पोलिसाने घेतला टॉवेलने गळफास

परिवहन विभागातील पुणे शहर पोलिसाने गळफास घेत स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून भावाने पत्नीसोबत विवाह करावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 8 Jul 2023
  • 10:23 am

पोलिसाने घेतला टॉवेलने गळफास

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

परिवहन विभागातील पुणे शहर पोलिसाने गळफास घेत स्वतःचे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून भावाने पत्नीसोबत विवाह करावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

वैभव दिलीप शिंदे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यामागे आई, पत्नी, भाऊ आणि चार वर्षीय मुलगा असा परिवार आहे. चिमुरड्याचे पितृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हे मागील सहा महिन्यांपासून परिवहन विभागामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. ते लोहगावमधील गुरुद्वारा कॉलनी येथे कुटुंबीयांसह राहात होते. शुक्रवारी (दि. ७) पहाटे चारच्या सुमारास त्यांनी घराजवळील चिंचेच्या झाडाला टॉवेलने गळफास घेतला. पत्नीला हे दिसल्यावर वैभव यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी वैभव यांना मृत घोषित केले.

वैभव यांच्या घराजवळ चिंचेचे झाड आहे. घराच्या छतावर त्याची फांदी आलेली आहे.  त्यांनी शुक्रवारी पहाटे या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वैभव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी ‘‘पत्नी कांचन, मला माफ कर. भाऊ आणि आई मला माफ करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. भाऊ विजय याने पत्नीशी विवाह करावा,’’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी तपास सुरू असून वैभव यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैभव यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मागील ३ ते ४ वर्षापासून ते पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेची तयारी करत होते.  विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘वैभव हे पुढील पदाचा अभ्यास करत असल्यामुळे त्यांची मागील सहा महिन्यांपूर्वी परिवहन विभागात बदली झाली होती. नेहमीप्रमाणे ते गुरुवारी ड्यूटीवर हजर होते. संध्याकाळी घरी गेल्यावर त्यांनी जेवण केले. पहाटे आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख नाही.’’ 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story