लोहगडावर चार तास पर्यटक अडकले, चेंगराचेंगरी टळली

पुण्यातील लोणावळा येथील पर्यटकांचे लोहगड हे आवडते ठिकाण आहे. रविवारी (२ जुलै) सुट्टी असल्याने हजारो पर्यटक किल्यावर पर्यटनासाठी आल्याने मोठा गोंधळ उडाला. गडावर पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसल्याने गोंधळ उडाला. गडावर चेंगरा-चेंगरी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल चार तास गडावर गोंधळाचे वातावरण होते. येथील गोंधळाचा व्हीडीओदेखील व्हायरल झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 4 Jul 2023
  • 06:23 am
लोहगडावर चार तास पर्यटक अडकले, चेंगराचेंगरी टळली

लोहगडावर चार तास पर्यटक अडकले, चेंगराचेंगरी टळली

किल्ल्याच्या महादरवाजासमोर चार तासांचा खोळंबा, नियोजना अभावी अपघाताची शक्यता

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पुण्यातील लोणावळा येथील पर्यटकांचे लोहगड हे आवडते ठिकाण आहे. रविवारी (२ जुलै) सुट्टी असल्याने हजारो पर्यटक किल्यावर पर्यटनासाठी आल्याने मोठा गोंधळ उडाला. गडावर पाय ठेवण्यासाठी देखील जागा नसल्याने गोंधळ उडाला. गडावर चेंगरा-चेंगरी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तब्बल चार तास गडावर गोंधळाचे वातावरण होते. येथील गोंधळाचा व्हीडीओदेखील व्हायरल झाला आहे.

रविवारीही शहरातील अनेकांनी लोणावळा परिसरातील लोहगडावर मोठी गर्दी केली होती. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोहगडावर पर्यटकांची संख्या वाढल्याने हजारो पर्यटक किल्यावर अनेक तासांसाठी अडकून पडले होते. अक्षरशः पाऊल ठेवायलाही जागा शिल्लक नसल्याचे व्हायरल झालेल्या व्हीडीओ आणि छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे. या निमित्ताने पुणे ग्रामीण पोलिसांनी 'सीविक मिरर'च्या माध्यमातून पर्यटकांना नियमांचे पालन करून सहलीची मौज लुटण्याचे आवाहन  केले आहे.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात मान्सून बरसला आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गड-किल्ले, घाट वाटा, नुकत्याच सुरू झालेल्या धबधब्यांच्या परिसरात सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची दिवसभर वर्दळ दिसत आहे. पुणे आणि मुंबई जवळील पश्चिम घाटाच्या सह्याद्री रांगेत वसलेले लोणावळा, आजूबाजूला अनेक  धबधबे, तलाव, डोंगररांगा असून ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. या पावसाची विविध रुपे न्याहाळत स्वच्छंदपणे फिरण्यासाठी लोहगडला पसंती दिली जाते. आठवडाभरात ताण तणाव विसरून मनाला प्रफुल्लित करण्यासाठी येथे पर्यटकांची झुंबड उडते. ३ हजार फुटाहून अधिक उंचीवर असलेला लोहगड किल्ला हा पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे.  प्राचीन वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्याचे परिपूर्ण मिश्रण यथे पाहायला मिळत असल्याने पर्यटक येथे गर्दी करतात. रविवारीही लोहगडावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यात चार तासांपर्यंत पर्यटक अडकले होते. मात्र यात सुदैवाने चेंगराचेंगरी होऊन दुर्घटना टळली.

या निमित्ताने गडावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गर्दीची शक्यता लक्षात घेत गडावरील सुरक्षा व्यवस्थेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. गडावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज पर्यटकांनी व्यक्त केली आहे. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड यासह मुंबई येथून पर्यटक वर्षाविहारासाठी लोणावळा, खंडाळा, लोहगड, भाजे या ठिकाणी आले होते. त्यामुळे लोहगडावरती प्रचंड गर्दी झाली होती. त्यांचे प्रमाण इतके मोठे होते की पर्यटकांना बाहेर निघण्यासाठी जागा नव्हती. पाय ठेवायला देखील जागा नव्हती. अखेर सर्वांनी एकमेकांशी समन्वय साधत यातून मार्ग काढत पर्यटक गडाच्या खाली आले. या निमित्ताने गडावरील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. लोणावळा शहर असेल किंवा ग्रामीण पोलीस असेल यांनी अशा घटनांकडे लक्ष देण्याची  गरज असल्याचे पर्यटक बोलत आहेत. याकडे असेच  दुर्लक्ष केले तर चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे ती उणीव भरून काढण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था, तरुण कार्यकर्ते, पोलीस मित्र यांची मदत घेतली जात आहे. परंतु प्रत्येकाने नियम पाळले तर पोलिसांना दंडात्मक कारवाई करण्याची वेळच येणार नाही. आमचे बरेच कर्मचारी पंढरपूर बंदोबस्तात व्यस्त होते, त्यामुळे थोडी अडचण आली. मात्र यापुढे अधिक काळजी घेतली जाईल, अशी माहिती पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story