PMC pool : पालिकेचा जलतरण तलाव बनला डास पैदास केंद्र

बावधनमध्ये स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, मेडिटेशन हॉल आणि बॅडमिंटन हॉल केवळ उद्घाटनापुरताच उघडला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या उन्हाळ्यातही जलतरण तलाव बंद असून, बॅडमिंटन हॉलचे कामही अर्धवट राहिले आहे. आता मोकळ्या तलावात अवकाळी पावसाचे पाणी साठल्याने डेंग्यूचा धोका वाढला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 12 May 2023
  • 03:29 am
पालिकेचा जलतरण तलाव बनला डास पैदास केंद्र

पालिकेचा जलतरण तलाव बनला डास पैदास केंद्र

अर्धवट अवस्थेत झाले उद्घाटन, जलतरण तलावाच्या डबक्याने डेंग्यूचा धोका, बॅडमिंटन हॉलचेही बांधकाम अपूर्ण

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

बावधनमध्ये स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, मेडिटेशन हॉल आणि बॅडमिंटन हॉल केवळ उद्घाटनापुरताच उघडला गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या उन्हाळ्यातही जलतरण तलाव बंद असून, बॅडमिंटन हॉलचे कामही अर्धवट राहिले आहे. आता मोकळ्या तलावात अवकाळी पावसाचे पाणी साठल्याने डेंग्यूचा धोका वाढला आहे. तर, दुसरीकडे या इमारतीला सुरक्षारक्षक नसल्याने गांजाबहाद्दर आणि तळीरामांनी येथे अड्डा जमवला आहे. त्यामुळेच पालिकेने जलतरण तलाव त्वरित सुरू करून नागरिकांना सुविधा द्यावी अन्यथा मोकळ्या इमारतीची सफाई करून इमारत सीलबंद करून दारुड्यांपासून सुटका करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महापालिकेच्या नियमानुसार कोणत्याही इमारतीचे संपूर्ण काम झाल्याशिवाय त्यास पूर्णत्वाचा दाखला दिला जात नाही. मात्र, पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपत असल्याने घाईघाईने जलतरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे त्यानंतरही तलाव सुरू झाला नाही. आजही ही इमारत धूळखात पडली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर 'सीविक मिरर'च्या प्रतिनिधीने संबंधित संकुलाला भेट दिली.

या इमारतीत जाण्यासाठी कोणतीही आडकाठी नाही. लहान फाटकातून आत गेल्यानंतर समोरच स्वामी विवेकानंद जलतरण तलावाची तुटलेली पाटी आपले स्वागत करते. मागील बाजूने जलतरण तलावाच्या दिशेने जाता येते. इमारतीच्या मागील बाजूस क्रशसँड आणि झाडाच्या तुटलेल्या फांद्यांचा खच पडलेला दिसून आला. या परिसरात जाण्यासाठी कोणी रोखणारे नसल्याने हा परिसर दारुडे आणि गांजाबहाद्दरांचा अड्डा झाला आहे. त्यामुळे आवारात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. काही ठिकाणी मद्याच्या बाटल्या फोडलेल्या दिसल्या. तसेच, नशाबाजांनी स्वच्छतागृहाबाहेर आणि लगतच्या खोलीमध्ये सर्वत्र घाण केली आहे. विष्ठा आणि लघवीची दुर्गंध या भागात पसरली आहे, तर रिकाम्या जलतरण तलावात अवकाळी पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे डेंग्यूचा धोकाही निर्माण झाला आहे.        

'सीविक मिरर'शी बोलताना बावधनमधील रहिवासी कृणाल घारे म्हणाले, बावधनमध्ये नागरिकांसाठी अशा पद्धतीची कोणतीही सुविधा नाही. जलतरण तलाव, ध्यानकेंद्र, बॅडमिंटन हॉलची कल्पना चांगली आहे. मात्र, ही इमारत केवळ उद्घाटनापुरतीच सुरू झाली. महापालिकेला काम पूर्ण करता येणे शक्य नसेल तर त्यांनी परिसराची स्वच्छता करून इमारत सीलबंद करावी. अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षारक्षक नेमावा.  

सामाजिक कार्यकर्त्या आरती करंजावणे म्हणाल्या, नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी घाईघाईने जलतरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जलतरण तलाव सुरूच झाला नाही, तर बॅडमिंटन हॉलचे काम अजूनही अपूर्ण आहे. चांदणी चौकापासून बावधन बुद्रुकजवळील वैदेही सोसायटीपर्यंत एकाही ठिकाणी असे संकुल नाही. उरलेले काम पूर्ण करून संकुल सुरू करायला हवे होते. हे काम अर्धवट अवस्थेत का ठेवण्यात आले आहे, हे समजत नाही. या रिकाम्या वास्तूचा उपयोग व्यसनी आणि टुकार लोक करीत आहेत. त्यांना आडोसा देण्यासाठी हे संकुल उभारले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  माजी नगरसेवक किरण दगडे पाटील म्हणाले, कोविडपूर्वी जलतरण तलाव, ध्यानकेंद्र आणि बॅडमिंटन हॉलचे काम सुरू झाले. त्यानंतर कोविड काळात काम झाले नाही. नंतर संकुलासाठी निधी उपलब्ध झाला नाही. महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यास, मी माझ्या खर्चातून संकुल उभारतो. त्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही महापालिका अधिकाऱ्यांकडे केली होती, असेही पाटील यांनी नमूद केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story