नगर रस्त्यावर टॅंकर उलटून सांडलेले अशुद्ध मोहरीचे तेल नेल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सुज्ञ, शहाणे अशी पुणेकरांची सर्वत्र ओळख आहे. अनेक घटनांमधून त्याची प्रचितीही येत असते. मात्र, अनेकदा असे काही घडते की हेच का ते पुणेकर, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. नगर रस्त्यावर मंगळवारी (दि. १३) खाद्यतेलाचा टॅंकर उलटल्यानंतर परिसरातील हजारो नागरिकांनी हे सांडलेले तेल आपल्या घरी नेले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Tanmay Thombre
  • Wed, 14 Jun 2023
  • 06:44 am
नगर रस्त्यावर टॅंकर उलटून सांडलेले अशुद्ध मोहरीचे तेल नेल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नगर रस्त्यावर टॅंकर उलटून सांडलेले अशुद्ध मोहरीचे तेल नेल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नगर रस्ता बीआरटी लेनवर टँकर उलटून सांडलेले मोहरीचे हजारो लिटर अशुद्ध खाद्यतेल खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नेल्याने हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात; १६ तास वाहतूक कोंडी

तन्मय ठोंबरे 

tanmay.thombre@civicmirror.in

TWEET@tanmaymirror

सुज्ञ, शहाणे अशी पुणेकरांची सर्वत्र ओळख आहे. अनेक घटनांमधून त्याची प्रचितीही येत असते. मात्र, अनेकदा असे काही घडते की हेच का ते पुणेकर, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. नगर रस्त्यावर मंगळवारी (दि. १३) खाद्यतेलाचा टॅंकर उलटल्यानंतर परिसरातील हजारो नागरिकांनी हे सांडलेले तेल आपल्या घरी नेले. प्रक्रिया न झालेल्या या तेलात रस्त्यावरील विषारी घटक मिसळल्याने ते आरोग्यास अपायकारक ठरणार आहे. मात्र, त्याचा कोणाही विचार न करता हाती मिळेल ते भांडे घेऊन तेलाची लूट करीत येथील नागरिकांनी आपल्याच आरोग्याच्या समस्यांना निमंत्रण दिले आहे.

अहमदनगरकडे ३० टन मोहरीचे खाद्यतेल घेऊन जाणारा एक टँकर मंगळवारी सकाळी चंदननगर चौकात बीआरटी मार्गावर उलटला. त्यातून हजारो लिटर तेलाची गळती झाली. या सांडलेल्या तेलाचे रस्त्यावर मोठे डबके साठले होते. ते घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. त्यामध्ये खाद्याच्या हातगाडीवाले, रस्त्यावरील काही हॉटेलचे कामगार, आणि इतर नागरिक तेल घेऊन जाण्यासाठी जमले होते.  हंडा, पातेले, ड्रम यात तेल भरून घेऊन जात होते. या तेलावर प्रक्रिया न झाल्याने आणि खाली सांडलेले असल्याने त्यात रस्त्यावरील विषारी घटक मिसळले आहेत. त्याचा खाण्यासाठी वापर केल्यास हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

भरधाव जात असलेला खाद्यतेल वाहून नेणारा हा टँकर दुभाजकावर गेल्याने रस्त्यावरच उलटला. त्यामुळे दहा तासांहून अधिक काळ या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली. त्याची परिणती मोठी वाहतूक कोंडी होण्यात झाली. सकाळी या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोंडीत अडकलेल्या नागरिकांना कामावर जाण्यासाठी उशीर झाल्याने ते वैतागले होते. त्याचवेळी स्थानिक रहिवासी, हातगाडीवाले, हॉटेल चालक टँकरमधून गळणारे मोहरीचे तेल भरून नेण्यात मग्न होते. 

