Land subsided : सोसायटीची जमीन १० फूट खचली

कर्वेनगर भागातील गिरिजा विहार सोसायटीच्या आवारातील पार्किंगलगतचा काही भाग सोमवारी (दि. १५) रात्री अचानक १० फूट खोल खचला. यामुळे रहिवाशांत मोठी घबराट पसरली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rahul Deshmukh
  • Wed, 17 May 2023
  • 11:34 am
सोसायटीची जमीन १० फूट खचली

सोसायटीची जमीन १० फूट खचली

कर्वेनगरच्या ‘गिरिजा विहार’मधील घटना, रहिवाशांत घबराट

राहुल देशमुख 

feedback@civicmirror.in

कर्वेनगर भागातील गिरिजा विहार सोसायटीच्या आवारातील पार्किंगलगतचा काही भाग सोमवारी (दि. १५) रात्री अचानक  १० फूट खोल खचला. यामुळे रहिवाशांत मोठी घबराट पसरली होती.

सुदैवाने पार्किंगलगतचा भाग खचला तेव्हा घटनास्थळी कोणीही उपस्थित नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा खचलेला भाग  सोसायटीमधील एफ-२ इमारतीच्या कार पार्किंगपासून फक्त २० फूट अंतरावर आहे. घटनेची माहिती समजताच अिग्नशमन दल आणि पुणे महापालिकेच्या अधिका-यांनी  सोसायटीच्या आवारात धाव घेतली.  खड्डा भरण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. रात्रभर हे काम सुरू होते.

सोसायटीतील रहिवाशांनी या घटनेबद्दल मौन राखणे पसंत केले. ‘सीविक मिरर’ने संपर्क साधला असता, सोसायटीचे अध्यक्ष रवी गोखले यांचे  उत्तर होते, “आम्हाला या घटनेची प्रसिद्धी करायची नाही. आम्हाला कोणतीही टिप्पणी करायची नाही. ”

सोसायटीत तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी सांगितले की, ‘‘सोसायटी आवरातील एक विहीर आणि एफ-२ इमारतीच्या पार्किंगमध्ये रात्री ९.२५ वाजण्याच्या सुमारास दहा फूट लांब आणि आठ फूट रुंद जमिनीचा भाग अचानक खाली कोसळला.’’

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ते म्हणाले, “स्थानिक रहिवाशांनी मला सांगितले की, विहिरीचे पाणी झिरपल्याने आणि माती सैल झाल्यामुळे ही घटना घडली असावी. आजूबाजूला झाडे असल्यानेही हे झाले असावे. सूचना मिळाल्यावर, मी माहितीची पडताळणी करण्यासाठी घटनास्थळी गेलो आणि ताबडतोब जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सूचित केले. त्यांनी तातडीने आयुक्त विक्रमकुमार यांना घटनेची कल्पना दिली. आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. खड्डा संपूर्ण सोसायटीसाठी धोकादायक ठरू शकत असल्याने खड्डा तातडीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला.”

कोथरूड अग्निशमन केंद्राचे विशेष कर्तव्य अधिकारी गजानन पाथरुडकर म्हणाले, “मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे,  मी आणि बचाव पथकाचे कर्मचारी आणि बचाव व्हॅनसह घटनास्थळी पोहोचलो. आम्ही घटनास्थळाची पाहणी केली. फरशीचा काही भाग कोणत्याही आधाराशिवाय खड्ड्याच्यावर लटकलेला आढळला. आम्ही फ्लोअरिंगचा तुटलेला भाग तातडीने  तोडला.”

अशा घटनेला अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. पावसाचे पाणी आणि सांडपाणी गळतीमुळे जमीन खचू शकते. शेजारील विहिरीतील पाण्याची पातळी खड्ड्याच्या खोलीपेक्षा खोल असली तरी पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यास विहिरीचे पाणी झिरपून माती मोकळी होण्याची शक्यता आहे, असेही पाथरुडकर यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story