Pune airport : प्रवास अडीच तास, खोळंबा ११ तास

पुणे ते दिल्ली दरम्यानच्या अडीच तासांच्या हवाई प्रवासासाठी दीडशे प्रवाशांना तब्बल ११ तास ताटकळत बसावे लागले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एअर एशियाच्या 'आय ५७६७' या पुणे-दिल्ली विमानामुळे हा खोळंबा झाल्याची घटना समोर आली आहे. विमानाचे टायर फुटल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रवास अडीच तास, खोळंबा ११ तास

प्रवास अडीच तास, खोळंबा ११ तास

पुणे विमानतळावर एअर एशियाने घेतली संयमाची सत्त्वपरीक्षा; १५० प्रवासी पहाटेपासून दुपारी साडेतीनपर्यंत बसले ताटकळत

अनुश्री भोवरे/ इंदू भगत

feedback@civicmirror.in

TWEET@Anu_bhoware

पुणे ते दिल्ली दरम्यानच्या अडीच तासांच्या हवाई प्रवासासाठी दीडशे प्रवाशांना तब्बल ११ तास ताटकळत बसावे लागले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एअर एशियाच्या 'आय ५७६७'  या पुणे-दिल्ली विमानामुळे हा खोळंबा झाल्याची घटना समोर आली आहे. विमानाचे टायर फुटल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.

उड्डाणाच्या प्रतीक्षेत बसलेल्या प्रवाशांच्या संयम सुटत होता. कधी एकदा विमान उड्डाणासाठी सज्ज होते, याकडे नजर लाऊन बसलेल्या प्रवाशांमधील ही अस्वस्थता 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मिररच्या प्रतिनिधीने प्रवाशांशी संवाद साधला. त्यासाठी मिररच्या प्रतिनिधीने प्रवाशांशी संवाद साधला. एअरलाईनच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. प्रवाशांच्या संयमाची सत्वपरीक्षा घेतल्यावर अखेर दुपारी साडे तिच्या सुमारास या विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रयाण केले. मात्र तोपर्यंत प्रवाशांना जे भोगावे लागले, ते धक्कादायक होते. 

अचानकपणे विमानात बिघाड झाल्याचे कळवल्यामुळे प्रवाशी संतापले होते.

पुणे विमानतळाच्या व्यवस्थापकांनी मिररशी बोलताना सांगितले की, एअर एशियाचे हे विमान पुणे विमानतळावर उतरत असताना विमानाचा टायर फुटला, त्यामुळे हे सगळे घडले. त्यानंतर दुरुस्ती व तांत्रिक पथकाला पाचारण करण्यात आले. विमान कंपनीचे अधिकारी सकाळी सहापासून समस्या सोडवण्याचे प्रयत्न करत होते. दरम्यान या सगळ्या प्रकारामुळे प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्ताप भोगावा लागला.

एअर एशियाच्या पुणे-दिल्ली विमानाने दिल्लीला जाण्यासाठी सुमारे १५४ प्रवासी ( एका लहान मुलासह) विमानतळावर दाखल झाले होते. मात्र उड्डाणाला उशीर झाल्याने यातील २९ प्रवाशांनी आपले तिकीट रद्द करून इतर पर्याय निवडण्यास पसंती दिली. अशा प्रवाशांना एअर रशियाने त्यांचे तिकिटाचे संपूर्ण पैसे परत दिले. उड्डाणाची वेळ पुढे सरकल्यामुळे बऱ्याच प्रवाशांना त्यांची नियोजित कामे पुढे ढकलावी लागली आहेत.    

एअर एशियाकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. विमान नियोजित वेळेपेक्षा तिप्पट उशिराने निघाले. दरम्यान प्रवासी विमान नक्की कधी निघणार याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांकडे आणि संकेतस्थळावर सातत्याने विचारणा करत होते, दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते झाले की विमान निघेल, या एका कारणाशिवाय आम्हाला काहीच प्रतिसाद दिला जात नव्हता, अशी माहिती प्रवाशांनी मिररशी बोलताना दिली आहे.

एअर एशियाचे हे विमान पकडण्यासाठी आम्ही पहाटे साडेचार वाजता विमानतळावर हजर झालो होतो. सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया पार पडल्यानंतर समजले की, या विमानाचे उड्डाण लांबले आहे. त्यामुळे वेड्यासारखी वाट पाहण्याशिवाय आमच्या हातात दुसरा पर्याय नसल्याची व्यथा प्रशांत नावाच्या प्रवाशाने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. उड्डाणाला तब्बल ९ तास उशीर झाला आहे, बोर्डिंग प्रक्रिया गृहीत धरल्यास आम्ही तब्बल ११ तास विमानतळावर प्रतीक्षा करत बसलो. यामुळे मला माझे दिल्लीतील काम पुढे ढकलावे लागल्याचेही प्रशांत यांनी नमूद केले आहे.  

मला तातडीने दिल्लीत पोहचणे गरजेचे होते म्हणून मी निघालो होतो. उड्डाण लांबल्याने माझे दिल्लीतील काम मला रद्द करावे लागले आहे. माझ्यासोबत काही आजारी प्रवासीही विमानतळावर वाट पाहात बसून होते. त्यांना किती मनस्ताप सहन करावा लागला आहे, या मनस्तापाची, झालेल्या नुकसानाची भरपाई कोण करणार आहे? अशा शब्दांत आणखी एका प्रवाशाने नाव न सांगता मिररकडे आपला संताप व्यक्त केला आहे.  

एअर एशियाने या विलंबाबाबत खुलासा केला आहे. प्रवाशांना तिकिटाचे संपूर्ण पैसेही परत केले आहेत. विलंबाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. विमान प्रवासाला विलंब होणे नित्याची बाब आहे, मात्र अचानकपणे झालेल्या विलंबामुळे आणि तब्बल ११ तास ताटकळत बसावे लागल्याने प्रावाशांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. उड्डाणापूर्वी प्रवाशांनी विमानतळावर वेळेवर पोहचणे अपेक्षित असते, मात्र विमान सेवा देणाऱ्या कंपनीकडून उशीर झाला तर कसा काय चालतो, असा सवालही या निमित्ताने प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story