‘अनफिट’ स्कूलबस, विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर

स्कूलबस रस्त्यावर धावण्यास योग्य आहेत की नाही यासाठी दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी वाहनांची फिटनेस तपासणी केली जाते. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) वतीने वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) दिले जाते. शहरातील शाळा सुरू झाल्यानंतरही दीड हजारांहून अधिक बसची तपासणीच झालेली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Tue, 20 Jun 2023
  • 11:40 pm
‘अनफिट’ स्कूलबस, विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर

‘अनफिट’ स्कूलबस, विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर

शहरातील २५ टक्के स्कूलबसची तपासणीच नाही; फिटनेस प्रमाणपत्राशिवाय धावतात १५०० स्कूलबस रस्त्यावर

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

स्कूलबस रस्त्यावर धावण्यास योग्य आहेत की नाही यासाठी दरवर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी वाहनांची फिटनेस तपासणी केली जाते. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) वतीने वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) दिले जाते. शहरातील शाळा सुरू झाल्यानंतरही दीड हजारांहून अधिक बसची तपासणीच झालेली नाही. म्हणजेच एकप्रकारे 'अनफिट' स्कूलबस रस्त्यावर धावत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या मुद्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.

पुणे शहरात साडेसहा हजारांहून अधिक स्कूलबस आणि व्हॅन आहेत. नवीन स्कूलबस असल्यास दर दोन वर्षांनी फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या आठ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर धावण्यास योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते. त्याच बरोबर संबंधित गाडीच्या चालकाकडे वाहन परवाना आहे की नाही, बॅज आहे की नाही, याचीही तपासणी केली जाते.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या वाहनांची तपासणी वेळेत होणे गरजेचे असते. दरवर्षी शाळा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतात. त्यामुळे या वाहनांची तपासणी एप्रिल आणि मे या कालावधीत होणे गरजेचे असते. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी अनेक वाहनांची तपासणीच प्रादेशिक परिवहन विभागाकडून होत नसल्याचे चित्र दिसून येते. पुणे शहरामध्ये स्कूलबस आणि व्हॅनची संख्या ६ हजार ६०६ इतकी आहे. त्यातील ५ हजार ७१ वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे. अजूनही १ हजार ५५३ वाहनांची तपासणी झालेली नाही.

महापॅरेंट्स असोसिएशनचे दिलीपसिंग विश्वकर्मा म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाहनात अटेंडन्ट असणेही आवश्यक असते. मात्र अनेकदा अटेंडन्ट नसतो. एखाद्या वाहनाचा वेळेवर ब्रेक लागल्यास अपघात होऊ शकतो. तर, अटेंडन्ट नसल्यानेही एखादी अप्रिय घटना होऊ शकते. शालेय विद्यार्थ्यांचा विचार करून आरटीओने किमान स्कूलबसच्या तपासणीत हयगय करू नये. या वाहनांची प्राधान्याने तपासणी करणे गरजेचे आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story