लूटमार करणाऱ्या जमावाचा असा उन्माद होता की, बचाव करणाऱ्या कर्मचार्‍यांनाही काम करणे कठीण झाले होते. तसेच परिसरातील वडापाव, भजी तळलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्या हातगाडीवाल्यांनी आणि इतर अनेक नागरिकांनी शेकडो लिटर तेल खाण्यासाठी नेले. ते कच्चे तेल असून त्यावर प्रक्रिया झालेली नाही. तसेच रस्त्यावर पडलेले असल्याने त्यामध्ये रस्त्यावरील विषारी घटक मिसळले आहेत. याचा खाण्यासाठी वापर केल्यास पोटदुखी, जुलाब, उलट्या, मळमळ, डोकेदुखी, अपचन, पोटाचे विकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमएच ४६ बीपी ७७१२ हा भलामोठा टँकर ३० टन मोहरीचे तेल घेऊन मुंबईहून लातूरकडे घेऊन जात होता. अपघातस्थळी सरळ रस्ता असून येथे मध्यवर्ती बीआरटीएस मार्गाच्या दोन्ही बाजूला बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टमसाठी ग्रेड सेपरेटर आहेत. त्यामध्ये तो अडकला. टँकर बीआरटी मार्गात अडकल्यामुळे त्याला तीन क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. तब्बल बारा तासांपेक्षा अधिक वेळ टँकर रस्त्यावरच आडवा पडून असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

स्थानिक रहिवासी विकास गांगर्डे ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले, ‘‘बीआरटीएस ग्रेड सेपरेटरची उंची खूपच कमी असल्याने आणि त्यावर कोणत्याही खुणा नसल्यामुळे महामार्गाचा हा भाग धोकादायक ठरत आहे. शिवाय या ठिकाणी कॅरेजवे अरुंद आहे. रस्ता सरळ आणि उतरता असल्याने येथे वाहनांचा वेगही अधिक असतो. त्यामुळे अपघात झाला असण्याची शक्यता आहे.’’

 “मी उजव्या लेनमध्ये स्थिर आणि नियंत्रित वेगाने गाडी चालवत होतो. एका वेगवान कॅबने डाव्या लेनमधून माझ्या टँकरला ओव्हरटेक केले आणि अचानक उजव्या लेनमध्ये परतण्यासाठी तो वळला. अचानकपणे आडवा आला असल्याने त्याला धडक बसू नये, या काळजीने मी उजवीकडे वळलो. त्यावेळी टँकरची उजवीकडील चाके ग्रेड सेपरेटरवर गेली आणि टँकर उलटला. त्यामध्ये माझ्या पायाला मुका मार लागला. बेशिस्त कॅबचालकामुळे हा अपघात झाला,’’ अशी माहिती टँकर चालक सुभाष बडगर यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर इडीकर यांनी सांगितले की, “हा अपघात पहाटे झाला. आम्ही पालख्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत व्यस्त होतो. सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो. तोपर्यंत महामार्गावर तेल पसरले होते. स्थानिक नागरिकांनी टँकरमधून सांडलेले तेल लुटण्यास सुरुवात केली होती. आम्ही तत्काळ कॉरिडॉर वाहतुकीसाठी बंद केला आणि अग्निशमन दल आणि स्थानिक क्रेन ऑपरेटरच्या मदतीने अपघातातील टँकर उचलण्यासाठी क्रेनची व्यवस्था केली.”

“येरवडा आणि बी टी कवडे रोड येथील अग्निशमन केंद्रातून अग्निशमन वाहने आणि पाण्याचे टँकर आणण्यात आले. आम्ही तेल गळती थांबवण्याचा प्रयत्न केला. मग रस्त्यावर तेल सांडलेल्या जागेवर माती टाकून तो भाग झाकला.  तीन क्रेनच्या साहाय्याने टँकर उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुन्हा तेल गळती सुरू झाली. टँकर खूप जड होता. सांडलेल्या तेलाला आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन आम्ही टँकर उचलण्याचे प्रयत्न थांबवले. नंतर महामेट्रोकडून अवजड वस्तू उचलण्याची क्षमता असलेली क्रेन मागवली. दुपारी दोनच्या सुमारास ती क्रेन घटनास्थळी दाखल झाली. मात्र, टँकरमधून आणखी तेल गळती होऊ लागली. त्यामुळे त्यातील तेल काढून तो रिकामा करण्यासाठी पंप आणि इतर टँकर बोलावले,” अशी माहिती येरवडा अग्निशमन केंद्राचे स्टेशन ड्यूटी ऑफिसर प्रमोद सोनवणे यांनी दिली.  

“घटनास्थळी प्रेक्षक आणि स्थानिक रहिवासी तेल उचलण्यासाठी जमल्यामुळे त्यांचा बचाव कार्यात अडथळा येत होता. वारंवार विनंती करूनही ते हटत नव्हते. शेवटी कारवाई करून जमावाला पांगवण्याची विनंती स्थानिक पोलिसांना करावी लागली,” असे विमानतळ वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोरडे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story