Potholes in heavy rains : भरपावसात खड्डयांवर थिगळांचा उपाय

शहरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली त्याला महिनाही झालेला नाही. मात्र, एवढ्याशा आणि पावसाळ्याच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. कोट्यवधीचा खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते पहिल्याच पावसात खड्डेमय, जलमय झाल्याने महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पथ विभागाला फैलावर घेत चार दिवसांच्या आत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Thu, 20 Jul 2023
  • 11:03 pm
भरपावसात खड्डयांवर थिगळांचा उपाय

भरपावसात खड्डयांवर थिगळांचा उपाय

अफाट खर्चानंतरही पालिकेचा दावा पडला उघडा, रस्त्यांची झाली चाळण, पावसातच सुरू आहे खड्डेमुक्तीचे मिशन

महेंद्र कोल्हे/ नितीन गांगर्डे 

mahendra@punemirror.com

nitin.gangarde@civicmirror.in

शहरात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली त्याला महिनाही झालेला नाही. मात्र, एवढ्याशा आणि पावसाळ्याच्या सुरवातीस झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागली आहे. कोट्यवधीचा खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते पहिल्याच पावसात खड्डेमय, जलमय झाल्याने महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी पथ विभागाला फैलावर घेत चार दिवसांच्या आत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले. अचानकपणे रस्त्याची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी रस्त्यांवर खड्डे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे लगबगीने रस्त्यावरील जलमय खड्डे बुजवण्याचे कामकाज सुरु आहे. मात्र हे काम घाईगडबडीत पूर्ण करण्यात येत असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे, निव्वळ थिगळ लावल्याचे पाहावयास मिळते.

 वानवडी, पद्मावती रस्ता, स्वारगेट चौकातील, सारसबाग, डेंगळे पूल येथील आणि शहरातील इतर अनेक भागातील रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरु असल्याचे दिसते. मात्र हे काम पावसातच सुरु असून खड्ड्यात पाणी असतानाच त्यात वरून खडी, डांबर यांचे मिश्रण ओतले जात आहे. खड्ड्यात ओतलेले मिश्रण हे खड्ड्यात चिवटपणे बसून रस्त्याशी एकजीव होण्यासाठी विशेष योग्य ती काळजी घेण्यात आली नसल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. जोराचा पाऊस आल्यास खड्ड्यात भरलेले मिश्रण हे पुन्हा वाहून जाण्याची शक्यता आहे. खड्डे अत्यंत घाईगडबडीत बुजवले जात असल्याने ते व्यवस्थित दुरुस्त करण्यात आले नाही. त्यामुळे बजावलेल्या खड्यांच्या जागी उंचवटे पाहावयास मिळतात. बेजबाबदारपणे केलेल्या या कामाचा दुचाकीस्वारांना अडथळा  येत आहे.

  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की ३१ मे पूर्वी दुरुस्ती न केलेल्या खड्ड्यांची तेथील रस्त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित रस्त्यांची जबाबदारी असलेल्या अभियंत्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे शहरातील रस्त्यांची अचानक तपासणी करणार आहेत. रस्त्यांवर खड्डे  आढळल्यास त्यांना थेट नोटीस बजाविण्यात येणार असून संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. तसेच, शहरात पाऊस सुरू असल्याने महत्वाच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीसाठी पाण्यातही खड्डे दुरुस्त करता येणाऱ्या कोल्डमिक्सचा वापर केला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची चाळण झाली होती. त्यानंतर महापालिकेने तब्बल साडेतीनशें कोटी रुपये खर्च करून १०० किलोमीटरच्या रस्ते दुरुस्तीच्या निविदा काढून रस्ते मुळापासून रस्ते उखडून दुरुस्त केले आहेत. मात्र त्यानंतरही अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे आहेत. त्यातच, हे खड्डे दुरुस्त करताना हॉटमिक्स पाणी साचलेल्या खड्ड्यात टाकले जात आहे. त्यामुळे खड्ड्यात केवळ खडीच राहत असून पुन्हा पुन्हा रस्ते खड्डेमय होत आहेत. नागरिकांना नाहक खड्ड्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. पाऊस सुरू असल्याने कोल्डमिक्सचा वापर करून खड्डे बुजविले जाणार आहेत.  पाऊस थांबताच हॉटमिक्सचा वापर करून रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त  विकास ढाकणे यांनी दिली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story