पुतण्या नव्हे काका; आता आणा-भाका!

राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरले आहे. मात्र, यानंतर सावधगिरीचा पवित्रा म्हणून आता राष्ट्रवादीकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. 'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदर्शांवर आणि तत्त्वांवर मी निष्ठा ठेवतो...' अशी स्पष्ट कबुली देणारे पत्र पक्षाचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून भरून घेतले जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Wed, 5 Jul 2023
  • 08:47 am
पुतण्या नव्हे काका;  आता आणा-भाका!

पुतण्या नव्हे काका; आता आणा-भाका!

अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाची पडझड थांबवण्यासाठी 'प्रतिज्ञापत्रा'चा उतारा; कार्यकर्त्यांवर आपण शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याची लेखी हमी देण्याची वेळ

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरले आहे. मात्र, यानंतर सावधगिरीचा पवित्रा म्हणून आता राष्ट्रवादीकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. 'राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदर्शांवर आणि तत्त्वांवर मी निष्ठा ठेवतो...' अशी स्पष्ट कबुली देणारे पत्र पक्षाचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून भरून घेतले जात आहे. पक्षसंघटन मजबूत करून परिस्थिती सावरण्याच्या दृष्टीने मंगळवारी पुण्यात राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. त्या वेळी प्रतिज्ञापत्राचीच चर्चा होत असल्याचे दिसून आले.      

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदार असल्याचे सांगितले जात आहे. या बंडाळीनंतर राज्यातील विविध नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता नक्की कोणत्या नेत्याचा झेंडा हाती घ्यावा याबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातही हेच गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. ही कोंडी फोडण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू कला दालनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी बैठक बोलावली होती. खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार कमल ढोले-पाटील, जयदेव गायकवाड, माजी नगरसेवक नीलेश निकम, रवींद्र माळवदकर, किशोर धनकवडे, संतोष फरांदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्यासह शहरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, गेल्या टर्ममध्ये नगरसेवक असलेल्या अनेकांची अनुपस्थिती बैठकीत प्रकर्षाने जाणवली. पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे या बैठकीला अनुपस्थित होते. पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, प्रकाश कदम यांच्यासह अनेक नेते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

पक्षात सेनापतीची भूमिका निभावत असलेल्या अजित पवार यांनीच पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना हाताशी घेऊन आता पक्षावर दावा सांगितला आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांनी बैठकीला अनुपस्थित राहात अजित पवार यांनाच आपला पाठिंबा असल्याचे एक प्रकारे दर्शवले आहे. प्रशांत जगताप यांनी या बैठकीला गेल्या वेळी नगरसेवक असलेले २३ जण उपस्थित असल्याचा दावा केला. मात्र, ज्येष्ठ नेते आणि महापालिकेत महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या नगरसेवकांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञा घेऊन शरद पवार यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जशी लोकांची सहानुभूती आहे, त्याचप्रमाणे शरद पवार यांनादेखील पाठिंबा मिळेल, असा विश्वासही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, 'केंद्र सरकारने सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) वापर विरोधकांवर करून त्यांना हैराण केले. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली. त्यानंतर त्यांना आता प्रादेशिक पक्ष नको आहेत. इतर पक्षांना फोडून ते सत्तेत राहण्यासाठी वेगवेगळी शस्त्रे वापरतात. संसदेत तर भाजपचा खासदार इतर पक्षाच्या खासदारांशी साधे बोलला, तरी त्याला समज दिली जाते. या घटना म्हणजे हिटलरशाहीचे निदर्शक आहेत. त्यांना लोकशाही नकोच आहे. गोबेल्स नीतीद्वारे तसा प्रचारही केला जातो. त्यासाठी खोटे बोल, पण रेटून बोल या तत्त्वाचा वापर केला जात आहे. अशा जातीयवादी घटकांविरोधात लढण्यासाठी शरद पवार यांना पाठिंबा द्यायला हवा.'

माजी आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, आपले सेनापतीच पक्षातून निघून गेल्याने आपल्यासमोर पेचप्रसंग उभा राहिला आहे. लोकशाहीविरोधी प्रतिक्रांतीचा हा एक भाग आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या ७३ वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्यांची भूमिका सुरुवातीपासूनच लोकशाहीविरोधी राहिली आहे. भाजपने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. त्यांच्याकडे दीडशे आमदार होते. मात्र, शिंदे यांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात नुकसान होईल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, कराड येथे शरद पवार यांच्यासाठी लोटलेला जनसागर पाहता, महाराष्ट्र कोणाच्या बाजूने आहे हे लक्षात आले.'    

अनेकांना अजित पवार यांच्या गटाकडून फोन येत आहेत. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, 'ज्यांना जायचे असेल ते तिकडे जातील. ज्यांना स्वाभिमान असेल ते शरद पवार साहेबांसमवेत येतील. मला असा कोणताही फोन अजित पवार यांच्याकडून आला नाही. कारण त्यांना साहेबांविषयीची माझी निष्ठा आणि विचार माहीत आहेत. मी जातीयवादी पक्षासोबत कधीही जाणार नाही. त्याबाबत माझे विचार सुस्पष्ट आहेत.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story