PMPML bus acccient : दोन 'पीएमपीएल'ची समोरासमोर धडक; २९ जखमी

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील बस रॅपिड ट्रान्झिट सीस्टिमच्या (बीआरटी) लेनवर मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास पीएमपीएलच्या दोन बस समोरासमोरून एकमेकांवर जोरदार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन्ही बसचा चुराडा झाला असून, एकूण २९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यातील २५ प्रवाशांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Wed, 2 Aug 2023
  • 11:24 am
दोन 'पीएमपीएल'ची समोरासमोर धडक; २९ जखमी

दोन 'पीएमपीएल'ची समोरासमोर धडक; २९ जखमी

चालकाने बेदरकारपणे गाडी चालवल्याने पुणे-अहमदनगर रस्त्यावरील बीआरटी लेनमध्ये अपघात; जखमींमध्ये ८ महिला

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पुणे-अहमदनगर रस्त्यावरील बस रॅपिड ट्रान्झिट सीस्टिमच्या (बीआरटी) लेनवर मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास पीएमपीएलच्या दोन बस समोरासमोरून एकमेकांवर जोरदार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन्ही बसचा चुराडा झाला असून, एकूण २९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यातील २५ प्रवाशांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जखमींमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, दोन्ही बस चक्काचूर झाल्या आहेत. त्यांच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका तसेच पीएमपीएल आणि बीआरटीचे अधिकारी दाखल झाले होते.

नरवीर तानाजी वाडी डेपोची सीएनजी बस ६५९, मार्ग क्रमांक १५९/९ ही तळेगाव ढमढेरे येथून पुणे महानगरपालिकेकडे जात होती. त्या वेळी खराडी येथील जनक बाबा दर्ग्याच्या अलीकडे असलेल्या आपले घर सोसायटीसमोर बीआरटी मार्गामध्ये विरुद्ध दिशेने जाणारी वाघोली डेपोची बस क्रमांक ई १६४, मार्ग क्रमांक २३६/२ ही बस वेगात येऊन धडकली. अपघातानंतर बसच्या काचा फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यामध्ये दोन्ही बसचे चालक, वाहक यांच्यासह प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते उपचार सुरू असल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतून व मिळेल त्या वाहनांमधून जखमींना ससून रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर पुणे-नगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त बस बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. बस समोरून एकमेकांवर अत्यंत वेगात येऊन धडकल्या. त्यात चालकांची बेफिकिरी असल्याचे नागरिकांनी सांगितले. याचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अपघात नेमका कोणत्या कारणाने घडला हे अद्याप समजू शकलेले नाही. जखमींमध्ये वाघोलीहून येणाऱ्या बसमधील २२ तर तळेगाव ढमढेरे बसमधील चालक व त्यांच्या साहाय्यकांसह ७ प्रवासी जखमी झाले आहेत.

(एमएच १२ आरएन ६१६०, वाघोलीहून वारजे माळवाडीकडे जाणारी) बाळू बन्सी खुंदे याने विरुद्ध दिशेने जाणारी बस भरधाव वेगात चालवली होती. त्यामुळे धडक झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले की, “दुर्दैवाने अपघात झाला. जखमी प्रवाशांना वैद्यकीय उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा तपास सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.'

साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने म्हणाले, “बाळू बन्सी खुंदे यांनी इलेक्ट्रिक बसचालक राहुल माणिक याच्याविरुद्ध तक्रार केली आहे. त्यानुसार माणिक बीआरटी लेनमध्ये विरुद्ध दिशेने घुसला. भारतीय दंड २७९ (सार्वजनिक मार्गावर बेशिस्तपणे वाहन चालवणे), ३३७ (जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या कृत्यामुळे दुखापत करणे) अंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम आदमी पक्षाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीएमएल सुधारणा मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते जसे की बसमध्ये प्रथमोपचार पेटी असणे, आग विझवण्यासाठी अग्निशामक उपकरणे, काचा फोडण्यासाठी हातोडा इत्यादी असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र त्याच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी सांगितले. पीएमपीएमएल बस अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आम आदमी पक्षाने मागणी केली आहे. अपघातावेळी गाडीत या सुविधा असत्या, तर जखमींना उपचारासाठी मदत झाली असती आणि अपघाताची तीव्रताही कमी झाली असती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story