वंदे भारतासाठी प्रवासी जमवण्याचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (१० फेब्रुवारी) मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या गाड्यांमधून प्रवासासाठी रेल्वे कर्मचारी तसेच विद्यार्थी व शिक्षकांची गर्दी जमविली जाणार असल्याचे समजते. याबाबत उघडपणे बोलण्यास रेल्वे अधिकारी तयार नाहीत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Feb 2023
  • 12:05 pm
वंदे भारतासाठी प्रवासी जमवण्याचे आदेश

वंदे भारतासाठी प्रवासी जमवण्याचे आदेश

रेल्वेच्या सर्व विभागांना विशेष टार्गेट; कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, शिक्षकांनाही मिळणार सहलीचा आनंद

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (१० फेब्रुवारी) मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या गाड्यांमधून प्रवासासाठी रेल्वे क-र्मचारी तसेच विद्यार्थी व शिक्षकांची गर्दी जमविली जाणार असल्याचे समजते. याबाबत उघडपणे बोलण्यास रेल्वे अधिकारी तयार नाहीत. विशेष म्हणजे बुधवारी रात्री उशिरापर्यंत पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा रेल्वेकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

देशातील नववी वंदे भारत रेल्वे मुंबई-सोलापूर मार्गावर तर दहावी गाडी मुंबई-शिर्डी मार्गावर धावणार आहे. या गाड्यांमधून प्रवासासाठी प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पण अद्याप गाड्य़ांचे नियमित वेळापत्रक, तिकीट दर अधिकृतपणे जाहीर कऱण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गाड्यांचे आरक्षणही सुरू झालेले नाही. पुढील एक-दोन दिवसांत याबाबत माहिती दिली जाऊ शकते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गाड्यांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या गाड्या सोलापूर व शिर्डीपर्यंत धावतील. या कार्यक्रमाबाबतही रेल्वेकडून गुप्तता ठेवण्यात आल्याने संभ्रमाची स्थिती आहे. असे असले तरी रेल्वे प्रशासनाने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली आहे. उद्घाटनावेळी गाडीत गर्दी दिसावी यासाठी विविध विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांना गर्दी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार टार्गेट दिल्याचे समजते. हे कर्मचारी मुंबईतून बसून पुढील स्थानकापर्यंत प्रवास करतील. त्यानुसार प्रत्येक स्थानकातील रेल्वे कर्मचारी गाडीने जातील. गर्दी जमवण्याच्या आदेशामुळे या कर्मचाऱ्यांप्रमाणेच शाळेच्या विद्यार्थ्यांनाही वंदे भारतचा प्रवास घडणार आहे.

एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मुंबईतून रेल्वे कर्मचारी गाडीत बसणार आहेत. त्यांच्यासोबत शाळेचे विद्यार्थी व शिक्षकही असतील. ते ठाणे किंवा लोणावळा तसेच पुण्यापर्यंतही प्रवास करू शकतात. तर सोलापूरहून पुण्यात २०० जणांची टीम येणार आहे. यामध्ये रेल्वे कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थी, शिक्षक असतील. ही टीम पुण्यातून वंदे भारतने सोलापूरकडे रवाना होणार आहे. सोलापूर स्थानकात गाडीचे दिमाखात स्वागत करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ही उठाठेव केली जाणार असल्याचे समजते. ही गाडी पुण्यातून सुटल्यानंतर पुढे दौंड व सोलापूरमध्येच थांबणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकातही गाडीच्या स्वागतासाठी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विभागातील काही कर्मचारीही या गाडीने दौंड तसेच सोलापूरपर्यंत नेण्याचे नियोजन केले जात आहे. संपूर्ण मार्गावर गाडीमध्ये प्रवासी दिसण्यासाठी रेल्वेकडून जय्यत तयारी सुरू आहे. गाडीमध्ये त्यादिवशी इतर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. निश्चित केलेले कर्मचारी तसेच विद्यार्थी व शिक्षकांनाच प्रवास करण्याची परवानगी असेल. मात्र, दहा तारखेच्या कार्यक्रमाचे नेमके नियोजन कसे असेल, याबाबत रेल्वेकडून बुधवारी उशिरापर्यंत माहिती देण्यात आली नाही. कार्यक्रम निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

याविषयी बोलताना मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, ‘येत्या दहा तारखेला उद्घाटनानिमित्त वंदे भारत गाडी धावणार आहे. गाडीचे नियिमित वेळापत्रक तसेच आरक्षणाबाबत अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती आलेली नाही. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल. इतर मुद्यांवर बोलण्यास झंवर यांनी नकार दिला. बुधवारी मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story