तीन तास, वाहतूक कोंडीचा त्रास
अनुश्री भोवरे
anushree.bhoware@punemirror.com
TWEET@Anu_bhoware
बेशिस्त वाहतूक, वाहनचालकांचा हलगर्जीपणा, नियमांचे पालन न करता केवळ आपलेच वाहन पुढे दामटण्याचा अट्टहास आणि वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार अशा अनेक कारणांमुळे एनआयबीएम परिसरातील रहिवाशांना शुक्रवारी संध्याकाळी अत्यंत त्रासदायक वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.
एनआयबीएम रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी साधारणतः ७ वाजता वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. रात्री ९ः३० पर्यंत येथील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे अडीच ते तीन तास कोंडीत अडकल्याने वाहनचालकांची चांगलीच चिडचिड झाली. अनेकांना इच्छितस्थळी पोहोचण्यास खूप उशीर झाला, तर काही लोक त्यांचा बेत रद्द करून पुन्हा घरी परतताना दिसले. स्थानिक रहिवासी सुनील कोलोटी यांनी सांगितले की, पुणे कँटोन्मेंटपासून जे अंतर कापायला एरवी २५ मिनिटे लागतात, तिथे तब्बल दीड तासाचा वेळ लागत होता. यामुळे वाहनचालकांना काय करावे तेच सुचत नव्हते.
कोलोटी त्यांचा त्रागा व्यक्त करताना म्हणाले की, 'कमांडंट हॉस्पिटल ते लुल्लानगर आणि वानवडी ते एनआयबीएम रस्ता या संपूर्ण प्रवासात प्रत्येक चौकात आणि प्रत्येत वळणावर मी कोंडीत अडकलो होतो. अत्यंत संथ गतीने वाहतूक पुढे सरकत होती.' वाहतूक कोंडी होण्याचे प्राथमिक कारण म्हणजे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहनचालकांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे वाहन चालवणे आणि इतर वाहनांना जाण्यासाठी वाट मोकळी न ठेवणे हे आहे, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वाहतूक कोंडीचा फटका आपत्कालीन सेवा आणि त्यांच्या वाहनांही मोठ्या प्रमाणावर बसला. वाहनांच्या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकून पडली होती. दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडलेले पोलीस अधिकाऱ्यांचे वाहनही या कोंडीत अडकले होते. अखेर काही स्थानिकांच्या प्रयत्नातून रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी मार्ग मिळाला. त्यानंतर पोलिसांचे वाहनही कोंडी फोडून बाहेर पडले.
काही पोलीस अधिकारी या कोंडीची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, पालिकेने वेळीच रस्ता रुंदीकरण न केल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरत होते. सुनील कोलोटी यांच्यासह याच भागातील आणखी काही नागरिकांनी याबाबत आपली तक्रार मांडली. ते म्हणाले, 'एनआयबीएम ते मोहम्मदवाडी या रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करणे आवश्यक आहे. या मार्गावर जड वाहतूकही केली जाते. परिणामी वारंवार वाहतूक कोंडीसारखे प्रकार घडतात. शिवाय, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे आणि वारंवार कोंडी होऊ नये यासाठी दुभाजक करण्याचीही आवश्यकता आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.