्षेत्र असल्याची लाल रंगाची पाटी वाहनचालकांचे स्वागत करते. बोगद्यातून बाहेर पडल्यावर पांढऱ्या रंगाच्या रम्बलर स्ट्रीपचे जाळे वाहनचालकांचे स्वागत करते. यावरून वाहन नेल्यास ते धडधड करत पुढे जाते. त्यामुळे वाहनचालक आणखी सजग होतो. पाठोपाठ अपघातप्रवण क्षेत्र असल्याची जाणीव करून देणारे लाल आणि निळ्या रंगाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. वेग मर्यादा दर्शविणारे बोर्डही दिसतात. ‘गाडी चालवताना फोनचा वापर करू नका,’ ‘मद्यप्राशन करून वाहन चालवू नका’ अशा विविध सूचना करणारे डिजिटल बोर्ड काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. शिवाय वाहनचालकांना आपल्या वाहनाचा वेग समजावा, यासाठी दोन ठिकाणी सेन्सर लावण्यात आले आहेत. येथून वाहन जाण्यापूर्वी वाहनाचा वेग डिजिटल बोर्डावर दिसतो. नवीन बोगद्यातून दरी पुलाकडे जाताना लावलेल्या डिजिटल फलकावर तर, तीनही लेनमधून जाणाऱ्या वाहनांचा स्वतंत्र वेग दिसतो.

तपासणी नाक्याद्वारे वेगावर नियंत्रण...

नवीन बोगद्यातून वाहन बाहेर पडल्यानंतर नवले ब्रिजच्या दिशेने जाताना दरी पुलाच्या अलीकडेच पोलिसांचा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. सकाळी आणि रात्री अशा दोन शिफ्टमध्ये चार पोलीस कर्मचारी येथे उपस्थित असतील. त्यांना दिलेल्या पोलीस वाहनातून माईकवरील उद्घोषणा आणि सायरन अथवा पोलीस वाहनावर असलेल्या विशिष्ट लाईटच्या माध्यमातून वाहनांना इशारा देण्यात येत आहे. पोलिसांची आपल्यावर नजर असल्याचे त्यातून वाहनचालकांना समजावे हा यामागे हेतू आहे.

नवीन बोगद्याजवळ उभारलेल्या तपासणी नाक्यावरील कर्मचारी संदीप पवार म्हणाले, ‘‘बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर तीव्र उतार सुरू होतो. त्यानंतर दरी पूल संपताना तीव्र वळण येते आणि नंतर पुन्हा उतार सुरू होतो. हा उतार नवले ब्रिजपर्यंत राहतो. रात्री जड वाहनांचा वेग प्रचंड असतो. तपासणी नाक्यावरही वाहनांच्या वेगाने हादरे जाणवतात. रात्रीच्या वेळेस आम्ही पोलीस व्हॅनवर असणारा दिवा सुरू ठेवतो. त्यामुळे वाहनचालकांना दुरूनच पोलीस वाहन असल्याचे समजते. तसेच, सायरन अथवा माईकवर उद्घोषणा करूनही आम्ही वाहनांचा वेग कमी करण्याबाबत आवाहन करत आहोत.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story