अत्यवस्थ रुग्णांवर दोन मिनिटांत उपचार

वैद्यकीय आपत्कालीन (इमर्जन्सी) स्थितीवर मात करण्यासाठी ससून रुग्णालयात कोड-ब्लू प्रणाली विकसित करण्यात आली आहे. एखाद्यास हृदयविकाराचा झटका आल्यास अथवा इतर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तिथे कोड-ब्लू पथक तातडीने पोहचून रुग्णाचा प्राण वाचवेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 17 Jun 2023
  • 01:22 am
अत्यवस्थ रुग्णांवर दोन मिनिटांत उपचार

अत्यवस्थ रुग्णांवर दोन मिनिटांत उपचार

ससून रुग्णालयात दहा-बारा दिवसांत 'कोड-ब्लू' कार्यान्वित होणार, तातडीच्या उपचाराने वाचणार प्राण

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

वैद्यकीय आपत्कालीन (इमर्जन्सी) स्थितीवर मात करण्यासाठी ससून रुग्णालयात कोड-ब्लू प्रणाली विकसित करण्यात आली आहे. एखाद्यास हृदयविकाराचा झटका आल्यास अथवा इतर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तिथे कोड-ब्लू पथक तातडीने पोहचून रुग्णाचा प्राण वाचवेल. त्यासाठी वेगवान संदेशवहन प्रणाली उभारली आहे. त्यामुळे अवघ्या १२० सेकंदात म्हणजे दोन मिनिटांत तज्ज्ञ पथक रुग्णापर्यंत पोहचण्यास मदत होईल. येत्या दहा ते बारा दिवसांत कोड-ब्लू कार्यान्वित होणार आहे. अशी सेवा कार्यान्वित करणारे ससून रुग्णालय देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरणार आहे.  

सार्वजनिक आरोग्य सेवेतील राज्यातील महत्त्वाचे रुग्णालय म्हणून ससून सर्वोपचार रुग्णालयाकडे पाहिले जाते. या रुग्णालयाची बेड क्षमता १ हजार २९६ इतकी आहे. कर्करोग, किडनी, हृदयरोग, क्षयरोग, बालरोग, स्त्रीरोग, छातीचे विकार अशा विविध रोगांवर इथे अत्यल्प दरात उपचार होतात. अनेक दुर्धर रोगांवर मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार होत असल्याने राज्यभरातून रुग्ण इथे येतात. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज ३ हजार रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्णसंख्या लक्षात घेतल्यास दररोज सात ते आठ हजार नागरिक इथे उपस्थित असतात. एखाद्या रुग्णावर तातडीने उपचार करावे लागण्याची शक्यताही अनेकदा उद्भवते. कधी रुग्णाबरोबर आलेल्या व्यक्तीलाही अचानक त्रास झाल्याने तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे असते.

एखाद्या अत्यवस्थ रुग्णासाठी पहिल्या दहा मिनिटांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. या कालावधीत वैद्यकीय मदत मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. रुग्णालयात अचानक येणाऱ्या इमर्जन्सीचा सामना करता यावा यासाठी ससूनमध्ये कोड ब्लू प्रणाली उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १५ जणांचे पथक चोवीस तास उपलब्ध असेल. या पथकात डॉक्टर, भूलरोग तज्ज्ञ, औषधशास्त्र तज्ज्ञ (एमडी मेडिसिन), नर्स आणि वॉर्डबॉय यांचा समावेश असेल. ससून रुग्णालयातील गौरव महापुरे कोड-ब्लू पथकाचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.      

याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर म्हणाले की, आपत्कालीन स्थितीमध्ये वर्तन कसे असावे, रुग्णावर कशापद्धतीने उपचार करावेत याचे प्रशिक्षण कोड-ब्लू पथकातील सदस्यांना देण्यात आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) कसा द्यावा इथपासून वेगवेगळ्या स्थितीचा सामना करण्यासाठी पथक तयार असेल. देशातील सरकारी रुग्णालयामध्ये अशा पद्धतीचे पथक प्रथमच ससून रुग्णालयात तैनात करण्यात येणार आहे.

कोड-ब्लूचे समन्वयक गौरव महापुरे म्हणाले की, हृदयाची गती मंद होणे अथवा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो. कधी इतरही कारणांमुळे अचानक वैद्यकीय मदतीची गरज भासू शकते. अशा स्थितीत रुग्णाला पहिल्या दहा मिनिटांत उपचार मिळणे आवश्यक असते. या ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार मिळाल्यास रुग्ण बचावण्याची शक्यता ४० ते ५० टक्क्यांनी वाढते. कोड-ब्लू पथकातील व्यक्तींना आपत्कालीन स्थितीत काय करावे याचे प्रशिक्षण दिले आहे. सीपीआर हा त्यातील एक भाग आहे. तातडीने संदेशवहन पोहचावे यासाठी रुग्णालयातील दूरध्वनीवर ७ क्रमांकावर संपर्क साधून माहिती देता येईल. तसेच, संपूर्ण रुग्णालय आणि कॅन्टिनमध्ये स्पीकर बसवण्यात आले आहेत. माईकवर उद्घोषणा केल्यास संपूर्ण रुग्णालयात तातडीने संदेश पोहचवता येईल. कोड-ब्लू पथक आपत्कालीनस्थळी १२० सेकंदात पोहचेल.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सीपीआरचे धडे...

अमेरिकन हार्ट असोसिएशन वेळोवेळी सीपीआरच्या मार्गदर्शक सूचनेत सुधारणा करीत असते. अशा सुधारित तंत्राची माहिती ससूनमधील सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. सध्या ससून रुग्णालयात रेसिडेंट डॉक्टर, शिकाऊ डॉक्टर, नर्सिंग, पॅरामेडिक अशा विविध विभागातील दोन हजारांहून अधिक वैद्यकीय क्षेत्राशी निगडित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा ताफा आहे. या सर्वांसाठी बेसिक लाईफ सपोर्टचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी अनेक रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत देणे शक्य होणार आहे.  

येत्या दहा ते बारा दिवसांत कोड-ब्लू कार्यान्वित होईल. हॉस्पिटल आवारात रुग्ण अथवा इतर कोणालाही अचानक त्रास झाल्यास, हे पथक तिथे धाव घेईल. रुग्णाचा जीव वाचवण्याचे काम करेल. कोड-ब्लू चोवीस तास सुरू राहील.

- डॉ. संजीव ठाकूर, 

अधिष्ठाता ससून सर्वोपचार रुग्णालय

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story