PMPML Kothrud Depot : मोडून पडला जॅक आणि कणाही

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) मध्ये क्लिनर म्हणून काम करणारे ३७ वर्षीय इंद्रजित मोहिरे यांना आयुष्यभराच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांची चूक काय तर कोथरूड डेपोच्या ट्रान्सपोर्ट युटिलिटीमध्ये मेकॅनिकची नोकरी करत असताना कमकुवत साधनांसह त्यांनी बस दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Tanmay Thombre
  • Sat, 6 May 2023
  • 03:05 am
मोडून पडला जॅक आणि कणाही

मोडून पडला जॅक आणि कणाही

कणाहीन प्रशासनाचा हलगर्जीपणा; बसखाली काम करताना जॅक तुटला आिण कर्मचारी चेंगरला

तन्मय ठोंबरे 

tanmay.thombre@civicmirror.in

TWEET@tanmaytmirror

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) मध्ये क्लिनर म्हणून काम करणारे ३७ वर्षीय  इंद्रजित मोहिरे यांना आयुष्यभराच्या अपंगत्वाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांची चूक काय तर कोथरूड डेपोच्या ट्रान्सपोर्ट युटिलिटीमध्ये मेकॅनिकची नोकरी करत असताना कमकुवत साधनांसह त्यांनी बस दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. 

मोहिरे मंगळवारी दुपारी बसखाली काम करत असताना जॅक अचानक तुटला आणि वाहन अंगावर पडल्याने त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. मोहिरे हे मूळचे सांगलीचे असून कोंढवे धावडे येथे पत्नीसह राहतात. गेल्या दहा वर्षांपासून ते पीएमपीएमएलमध्ये काम करत आहेत.

गंभीर दुखापत असल्याने मोहिरे यांच्यावर सध्या पौड रस्त्यावरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना कायमचे अपंगत्व येऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

या घटनेमुळे पीएमपीच्या दुरुस्ती केंद्रातील जुनी व गंजलेली उपकरणे आणि मनुष्यबळाची कमतरता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या मते, पीएमपीएमएल जुनी आणि गंजलेली उपकरणे वापरत असल्याने ही घटना घडली. मोहिरे यांचे मेहुणे उमेश नरुळे यांनीही हाच आरोप केला आहे. 

सीविक मिररशी बोलताना नरुळे म्हणाले की, त्यांची बसक्लिनर म्हणून भरती झाली असली तरी त्यांना मेकॅनिक म्हणून काम करण्यास सांगितले होते. 

“मोहिरे यांना बसच्या शॉक ॲब्जॉर्बरमध्ये स्प्रिंग बदलण्याचे काम देण्यात आले होते. जॅकच्या मदतीने बसला वर उचलले गेले होते. ते बसखाली काम करत असताना जॅक अचानक मोडला आणि खाली जोरात आदळला. परिणामी, बस वेगाने खाली आली आणि त्याखाली असलेल्या मोहिरे यांना  चिरडले.”

मोहिरे यांना सहकाऱ्यांनी रुग्णालयात नेले. दोन दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांना सामान्य वॉर्डात हलवण्यात आले आहे. मोहिरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा मज्जातंतू निकामी झाला आहे. 

पीएमपीएमएल राष्ट्रवादी कामगार युनियनचे नेते सुनील नलावडे म्हणाले, “आम्ही अनेकदा कामगारांकडून आवश्यक उपकरणांची यादी घेतो आणि पीएमपीएमएल व्यवस्थापनाला आधुनिक उपकरणे देण्याची विनंती करतो, पण तरीही दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा घटना घडत आहेत. मोहिरेंच्या आधीही काही दिवसांपूर्वी  काम करत असताना एका कामगाराचे बोट कापले गेले होते. पीएमपीकडून सफाई कामगार आणि मदतनीस म्हणून भरती झालेल्या कामगारांना मेकॅनिक म्हणून काम करण्यास सांगितले जात आहे; कामावर देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षक नेमलेला नाही, "असाही आरोप नलावडे यांनी केला. 

पीएमपीएमएल डेपोच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “डेपोमधील उपकरणे दरवर्षी बदलणे आवश्यक आहे. तथापि, कोविड-१९ साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून नवीन पुरवठा मिळालेला नाही. आम्ही कामगारांना वारंवार खबरदारी घेण्यास सांगत आहोत. मनुष्यबळाचा तुटवडा असल्यामुळे आम्हाला सफाई कामगार किंवा मदतनिसाला मेकॅनिक म्हणून काम करण्यास भाग पाडले जाते.” 

डॉ. प्रेरणा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी (अति दक्षता विभाग) जहांगीर हॉस्पिटल म्हणाल्या, " मोहिरे आता स्थिर आहेत, पण त्यांचा शरीराचा खालचा भाग पूर्णपणे निकामी झाला आहे, पाठीचा कणा अर्धवट कापला आहे आणि बरे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. पाठीच्या कण्याला कोणतीही जखम नाही, पण तो थेट कापला गेला असल्याने दुखापतीचे स्वरूप गंभीर बनले आहे."'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story