Khadakwasla dam : दोघी हाताला लागल्या नाहीत, नाहीतर

खडकवासला धरणाच्या पाण्यात दोघी माझ्या हाताला लागल्या नाहीत, नाहीतर सातहीजणींना वाचवता आले असते, असे संजय सीताराम माताळे (वय ६०, रा. गोऱ्हे खुर्द, ता. हवेली) सांगत होते. गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या पण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या सातपैकी चार मुली व एक महिला अशा पाच जणींना देवदूत बनून आलेले शेतकरी संजय सीताराम माताळे यांनी प्रसंगावधान दाखवून धाडसाने वाचवले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 16 May 2023
  • 03:19 pm
दोघी हाताला लागल्या  नाहीत, नाहीतर

दोघी हाताला लागल्या नाहीत, नाहीतर

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आलेल्या शेतकऱ्याला खडकवासला धरणात बुडणाऱ्या मुलीचा आवाज ऐकू आला अन्, पाण्यात झेपावत सातपैंकी पाच जणींना त्याने दिले जीवनदान

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

खडकवासला धरणाच्या पाण्यात दोघी माझ्या हाताला लागल्या नाहीत, नाहीतर सातहीजणींना वाचवता आले असते, असे संजय सीताराम माताळे (वय ६०, रा. गोऱ्हे खुर्द, ता. हवेली) सांगत होते. गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या पण पाण्याचा अंदाज न आल्याने  बुडणाऱ्या सातपैकी चार मुली व एक महिला अशा पाच जणींना देवदूत बनून आलेले शेतकरी संजय सीताराम माताळे यांनी प्रसंगावधान दाखवून धाडसाने वाचवले. 

दोघींना वाचवण्यात अपयश आल्याची काहीशी खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. या घटनेनंतर मित्र, नातेवाईकांचे खूप फोन आले. मनापासून अभिनंदन करत होते. जीवदान देण्याचे खूप चांगले आणि माणुसकीचे काम केल्याचे सगळेजण सांगत होते. एवढे सारे करताना त्या दोघींनाही वाचवता आले असते तर दुधात साखर पडली असती, असेही माताळेंचे म्हणणे.

 घटनास्थळाच्या जवळ शंभर मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत राख सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी संजय माताळे आले होते. या कार्यक्रमास जवळजवळ दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते. राख सावडण्याचा कार्यक्रम सुरू असताना संजय माताळे यांना अचानक जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकू आला. माताळे आवाजाच्या दिशेने बाहेर पळत गेले. त्यांना मुली पाण्यात बुडत असलेल्या दिसल्या. यावेळी ज्यासाठी आपण आलो त्या कार्यक्रमाची आणि आपल्या  जिवाची पर्वा न करता त्यांनी पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत राजेंद्र जोरी, कालिदास माताळे, शिवाजी माताळे व रमेश भामे हे स्थानिक नागरिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आले होते. संजय माताळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुली व एका महिलेला एक-एक करून पाण्याच्या कडेला आणले आणि काठावरच्या नागरिकांकडे सोपवले.

माताळे म्हणाले, मुली बुडाल्या तेथील पाणी गढूळ झाले होते. खोल भाग असल्याने त्यांना बाहेर काढायला अडचण येत होती. 

लवकर लवकर मुलींना पाण्यातून शोधून बाहेर काढायला वेळ लागत होता. बुडालेल्या मुलींना एक एक करत माताळे यांनी पंधरा मिनिटातच बाहेर काढले. पाणी गढूळ झाल्याने मुली कोठे असतील याचा नेमका अंदाज येत नव्हता. त्यामुळे बुडालेल्या दोघींचा लवकर शोध लागला नाही. अन्यथा, त्या दोघींनाही वाचवता आले असते. सात मुलीतील पाचजणींना बाहेर काढल्यावर बाकीच्या दोन मुलींचा शोध घेतला, मात्र, यश मिळाले नाही, असे माताळे सांगत होते. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी या दोन मुलींना शोधून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत खूप वेळ झाली होती. त्या मुलींचा श्वास थांबला होता. 

खडकवासला धरणावर कपडे धुण्यासाठी आलेल्या या मुली व महिला अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. तेथील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. त्यातील दोन मुलींनी बुडतानाही वाचवा वाचवा असा आरडा-ओरडा केला. माताळे मुलींजवळ जाताच त्या गटांगळ्या खात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या मुलींच्या नाका-तोंडात पाणी गेले होते. संजय यांनी क्षणाचाही विचार न करता पाण्यात मुलींच्या दिशेने झेप घेतली. बुडणाऱ्या मुलींना ते पाण्यातून बाहेर काढू लागले.  एक एक करत असे पाच बुडणाऱ्या मुलींना बाहेर काढले. या मुलींना बाहेर काढले तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेले होते. बाहेर काढल्यानंतर धरणाच्या काठावरच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. संजय यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या मुलींचे प्राण वाचले आहेत. संजय हे त्यांच्यासाठी देवदूतच ठरले. ही घटना क्षणात सगळीकडे पसरल्याने ग्रामस्थांकडून माताळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नातेवाईक, मित्रांनीही केलेल्या कौतुकात माताळे सध्या चिंब भिजले आहेत. माताळे म्हणतात, मी हिरो नाही, मी योग्य वेळी घटनास्थळी पोहचलो. खडकवासला धरणात बुडणाऱ्या बहुतांश मुलींना वाचवण्यात यश आले असले तरी  इतर दोन मुलींना वाचवता आले नाही याची खंतही आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story