हॉटेलच्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू

मार्केट यार्डमधील गेट क्रमांक एकजवळील रेवणसिद्धी हॉटेलला सोमवारी (दि. १२) मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Wed, 14 Jun 2023
  • 06:56 am

हॉटेलच्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू

मार्केट यार्डमधील गेट क्रमांक एकजवळील रेवणसिद्धी हॉटेलला सोमवारी (दि. १२) मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

सोमवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास ही आग लागली. हॉटेलमध्ये झोपलेल्या तीन कामगारांना अग्निशन दलाने  बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान यातील मुन्ना मोतीलाल राठोड (वय ३७) आणि संदीप या दोघांचा मृत्यू झाला, तर एकावर उपचार सुरू आहेत. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच हे तिघेही या हाॅटेलमध्ये कामाला लागले होते.

रात्री कामगार हॉटेलच्या पोटमाळ्यावर झोपले होते. ते झोपेत असताना अचानक आग लागली.  आगीमुळे त्यांना कुठलीही हालचाल करता आली नाही. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. कामगारांनी हॉटेलचे लोखंडी शटर आतून बंद केले होते. त्यामुळे बाहेर मदतीसाठी जमलेला नागरिकांना काहीच करता येत नव्हते.

या आगीमुळे मार्केट यार्ड परिसरात धांदल उडाली होती. एका  सुरक्षारक्षकाने शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र शटर आतल्या बाजूने बंद असल्या कारणाने ते उघडले नाही. आगीमुळे ते गरम झाले असल्याने उघडताना हाताला भाजत होते. सुरक्षारक्षकाने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदीप खेडेकर, सुनील दिगांबर नाईकनवरे स्टेशन ऑफिसर, तसेच तांडेल,  मनीष बोंबले, मंगेश मिळवणे, फायरमन दिगंबर बांदिवडेकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख इत्यादींनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story