वैकुंठही झालासे नरक...

कोणत्याही नागरिकाच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास जेथे सुरू होतो, तेथील वातावरण किमान सुसह्य असावे. किमानपक्षी दुर्गंधीने भरलेले नसावे ही अपेक्षा. वैकुंठ स्मशानभूमीत मात्र हे चित्र काही पाहायला मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून वैकुंठ स्मशानभूमीच्या आसपास मोठ्या संख्येने कचऱ्याच्या गाड्या लावलेल्या असतात. कचऱ्याच्या गाड्या लावण्याचे हे अधिकृत स्थळ असल्यासारखे वाटते. यामुळे वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात दुर्गंधीचे नरकमय वातावरण पसरलेले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 17 Jun 2023
  • 01:18 am
वैकुंठही झालासे नरक...

वैकुंठही झालासे नरक...

शांत, गर्द, हिरव्या वैकुंठ स्मशानभूमीत कचऱ्याच्या गाड्या लावल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य, अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना दोन मिनिटेही थांबणे झाले अवघड

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

कोणत्याही नागरिकाच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास जेथे सुरू होतो, तेथील वातावरण किमान सुसह्य असावे. किमानपक्षी दुर्गंधीने भरलेले नसावे ही अपेक्षा. वैकुंठ स्मशानभूमीत मात्र हे चित्र काही पाहायला मिळत नाही. गेल्या काही दिवसांपासून वैकुंठ स्मशानभूमीच्या आसपास मोठ्या संख्येने कचऱ्याच्या गाड्या लावलेल्या असतात. कचऱ्याच्या गाड्या लावण्याचे हे अधिकृत स्थळ असल्यासारखे वाटते. यामुळे वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात दुर्गंधीचे नरकमय वातावरण पसरलेले आहे.

कचऱ्याच्या गाड्यांमधीलओल्या कचऱ्याचा परिसरात अत्यंत उग्र वास पसरलेला असतो. तसेच कचरा गाडीतून सगळा कचरा पडलेला असतो. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी, वाहने उभी करण्यासाठी असलेल्या जागेत कचराच कचरा पसरला आहे. वैकुंठ स्मशानभूमीचे रूपांतरण कचरा डेपोत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत. पालिकेचे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत कचरा गाड्या लावणाऱ्यांना अभय देत आहेत. त्याचा त्रास मात्र अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना सोसावा लागत आहे. यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांशी पालिका प्रशासन खेळत असल्याचे नागरिक बोलतात. दुर्गंधीमुळे कधी एकदा हा परिसर सोडून जाईन असे त्यांना वाटत असते. येथील कचऱ्याच्या गाड्या तत्काळ हटवा आणि नागरिकांची गैरसोय थांबवा अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम यांनी केली आहे.

मुठा नदीच्या काठावर असलेली ही स्मशानभूमी शहरातील जुनी आणि मोठी स्मशानभूमी आहे. या ठिकाणी पारंपरिक अंत्यसंस्कार पद्धतीसह विद्युतदाहिनी, डिझेल आणि गॅसद्वारे अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे शहरातील बहुतांश मृतदेहांवर येथेच अंत्यसंस्कार केले जातात. शहरातील जवळपास पन्नास टक्के अंत्यसंस्कार येथे होतात. पुणे महानगरपालिकेच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी एकूण सहा वूड पायर सिस्टिम असलेले चार ए.पी.सी शेड, एक गॅस दाहिनी आणि तीन विद्युत दाहिनी आहेत. 

वैकुंठ स्मशानभूमी म्हणजे नागरिकांच्या आयुष्यातील अंतिम प्रवासातील शेवटचा टप्पा. अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना बसण्यासाठी, वाहने उभी करण्यासाठी येथे जागा ठेवण्यात आली आहे. मात्र आता या जागेचा वापर कचऱ्याच्या गाड्या उभ्या करण्यासाठी होत आहे. सुरुवातीला त्यांची संख्या कमी होती. मात्र, त्याकडे कोणी लक्ष दिले नसल्याने त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या कचरागाड्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गाड्यातील ओला कचऱ्यामुळे अत्यंत घाणेरडा वास परिसरात पसरलेला असतो. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना अशा वातावरणात नाईलाजाने थांबावे लागते.

या ठिकाणी लावलेल्या कचरा गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी स्मशानभूमीचे मागचे गेट बंद केले जाते. त्यामुळे एकाच गेटमधून नागरिक, वाहने एकाच वेळी बाहेर पडतात आणि आत येतात. साहजिकच त्यामुळे रस्त्यावर अचानक मोठी गर्दी होते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीही होते. तसेच मागचे गेट बंद असल्याने गरवारे महाविद्यालयाकडून येणाऱ्या नागरिकांना स्मशानभूमीत येण्यासाठी पत्रकारभवन येथून वळसा घालून यावे लागत आहे. याचा नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याचे नीलेश निकम यांनी ‘सीविक मिरर’ शी बोलताना सांगितले. याठिकाणी उभ्या असलेल्या कचऱ्याच्या गाड्या या ठेकेदारांच्या आहेत. त्यांना येथे गाड्या उभ्या करण्यास प्रशासन मज्जाव करत नाहीत. त्यामुळे गाड्या लावल्या जात आहेत. अधिकारी दुर्लक्ष करून, त्याला खत पाणी घालत आहेत. त्यामुळे येथील असह्य वातावरणास ते जबाबदार असल्याचेही निकम यांनी सांगितले.

स्मशानभूमीतील पत्र्याच्या शेडवर मोठ्या प्रमाणावर झाडांचा पाला साचला आहे. तसेच झाडांच्या काही फांद्या वाळल्या आहेत. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर या वाळलेल्या फांद्या पडल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्या काढायला हव्यात, स्मशानभूमीची स्वच्छता ठेवायला हवी, असे ऋषिकेश बालगुडे यांनी  ‘सीविक मिरर’ शी बोलताना सांगितले.

याबाबत माहिती घेण्यासाठी कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुहास महादेव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याची मी माहिती घेतो असे सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story