Mokka Act : मोक्काअंतर्गत तुरुंगात असलेल्या मित्राच्या जामिनासाठी तिघांनी फोडली मंदिराची तिजोरी

मोक्काअंतर्गत तुरुंगात असलेल्या गुन्हेगार मित्राला जामिनावर बाहेर काढण्यासाठी मंदिराची दानपेटी फोडल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात उघडकीस आली आहे. तुरुंगात असलेल्या मित्राला जामिनावर बाहेर काढण्यासाठी पैशांची गरज असल्याने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 7 May 2023
  • 05:53 pm
मोक्काअंतर्गत तुरुंगात असलेल्या मित्राच्या जामिनासाठी तिघांनी फोडली मंदिराची तिजोरी

मोक्काअंतर्गत तुरुंगात असलेल्या मित्राच्या जामिनासाठी तिघांनी फोडली मंदिराची तिजोरी

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

मोक्काअंतर्गत तुरुंगात असलेल्या गुन्हेगार मित्राला जामिनावर बाहेर काढण्यासाठी मंदिराची दानपेटी फोडल्याची धक्कादायक घटना कोंढव्यात उघडकीस आली आहे. तुरुंगात असलेल्या मित्राला जामिनावर बाहेर काढण्यासाठी पैशांची गरज असल्याने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शत्रुंजय जैन मंदिरात २६ एप्रिल रोजी रात्री नऊ ते २७ एप्रिल रोजी सकाळी सहाच्या दरम्यान दानपेटी फोडून पैशांची चोरी केल्याची घटना घडली होती. रात्री मंदिर बंद असताना चोरट्यांनी मंदिराच्या दक्षिण दरवाज्याकडील खिडकीची काच फोडली. खिडकीतून ते मंदिरात घुसले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मंदिरातील चार दानपेट्या फोडून त्यातील रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार मंदिराचे व्यवस्थापक राजकुमार बन्सीलाल राजपूत यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिली होती. यांच्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान अंतर्गत कलम ४५७ आणि ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद दाखल करून घेताच पोलिसांनी तपासास सुरुवात केली.

कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत होते. २८ एप्रिल रोजी तपास पथकाचे पोलीस सुरज शुक्ला आणि अनिल बनकर यांना  खबऱ्यांकडून आरोपींविषयीची माहिती मिळाली. नारायण मारुती गवळी ऊर्फ नान्या (रा. टिळेकरनगर कोंढवा बु.), आदित्य गाडे (रा. पौड फाटा, कोथरूड), यश परदेशी (रा. पौड रोड) यांनी त्यांच्या साथीदारांसह गुन्हा केल्याचे समजले. यातील नारायण मारुती गवळी ऊर्फ नान्या हा काळ्या रंगाचा टी शर्ट आणि बर्मुडा घालून इस्कॉन मंदिरामागील पाण्याच्या टाकीजवळ थांबला असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच तपास पथकाच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी करताच नान्याने गुन्ह्यातील आरोपी हसन मगदुम बादशाह ईटगी (वय १८, रा. संतोषनगर चर्चजवळ, कात्रज), तेजस दीपक सणस ऊर्फ चिक्या (वय १९, रा. सुमती बालवन शाळेशेजारी सणसनगर, कात्रज) आणि आदित्य राजू गाडे (वय १८, रा. खडकेश्वर महादेव मंदिरासमोर, केळेवाडी-पौडफाटा, कोथरूड) यांची नावे सांगितली. या तिघांना अटक करण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या रकमेपैकी ३७ हजार रुपये गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आले.  

 ऋषिकेश गाडे ऊर्फ हुक्या हा आरोपी सध्या मोक्काअंतर्गत तुरुंगात आहे. त्याला जामिनावर बाहेर काढण्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याने या आरोपींनी ही चोरी केल्याचे समोर आले आहे. ऋषिकेश ऊर्फ हुक्या (रा. व्हीआयटी कॉलेजच्या मागे, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने स्वत:च्या नेतृत्वाखाली संघटित केलेल्या त्याच्या टोळीने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि  पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे केले आहेत.

परिमंडळ पाचचे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे आणि इतर अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाने ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story