विद्यापीठाची रिफेक्टरी बनली कचऱ्याची फॅक्टरी
राहुल देशमुख
शेकडो विद्यार्थी जेवण करत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनालाय हे कचरा डेपो बनले आहे. आवारापासून टेरेसपर्यंत कचराच कचरा साठला आहे. त्यामुळे या घाणीत विद्यार्थ्यांना रोज जेवण करावे लागत आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रिफेक्टरीच्या आवारात आणि टेरेसवरही मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी जेवतात तेथेही कचरा साठला आहे. ‘सीविक मिरर’ च्या प्रतिनिधीने रिफेक्टरीला भेट दिली असता पाण्याचे फिल्टर बंद होते. सगळीकडे कचऱ्याचे ढिग साचलेले होते. विद्यापीठ कॅम्पसमधील एकमेव प्रमुख कॅंटीन आहे. जुने अनिकेत कँटीन बंद आहे.
अंबादास मेवेणकर या विद्यार्थ्याने सांगितले की, ‘‘आता नवीन विद्यार्थी दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी रिफेक्टरीची जागा अपुरी आहे. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने रिफॅक्टरी परिसर स्वच्छ करणे आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांना नियमित जेवण आणि नाश्ता मिळत नाही.’’
‘‘गेल्या वर्षभरापासून रिफेक्टरीची अशीच स्थिती आहे. कचऱ्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,’’ अशी प्रतिक्रिया विद्यापीठात शिकत असलेले अंतिम वर्षाचे विद्यार्थी ओमप्रकाश आडे यांनी व्यक्त केली.
‘सीविक मिरर’ने विद्यापीठ रिफेक्टरीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तातडीने कार्यवाही करून स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन दिले.