टंचाईत गळतीचा महिना...

पावसाने ओढ दिल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे पुण्यावर सक्तीची पाणीकपात लादली जात आहे. दुसऱ्या बाजूला पाण्याच्या टाकीची गळती काढण्यास प्रशासनास वेळ नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Mon, 19 Jun 2023
  • 12:14 am
टंचाईत गळतीचा महिना...

टंचाईत गळतीचा महिना...

रेसकोर्सजवळील पाण्याच्या टाकीतून गेल्या तीन दिवसांत हजारो लिटर पाण्याची गळती, दुरुस्तीसाठी छावणी प्रशासनाला नाही वेळ

तन्मय ठोंबरे / नितीन गांगर्डे

tanmay.thombre@civicmirror.in

nitin.gangarde@civicmirror.in

पावसाने ओढ दिल्याने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे पुण्यावर सक्तीची पाणीकपात लादली जात आहे. दुसऱ्या बाजूला पाण्याच्या टाकीची गळती काढण्यास प्रशासनास वेळ नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून लष्कर भागातील रेसकोर्सजवळील पाण्याच्या टाकीतून ही गळती सुरू असून या काळात हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.  

शहरात पाण्याची कमतरता असल्याने पाणी कपात सुरू आहे. लष्कर भागातील रेसकोर्सजवळील पाण्याच्या टाकीतून ही गळती होत आहे. किमान तीन दिवस पाण्याच्या टाकीतून सतत गळती सुरू आहे. यामुळे या काळात हजारो लिटर पाणी मातीत मिसळून वाया गेले आहे. इकडे पाणी कपातीमुळे सामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी जपून वापरावे लागत आहे. दुसऱ्या बाजूला प्रशासनाला आपल्या कामाकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने टंचाईच्या काळात मौल्यवान पाणी असे वाया जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. प्रशासन याकडे गंभीरपणे पाहात नसून गळती दुरुस्त केली जात नसल्याचे नागरिक सांगतात.

लष्कर भागातील रेसकोर्स या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी लाखो लिटर पाण्याची मोठी टाकी आहे. तेथूनच या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र या टाकीमधून शुक्रवार, १६ जून पासून पाण्याची  गळती सुरू आहे. टाकीच्या एका बाजूचे सिमेंटचे तुकडे निघून तिला मोठे भोक पडले आहे. त्यातून सतत पाण्याची मोठी धार लागून पाणी  जमिनीवर पडून वाया जात आहे. येथील रस्ता वर्दळीचा असल्याने सतत वाहतूक असते. येथून जाणाऱ्या-येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अंगावर गळतीचे पाणी पडत आहे. तसेच रस्त्यावर पाणी साचले  असल्यामुळे दुचाकी घसरत आहेत. 

कोकणात मान्सून दाखल झाला असला तरी बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्याची पुढील प्रगती थांबली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून अजून काही दिवस पुढे गेला आहे. गुजरात राज्यात आलेल्या या वादळामुळे मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पाण्याची पातळी कमी होऊन अनेक धरणातील पाणी पातळी तळ गाठण्याच्या दिशेने चालली असल्याचे नुकतेच जलसंपदा विभागाने सांगितले आहे. काही आठवड्यात पाऊस बरसला नाही तर पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागेल. आजमितीला पुणे शहरातील नागरिकांची दररोजची १६५० एमएलडी पाण्याची गरज आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांतून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या चारही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.

या पार्श्वभूमीवर महानगरपालिका पाणी कपात करत आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या सुस्त कामकाजामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. लष्कर भागातून पुणे-सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेला ही टाकी आहे. या टाकीजवळून जात असताना रस्त्यावर वळण आहे. त्यामुळे रस्त्यावर साचलेले पाणी दिसत नाही. 

दुचाकीस्वारांना याचा अंदाज न आल्याने याठिकाणी दुचाकी घसरत आहेत. हे ठिकाण अपघातजन्य झाले असून गळती सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले.  याबाबतीत पुणे महानगरपालिकेच्या लष्कर विभागातील कनिष्ठ अभियंता रश्मी पाटील यांना विचारले असता, तातडीने पाहणी करून त्यावर  योग्य ते उपाय केले जातील असे त्यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story