पेशवेकालीन मंदिरातून महादेवाची मूर्ती चोरीस

गणेश पेठेतील काळभैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या पेशवेकालीन महादेव मंदिरातून पितळ धातूची भगवान महादेवाच्या मूर्तीची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sat, 17 Jun 2023
  • 01:27 am
पेशवेकालीन मंदिरातून महादेवाची मूर्ती चोरीस

पेशवेकालीन मंदिरातून महादेवाची मूर्ती चोरीस

गणेश पेठेतील घटना, गाभाऱ्यातील सात किलो वजनाची पितळी मूर्ती चोरणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

गणेश पेठेतील काळभैरवनाथ मंदिराशेजारी असलेल्या पेशवेकालीन महादेव मंदिरातून पितळ धातूची भगवान महादेवाच्या मूर्तीची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

पितळ धातूची सात किलो वजनाची मूर्ती चोरीला गेल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १५) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला. मंदिरात देखभाल आणि पूजा करणाऱ्या एका ६९ वर्षीय पुजाऱ्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पेठेत महादेवाचे पेशवेकालीन मंदिर असून तिथे पिंड आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शंकराची पितळी मूर्ती ठेवण्यात आली होती. वर्षानुवर्षे परिसरातील भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. फिर्यादी हे मंदिरातील पूजाअर्चा आणि देखभाल करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजता मंदिरातील दरवाजा उघडून पूजा केली. साडेसहाच्या सुमारास ते घरातील देवांची पूजा करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस पूजा झाल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी दहापर्यंत पोथी वाचली. त्यानंतर ते त्यांच्या दिनचर्येप्रमाणे पुन्हा मंदिरात आले. त्यावेळी महादेवाची पितळी सात किलो वजनाची मूर्ती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंदिराच्या उघड्या दरवाज्यातून चोरट्याने देवालाच चोरून नेले.  

हे जुने महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविक येथे दर्शनासाठी येतात. मूर्तीवर वाईट नजर ठेवून चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि चोरी केली. ही गोष्ट पुजाऱ्याच्या लक्षात आल्यावर त्यांनी आसपासच्या नागरिकांना विचारले. मात्र कोणालाच याची माहिती नव्हती. त्यानंतर जुन्या बाजारात जाऊन त्यांनी चौकशी केली. मूर्तीचे वर्णन करून अशी मूर्ती आली असल्यास मला द्या. मी त्याचे असतील तेवढे पैसे देतो, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. अखेरीस त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंडगे तपास करत आहेत. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन भेट दिली. त्या परिसरात सीसीटीव्ही आहेत का, याची पाहणी केली. पुढील तपास लवकरात लवकर केला जाईल असे त्यांनी सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story