मेट्रो स्थानकांना नाव देताना शहराचा वारसा जपला जावा

पुणे मेट्रोच्या न्यायालयाजवळील मेट्रो स्थानकाला 'छत्रपती शिवाजी महाराज स्थानक' असे नाव देण्यात यावेत आणि मंडईतील स्थानकाचे नाव 'महात्मा जोतिबा फुले' स्थानक असे करावे, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 23 Jul 2023
  • 01:14 pm
मेट्रो स्थानकांना नाव देताना शहराचा वारसा जपला जावा

मेट्रो स्थानकांना नाव देताना शहराचा वारसा जपला जावा

मनसेच्या िशष्टमंडळाची महापालिका आयुक्तांकडे मागणी, महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख नको

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पुणे मेट्रोच्या न्यायालयाजवळील मेट्रो स्थानकाला 'छत्रपती शिवाजी महाराज स्थानक' असे नाव देण्यात यावेत आणि मंडईतील स्थानकाचे नाव 'महात्मा जोतिबा फुले' स्थानक असे करावे, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पात शहराच्या मध्यवर्ती भागात कामगार पुतळा, दिवाणी न्यायालयाजवळ स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. या स्थानकांची नावे शिवाजीनगर आणि मंडई अशी एकेरी ठेवली आहेत. त्यामुळे महापुरुषांचा एकेरी उल्लेख होतो. त्या नावांना मनसेने विरोध केला आहे.

पुणे शहरात मागील दशकात उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा आणि नोकरीच्या संधी झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे शहरात भारताच्या विविध भागातून नागरिक शिक्षण, नोकरीसाठी येत आहेत. स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. शहरातील संशोधन संस्था, विकास संस्था, आयटी पार्क, ऑटोमोबाईल उद्योगातील नोकरदार यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या असल्याने शहरातच एका ठिकाणावरून दुसरीकडे जाण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था असणे अपेक्षित आहे. 

शहरातील प्रत्येकाने आपल्या खासगी वाहनाचा उपयोग केला, तर वाहतूक कोंडीसारखा गहन प्रश्न उपस्थित होताे. शहराची रचना पाहता आणि जागेचा विचार करता शहरातील रस्ते वाढवणे जीकिरीचे आहे. अशा स्थितीत पुढील काही वर्षांचा विचार करता सार्वजनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे.  

वाहतुकीसाठी शासनाचा पुणे मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था ही काळाची गरज ओळखून पुणे मेट्रो प्रकल्प सुरू झाला. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कामगार पुतळा, दिवाणी न्यायालयाजवळ स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या स्थानकांची नावे शिवाजीनगर आणि  मंडई अशा चुकीच्या एकेरी नावाने केल्यामुळे चुकीचा संदेश पसरत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्षेप घेतला आहे.

शैक्षणिक व सांस्कृतिक शहर अशी शहराची ओळख आहे. मेट्रो स्थानकाच्या नावात आपला ऐतिहासिक वारसा जपण्याची परंपरा कायम राहावी,  यासाठी स्थानकाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो' स्थानक व मंडई भागातील स्थानकाचे नाव 'महात्मा जोतिबा फुले' मंडई स्थानक असेच ठेवण्यात यावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी मनसेचे नेते बाबू वागसकर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story