Thieves are now on 'red gold' : ‘लाल सोन्या’वर आता चोरट्यांचा डल्ला

बाजारात टोमॅटोची आवक घटल्यामुळे दर वर्षीपेक्षा यंदा टोमॅटोला जास्त बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे सध्या केवळ टोमॅटो आणि त्याची भाववाढ हाच चर्चेचा विषय असल्याचे पाहायला मिळते आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Thu, 20 Jul 2023
  • 11:07 pm
‘लाल सोन्या’वर अाता चोरट्यांचा डल्ला

‘लाल सोन्या’वर आता चोरट्यांचा डल्ला

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या २० क्रेट टोमॅटोंची चोरी; ४० हजारांचे नुकसान

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

बाजारात टोमॅटोची आवक घटल्यामुळे दर वर्षीपेक्षा यंदा टोमॅटोला जास्त बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे सध्या केवळ टोमॅटो आणि त्याची भाववाढ हाच चर्चेचा विषय असल्याचे पाहायला मिळते आहे. यावरून चर्चा, आरोप-प्रत्यारोप होत असताना आणि पुण्यात टोमॅटोवरून चांगलीच मारामारी झाल्याची घटना ताजी असतानाच आता जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचे टोमॅटो क्रेटच चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. पिंपरी खेड येथील अरुण बाळू ढोमे यांच्या दारातून विक्रीसाठी ठेवलेल्या टोमॅटोच्या २० क्रेटची चोरी झाली आहे.या प्रकरणी त्यांनी गावातील पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाटे आणि टाकळी हाजी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

टोमॅटोच्या बाजारभाव वाढला असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळत आहे. मात्र, शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील ढोमे या शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी ठेवलेल्या २० क्रेटमधील टोमॅटो चोरांनी चोरून नेले आहेत. याबाबत 'सीविक मिरर'शी बोलताना ढोमे यांनी सांगितले की, माझी ३० गुंठे टोमॅटोची शेती आहे. टोमॅटोची विक्री करण्यासाठी मी दुपारी शेतात जाऊन माल तोडला. तेथेच त्यांची निवड करून क्रेट भरले. ते घरी आणेपर्यंत साडेसात वाजले होते. मालगाडीत क्रेट भरून ती घरासमोरच लावली होती. त्यात एकूण २० क्रेटएवढा माल होता. रात्री ११ वाजेपर्यंत टोमॅटो गाडीतच होते. त्यानंतर सकाळी विक्रीला नेण्यासाठी उठून पाहिले तर, गाडीतून टोमॅटो क्रेटसहित गायब झाले होते. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

चोरी झालेल्या मालाची आजच्या बाजारभावानुसार अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे ढोमे यांनी सांगितले. या घटनेबाबत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध करण्यात आली आहे. या वेळी ढोमे यांनी सांगितले की, 'अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोठे भांडवल उभे करून टोमॅटो पिकाची लागवड केली होती. त्यांच्या निगराणीसाठी अक्षरशः जीवाचे रान केले. अनेकदा शेतीमाल कवडीमोलाने विकला जातो. यावेळी चांगला भाव आला. मात्र, मालाचीच चोरी झाल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे.' ढोमे यांनी पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप बोंबे यांना घटनेची माहिती देत टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे फिर्याद दाखल केली असून, घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

दरम्यान, यंदा उष्णतेच्या लाटेमुळे व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यामुळेच मार्च-एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटोच्या किमती घसरल्या. आता त्यांची मागणी तेवढीच आहे पण, नुकसान झाल्याने पुरवठा कमी झाला आहे. टोमॅटोच्या किमती वाढण्यामागचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पिकांवर आलेला रोग. तापमानवाढ आणि अवकाळी पाऊस यामुळे एका विशिष्ट प्रजातीच्या पांढऱ्या, छोट्या किड्यांची वाढ झाली असून, त्यांचा पिकावर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घसरण झाली आणि किमती वाढल्या आहेत.  पावसामुळेदेखील दक्षिण भारतातून टोमॅटो आयात करण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वाभाविकपणे मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र बिघडले की, दर कमी-जास्त होतात. टोमॅटोच्या बाबतीत हेच घडले आहे. 

राज्यात टोमॅटोच्या पिकाखाली सर्वसाधारणतः ५६-५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात ४० ते ४२ हजार हेक्टर, तर रबी व उन्हाळी हंगामात साधारणपणे १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून १० लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असते. वेगवेगळ्या कारणामुळे ते घटले आहे. सध्या शेतकऱ्यांनी नवीन टोमॅटोची लागवड केली आहे. लवकरच म्हणजे ऑगस्टच्या शेवटी नवीन टोमॅटो बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यावेळी एवढी भाववाढ नसेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story