डोळ्यांतील पाणी थांबेना; टाक्यांत मात्र येईना

उंड्री येथील एनआयबीएम रस्त्यावर डीमार्ट मॉलच्या समोर पुणे महानगरपालिकेने तीन पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे काम सुरू होते. आता काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही त्यामध्ये पाणी आलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या टाक्या कोरड्या, ठणठणीत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 20 Jun 2023
  • 11:41 pm
डोळ्यांतील पाणी थांबेना; टाक्यांत मात्र येईना

डोळ्यांतील पाणी थांबेना; टाक्यांत मात्र येईना

उंड्रीतील तीन टाक्यांचे काम पूर्ण होऊनही त्या पाण्यािवना कोरड्याठक्कच; टाक्या बनल्या कचराकुंडी, दारूड्यांचा अड्डा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

उंड्री येथील एनआयबीएम रस्त्यावर डीमार्ट मॉलच्या समोर पुणे महानगरपालिकेने तीन पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे काम सुरू होते. आता काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही त्यामध्ये पाणी आलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या टाक्या कोरड्या, ठणठणीत आहेत. पाण्याऐवजी त्यामध्ये कचरा, दारूच्या बाटल्या, सिगारेटची थोटके यांचा खच पडलेला दिसून येत आहे. येथील कुंपणाचे फाटक नेहमी उघडेच असल्याचे 'सीविक मिरर'च्या पाहणीत आढळून आले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी येथे सुरक्षारक्षकही तैनात नसल्याने टाक्यावर आता मद्यपींनी अड्डा केल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.

पुणे शहरात २४ बाय ७ या योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी एकूण ८२ टाक्या बांधण्याचे नियोजनात आहे. त्यापैकी येथील तीन टाक्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, अजूनही त्यामध्ये पाणी आले नाही. या परिसरातील उंच भागावरील सोसायट्यांमध्ये पाणी येत नाही. यात सिंहगड वडगाव या दिशेने पाणी येणार आहे. अजूनही ते आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अजूनही कमी दाबाने पाणी येत आहे, तर काही भागात नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. रईजा चौकातील सोसायट्यांना याची मोठी झळ बसत आहे. लवकरात लवकर येथील टाक्यांचे काम करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे  असे प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले.

तीन एमएलडी, अडीच एमएलडी आणि दीड एमएलडी क्षमतेच्या तीन टाक्या आहेत. त्यांचे पाणी मोहम्मदवाडी, उंड्री या भागातील नागरिकांना देण्यात येणार आहे. मोहम्मदवाडीच्या खिंडीतून आलेली जलवाहिनी वनविभागाने काढली आहे. तेथील जागा वनविभागाकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली नाही. त्यासाठी वनविभागाकडे येथील जागेबाबत व्यवहार सुरू आहे. तिची मागणी चालू असून, ते काम अंतिम टप्प्यात आहे. शिवाय पुढे मोहम्मदवाडी गावठाणाची जागा आहे, ती भैरवनाथ ट्रस्टची जागा आहे. तिथे ग्रामस्थांनी जलवाहिनीचे काम अडवले आहे. यातील ट्रस्टींमध्ये वाद असल्याने चॅरिटी कमिशनरने स्टे आणला आहे. त्यामुळे येथे कुठल्याच प्रकरचे खोदाईकाम किंवा इतर काम करता येत नाही. त्यांच्यासोबतही प्रशासनाचे बोलणे सुरू आहे. थोड्या जागेची अडचण येत आहे. अजून महानगरपालिकेच्या ताब्यात जागा आली नसल्याने काम लांबत असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

'शहरात सर्वत्र अशी परिस्थिती असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे अनेक ठिकाणी योग्य पाणी पुरवठा होत नाही. आता पाऊसही लांबला आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण केले पाहिजे. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. महानगरपालिकेने ही सगळी काो युद्धपातळीवर हातात घेऊन लवकरात लवकर पूर्णत्वाला नेली पाहिजेत', अशी भावना आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केली.      

'उंड्रीचा परिसर पंचवीस वर्षांपूर्वी महापालिकेच्या हद्दीत आला आहे. गेल्या दहा वर्षांत आरसीमध्ये विस्तार झाला आहे. या ठिकाणी अनेक सोसायट्या वाढल्या आहेत. परंतु, दुर्दैवाने या भागातील लोकांना मूलभूत सुविधा देण्यात पालिका अपयशी ठरली आहे. प्रत्यक्षात टाक्या बांधल्या गेल्या असल्या, तरी राजकीय अनास्था, टँकर लॉबी यामुळे ढिसाळ प्रशासन हे जलवाहिनी टाकण्यास विलंब करत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून टँकरने पाणी घ्यावे लागत आहे, असे आशिष जगताप यांनी संगितले.

तीन वर्षांपूर्वी येथील पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम  पूर्ण झाले आहे. मात्र, नागरिकांना अजूनही स्थानिक विक्रेत्यांकडून टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे दर महिन्याला नागरिकांच्या खिशाला मोठा भुर्दंड बसत असल्याचे दानिश खान यांनी सांगितले.

संतोषनगर येथे पाण्याच्या जलवाहिनेचे काम सुरू आहे. त्याचे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत काम पूर्ण होईल. या टाक्या पाणी पिण्यासाठी उपलब्ध करण्यात येतील, असे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story