क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातच साचले तळे
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
नालेसफाई आणि इतर उपाययोजना राबवूनही रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने कात्रजमधील कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय असलेल्या इमारतीच्या आवारातच गुडघाभर पाणी साचल्याचे समोर आले आहे.
महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी १ जून रोजी बैठक घेत पावसाळी कामे आणि इतर विकासकामे पावसापूर्वी आटोपण्याचे आदेश दिले होते. मात्र, कामे पूर्ण न झाल्यामुळे भरपावसातही शहरात विविध ठिकाणी रस्ते खोदाई सुरू असल्याचे नंतर दिसून आले. खोदलेल्या खड्ड्यांवर पुन्हा रस्ता झाला नाही. तसेच, आठवडाभराच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत आणखी भर पडल्याचे समोर आले. या बाबी ‘सीविक मिरर’ने उघड केल्या आहेत. आता तर कात्रजमधील क्षेत्रीय कार्यालयाची इमारत असलेल्या ठिकाणीच प्रचंड पाणी साचत आहे. क्षेत्रीय कार्यालयात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसेल तर इतर ठिकाणचा निचरा कसा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. किमान क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातील साचणाऱ्या पाण्यावर तरी लक्ष द्या, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
कात्रजच्या मुख्य चौकात सावंत कॉर्नर इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर रस्त्याच्या समोरील बाजूस काही हाॅटेल आहेत, तर आतील बाजूला कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय आहे. या इमारतीच्या शेजारून नाला जातो. या नाल्याची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. गेले दोन-तीन दिवस होत असलेल्या पावसामुळे या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कृष्णा हॉटेलच्या आवारात गुडघाभर पाणी साचले होते. पाणी आत घुसू नये म्हणून बाजूने असलेल्या एका प्रवेशद्वाराजवळ असलेली जागा प्लायवूडने बंद करण्यात आली होती. पाण्याचा निचरा होत नसल्याचे काही स्थानिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
स्थानिक नागरिक दीपक कुलकर्णी म्हणाले, ‘‘कात्रज ते नवले पूल हा डोंगर उताराचा भाग आहे. त्या उतारावरून येणारे अनेक नाले बुजवण्यात आले आहेत. काही बांधकाम व्यावसायिकांनी तर नाल्यावर इमारती बांधल्या आहेत. त्यातच पाणी वाहून जाण्यासाठी कमी व्यासाची पाईपलाईन टाकली आहे. पाण्याचा निचरा होण्याची सुविधा पुरेशी सक्षम नसल्याने पाणी रस्त्यावरच साचून राहते. अनेकांच्या घरातही पावसाचे पाणी शिरते. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हा अनुभव येत आहे.’’
‘‘एका मंत्र्याने नाल्याशेजारी बांधलेली ही इमारत आहे. या इमारतीच्या जागेचा भाग पूर्वी नाला म्हणूनच ओळखला जायचा. याच इमारतीत कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्याची सक्षम यंत्रणा उभारलेली नाही. त्यामुळे या इमारतीत दर पावसाळ्यात पाणी साचते. या इमारतीत क्षेत्रीय कार्यालय असूनही त्यावर अद्याप तोडगा काढलेला नाही. पाणी वाहून नेण्यासाठी पुरेशा क्षमतेची पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे,’’ अशी प्रतिक्रिया कात्रज येथील सामाजिक कार्यकर्ते राजू कदम यांनी व्यक्त केली.