टोमॅटोवरुन तुंबळ!

सध्या टोमॅटोचे दर आकाशाला भिडले असून देशभर हे भाव शंभर-दीडशेच्या आसपास पोहोचले आहेत. मध्य प्रदेशात मोबाईलबरोबर दोन किलो टोमॅटो मोफत दिले जात आहेत, तर उत्तर प्रदेशात एका ठिकाणी दर ऐकून मारामाऱ्या होऊ नयेत यासाठी विक्रेत्याने बाऊन्सर ठेवल्याचे वृत्त आहे. पुण्यातही टोमॅटोबाबतची स्थिती फार वेगळी नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 10 Jul 2023
  • 12:24 am
टोमॅटोवरुन तुंबळ!

टोमॅटोवरुन तुंबळ!

गगनाला भिडलेल्या टोमॅटोच्या दराने लोकांचा संयम सुटू लागला असून वडगाव शेरीत तर ग्राहक-विक्रेत्यात चढ्या दरावरून झडली तुंबळ हाणामारी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

सध्या टोमॅटोचे दर आकाशाला भिडले असून देशभर हे भाव शंभर-दीडशेच्या आसपास पोहोचले आहेत. मध्य प्रदेशात मोबाईलबरोबर दोन किलो टोमॅटो मोफत दिले जात आहेत, तर उत्तर प्रदेशात एका ठिकाणी दर ऐकून मारामाऱ्या होऊ नयेत यासाठी विक्रेत्याने बाऊन्सर ठेवल्याचे वृत्त आहे. पुण्यातही टोमॅटोबाबतची स्थिती फार वेगळी नाही. वडगाव शेरी भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या दरावरून ग्राहक आणि विक्रेत्यांत तुंबळ हाणामारी झाली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास गोपाल ढेपे हे वडगाव शेरी येथील भाजी मार्केटमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी टोमॅटो कसे दिले असे विक्रेत्याला त्यांनी विचारले. विक्रेते अनिल गायकवाड यांनी २० रुपये पावशेर असा भाव ढेपे यांना सांगितला. टोमॅटो खूपच महाग आहेत असे म्हटल्यावर या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर ते प्रकरण शिव्यांवर गेले. गोपाल ढेपे आणि गायकवाड या दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्याच दरम्यान विक्रेते अनिल गायकवाड यांनी ग्राहक ढेपे यांच्या तोंडावर बुक्क्यांचे ठोसे मारले. तसेच वजन काट्यातील लोखंडी वजन हातात घेऊन ढेपे यांच्या उजव्या गालावर मारले. यामध्ये गोपाल ढेपे जखमी झाले आहेत. या मारहाण प्रकरणी अनिल गायकवाड याच्या विरोधात गोपाल गोविंद ढेपे (रा. गलांडेनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात अनिल गायकवाड (रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार नांगरे तपास करत आहेत. 

तीव्र उन्हामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट होते. दरवर्षी जून-जुलै महिन्यात टोमॅटोच्या भावात वाढ झाल्याचे आढळून येते. मात्र या वर्षी सर्वाधिक भाव वाढ झाल्याचे पाहावयास मिळते. एकीकडे कधी भाव नाही म्हणून शेतकरी शेतात, रस्त्यावर टोमॅटो फेकून देतात, तर दुसरीकडे टोमॅटोच्या भडकलेल्या दरांमुळे मारामाऱ्या होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वाढलेल्या बाजारभावामुळे काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याच्याही बातम्या आहेत. त्याचवेळी वडगाव शेरी येथील भाजी मार्केटमध्ये टोमॅटोचे बाजारभाव वाढले म्हणून भाजी विक्रेता आणि ग्राहक यांच्यात जोरदार हाणामारी होऊन ग्राहक जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

सध्या बाजारामध्ये टोमॅटोला १०० रुपये किलोचा दर असून पेट्रोल-डिझेलच्या दरापुढे टोमॅटोचा दर गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. कित्येक दिवसांनंतर शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळाला असल्याने ज्या काही शेतकऱ्यांकडे याचे पीक आहे त्यांना त्याचा फायदा होत आहे. मात्र या वर्षी जास्त उत्पादनच नसल्याने टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे. साहजिकच त्याचे भाव वाढले आहेत. 

मात्र शहरातील काही नागरिकांना हे दर परवडत नसल्याचे सांगितले जात आहे. बहुराष्ट्रीय मॅकडोनाल्ड कंपनीलाही टोमॅटोच्या भावाने जेरीस आणले आहे. त्यामुळे त्यांनी टोमॅटोशिवाय बर्गर देण्याचा निर्णय घेतला आहे.  मॅक्डोनाल्ड्स इंडियाच्या उत्तर आणि पूर्व भारतातील उपाहारगृहांनी बर्गरमध्ये टोमॅटोचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे त्यावरून हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.  

राज्यातील पावसाचा अनियमितपणा, गारपीट, प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. यामुळे टोमॅटो भाव वाढले आहेत. राज्यात तसेच देशातील टोमॅटोचे भाव १२० ते दीडशे रुपयांवर गेले आहेत. घाऊक बाजारात  टोमॅटो ७० ते ८० रुपये किलो असे विकले जात आहे. किरकोळ बाजारात तो १००, १२०, १५० रुपये एका किलोने विकला जात आहे. विशेषत: उत्तर भारतात टोमॅटोच्या दरांनी अचानक उसळी घेतली असून, उत्तराखंडमधील काही शहरांत २०० ते २५० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. चेन्नईमध्ये टोमॅटो १००-१३० रुपयांवर पोहोचल्यानंतर तामिळनाडू सरकारने शिधावाटप केंद्रांवर ६० रुपये किलो दराने तो उपलब्ध करून दिला आहे. कर्नाटकातही टोमॅटोला १०१ ते १२१ रुपये इतका दर मिळत आहे. 

मुंबई परिसरातही टोमॅटोला १२० ते १६० रुपये किलो असा भाव आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत ३० ते ३५ रुपये किलो दर असलेल्या टोमॅटोचा भाव जूनअखेरीपासून वाढला. मागील दहा दिवसांत त्याचे दर चार पटीने वाढले आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यापासून टोमॅटोच्या दरांत ४४५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story