PMPML : पीएमपी वाहकाने तत्परता दाखवत प्रवाशांना उतरवून बस थेट हॉस्पिटलकडे वळवल्याने हृदयविकारग्रस्त ज्येष्ठाचे वाचले प्राण

धायरीतील मुलीच्या घराच्या वास्तुशांतीसाठी पत्नीसोबत निघालेले ज्येष्ठ नागरिक बसमध्येच बेशुद्ध पडले. आवाज देऊनही उठत नसल्याने पत्नी अस्वस्थ झाली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कंडक्टरने प्रसंगावधान राखत गाडी हॉस्पिटलला न्यायला सांगितली. प्रवाशांच्या मदतीने ज्येष्ठाला रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकास तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. पीएमपी बस जीवदूतासारखी हॉस्पिटलपर्यंत धावून गेल्याचा अनुभव ज्येष्ठाच्या कुटुंबीयांना आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 13 May 2023
  • 01:20 pm
पीएमपी वाहकाने तत्परता दाखवत प्रवाशांना उतरवून बस थेट हॉस्पिटलकडे वळवल्याने हृदयविकारग्रस्त ज्येष्ठाचे वाचले प्राण

पीएमपी वाहकाने तत्परता दाखवत प्रवाशांना उतरवून बस थेट हॉस्पिटलकडे वळवल्याने हृदयविकारग्रस्त ज्येष्ठाचे वाचले प्राण

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

धायरीतील मुलीच्या घराच्या वास्तुशांतीसाठी पत्नीसोबत निघालेले ज्येष्ठ नागरिक बसमध्येच बेशुद्ध पडले. आवाज देऊनही उठत नसल्याने पत्नी अस्वस्थ झाली. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कंडक्टरने प्रसंगावधान राखत गाडी हॉस्पिटलला न्यायला सांगितली. प्रवाशांच्या मदतीने ज्येष्ठाला रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकास तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. पीएमपी बस जीवदूतासारखी हॉस्पिटलपर्यंत धावून गेल्याचा अनुभव ज्येष्ठाच्या कुटुंबीयांना आला.   

स्वारगेट ते धायरी मार्गावरील पीएमपी बसमध्ये गुरुवारी (दि. ११) दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली. गजानन यादव (वय ७४, रा. येरवडा, लक्ष्मीनगर) हे प्रवासी बेशुद्ध पडले होते. पत्नी शोभा (वय ६५) यांच्यासमवेत ते धायरीला निघाले होते. यादव यांची मुलगी सुनीता पवार यांनी धायरीत सदनिका घेतली आहे. त्याची वास्तुशांत शुक्रवारी (दि. १२) होती. त्यासाठी पती-पत्नी गुरुवारी मुलीकडे चालले होते. धायरी येथील लाड गणपती जवळील स्टॉपवर त्यांना उतरायचे असल्याने पत्नीने आदल्या स्टॉपवर पती गजानन यादव यांना आवाज दिला. मात्र, पतीकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यादव यांच्या पत्नी शोभा घाबरून ओरडल्या.

बसमधील कंडक्टर तानाजी कांबळे यांनी तिथे धाव घेतली. काही प्रवासीही मदतीला आले. कंडक्टर आणि प्रवासी तुषार बेलोशे (रा. धायरी, चव्हाण शाळेजवळ) यांनी त्यांच्यावर पाणी शिंपडले. चालकाच्या डब्यात असलेला कांदा हुंगायला दिला. असे उपचार एकीकडे सुरू ठेवले. दुसरीकडे त्यांनी धायरीतील अनुजा हॉस्पिटलच्या दिशेने गाडी नेली. डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा रक्तदाब सामान्य पातळीपेक्षा निम्म्याने कमी झाला होता. ईसीजी रिपोर्ट व्यवस्थित आला नव्हता. डॉक्टरांनी माईल्ड अटॅकची शक्यता वर्तवली होती. दरम्यान कंडक्टर कांबळे यांनी गजानन यांच्या पत्नी मार्फत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पुढील उपचारासाठी रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयात घेऊन गेले. गजानन यादव बेशुद्ध पडल्यानंतर तातडीने पावले उचलल्याने गजानन यांचे प्राण वाचू शकले.

अनुजा हॉस्पिटलमधील एमडी मेडिसिन असलेल्या डॉ. नम्रता बिराजदार म्हणाल्या, पीएमपीचे वाहक आणि काही प्रवासी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गजानन यादव यांना घेऊन आले होते. तेव्हा त्यांचा रक्तदाब अवघा ७० ते ८० आला. सामान्य माणसाचा रक्तदाब १२० ते १३० इतका असतो. ईसीजी देखील व्यवस्थित नव्हता. एकूण स्थितीवरून माईल्ड अटॅक असल्याचे दिसत होते. नातेवाईकांना त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची विनंती केली. त्यानंतर आम्ही पेशंट काहीसा सामान्य पातळीवर आल्याची खात्री झाल्यावर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले.

पीएमपीचे कंडक्टर तानाजी कांबळे यांनी गेल्या महिन्यात अवकाळी पावसात अडकलेल्या एका अंध मुलीसाठी गाडी थांबवली होती. खाली उतरून तिची विचारपूस करीत तिला धायरीतील बसस्टॉपवर सोडले होते. या कामगिरीमुळे पीएमपीने कांबळे यांचा सत्कार केला होता. आता कांबळे यांनी दाखवलेल्या तत्परतेने ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचले आहेत. याबाबत सीविक मिररला माहिती देताना कंडक्टर कांबळे म्हणाले, गुरुवारी यादव पती-पत्नी धायरीला निघाले होते. धायरीला पोहोचण्यापूर्वी गर्दीतून आवाज आला की काकांची शारीरिक हालचाल बंद झाली आहे. ते हाकेला प्रतिसाद देत नाहीत. त्यानंतर चालकाला बस थांबवण्यास सांगितले. काकांची पाठ, छाती चोळून पाहिली. त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. बस जवळच्या अनुजा हॉस्पिटलसमोर उभी करण्यात आली. त्यानंतर यादव यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. यादव यांच्या पत्नीने फोन करून मदत केल्याबद्दल माझे आभार मानले.

धायरीतील चव्हाण शाळेजवळ राहणारे प्रवासी तुषार बेलोशे म्हणाले, एक गृहस्थ उठत नसल्याचा गलका झाला. त्यानंतर यादव काका बसलेल्या सीट जवळ गेलो. चालकाजवळ असलेला कांदा आणून त्यांना हुंगायला दिला. पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला. जवळच हॉस्पिटल असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story