Gateman saved life : आजारपणास कंटाळलेल्या वृद्धेचा रेल्वेखाली येऊन होता जीवन संपविण्याचा प्रयत्न, दाम्पत्याने आणि गेटमनने वाचवले वृद्धेचे प्राण

वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धेला एका दाम्पत्याने प्रसंगावधान दाखवत गेटमनच्या मदतीने वाचवले. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता उरुळी कांचन येथे घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 13 May 2023
  • 01:27 pm
आजारपणास कंटाळलेल्या वृद्धेचा रेल्वेखाली येऊन होता जीवन संपविण्याचा प्रयत्न, दाम्पत्याने आणि गेटमनने वाचवले वृद्धेचे प्राण

आजारपणास कंटाळलेल्या वृद्धेचा रेल्वेखाली येऊन होता जीवन संपविण्याचा प्रयत्न, दाम्पत्याने आणि गेटमनने वाचवले वृद्धेचे प्राण

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धेला एका दाम्पत्याने प्रसंगावधान दाखवत गेटमनच्या मदतीने वाचवले. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता उरुळी कांचन येथे घडली. 

उरुळी कांचन येथील कोरेगाव मूळ गावातील दीपाली राजकुमार सिंग (वय ६२) या आजारपणाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होत्या. ही घटना बुधवारी  (दि. १०) मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यानची आहे. जीवन संपविण्याच्या विचाराने त्या लोहमार्गावर बसल्या होत्या. यावेळी रेल्वे फाटकाशेजारी राहणाऱ्या समीर घावटे आणि सुप्रिया घावटे या दाम्पत्याला ही बाब खटकली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत गेटमनच्या मदतीने दीपाली यांना आत्महत्या करण्यापासून रोखले. तसेच लोणी काळभोर येथील पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. या सर्वांनी दीपाली यांची समजूत काढत धीर दिला. या जगण्यावर या जन्मावर प्रेम शतदा करावे असे सकारात्मक विचार सांगून त्यांचे मन वळवून त्यांना घरी सुखरूप पोहचवले.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली सिंग पतीसोबत कोरेगाव मूळ येथील कांचन गृह सोसायटीत राहतात. त्यांना दोन मुले असून, ते दोघेही उच्च शिक्षित आहेत. एक मुलगा बंगळुरू येथे अभियंता आहे.

दुसरा मुलगा कमांड रुग्णालय येथे कामास आहे. दीपाली यांना मधुमेह, सांधेदुखी यासारखे अनेक आजार आहेत. दीपाली गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांचे पती आणि दीपाली हे दोघेही घरीच असतात. आजारपण आणि पतीशी झालेल्या वादाने त्या मध्यरात्री कोरेगाव मूळ परिसरातील लोहमार्गावर आल्या. ही बाब फाटकाशेजारी राहणाऱ्या घावटे दाम्पत्याने पाहिली. कर्तव्यावर असलेल्या गेटमनसह त्यांनी दीपाली यांना लोहमार्गावरून बाजूला नेले. आजारपणामुळे दीपाली यांना नीट चालता येत नव्हते. घावटे दाम्पत्याने आणि गेटमनने त्यांना धीर दिला. 

त्यांनी येथील पोलीस पाटील वर्षा कड, सचिन कड तसेच लाेणी काळभोर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक किरण धायगुडे यांना फोन करून घटनेची माहिती कळविली. रात्रपाळीवर असलेले पोलीस नाईक रमेश गायकवाड, म्हाळगे यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेची समजूत काढली. दीपाली यांना धीर देऊन त्यांना घरी सोडण्यात आले. घावटे दाम्पत्य आणि गेटमन यांच्या प्रसंगावधानाने आणि पोलिसांच्या तातडीच्या मदतीमुळे दीपाली यांचे प्राण वाचले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story