फाटकं आभाळ, प्रवाशांची आबाळ

भररस्त्यात वारंवार बंद पडणाऱ्या बस, बसचे सीट, दरवाजे यांची दयनीय अवस्था, वेळापत्रकातील चालढकल अशा विविध कारणांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कायमच पुणेकरांच्या टीकेचा सामना करावा लागतो. त्यातच आता भर पावसात गळणाऱ्या बस ही भर पडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Fri, 30 Jun 2023
  • 09:16 am
फाटकं आभाळ, प्रवाशांची आबाळ

फाटकं आभाळ, प्रवाशांची आबाळ

गळक्या 'पीएमपीं'मुळे प्रवाशांचे प्रचंड हाल; महिलेवर चालत्या बसमध्ये छत्री उघडण्याची वेळ, व्हीडीओ व्हायरल

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

भररस्त्यात वारंवार बंद पडणाऱ्या बस, बसचे सीट, दरवाजे यांची दयनीय अवस्था, वेळापत्रकातील चालढकल अशा विविध कारणांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) कायमच पुणेकरांच्या टीकेचा सामना करावा लागतो. त्यातच आता भर पावसात गळणाऱ्या बस ही भर पडली आहे. 

पीएमपीने पावसाळ्यात रस्त्यांवर गळक्या बस सोडल्याने प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्यावर पुणेकरांनी जोरदार टीकाही केली आहे. या व्हीडीओमध्ये बसमध्ये पाण्याची अक्षरशः धार लागल्याचे दिसत असून, पावसाचे पाणी अंगावर पडू नये म्हणून एक महिला चक्क बसमध्ये छत्री उघडून बसल्याचे दिसत आहे. स्वारगेट ते धायरी या मार्गावरील बसमध्ये हा प्रकार घडला. 

बसच्या दुरवस्थेतील परिमाणांमध्ये आता आता गळक्या बसचीही भर पडली आहे. 'पीएमपी' चे प्रवासी डॉ. दादासाहेब जगताप यांनी मंगळवारी प्रवाशांना घडलेला भिजत प्रवासाचा अनुभव 'सीविक मिरर' च्या व्यासपीठावर मांडला. मूळचे सासवड येथील असलेले डॉ. जगताप म्हणाले, 'मी कामानिमित्त पुण्यात आलो होतो. स्वारगेट ते धायरी या बसमधून सायंकाळी पाचच्या सुमारास प्रवास करत होतो.       

त्या वेळी पाऊसही पडत होता. बस जुनी वाटत होती. ड्रायव्हरच्या मागील बाजूला टपावरून पडणारी पावसाची धार थेट आत येत होती. पाणी येऊ शकते म्हणून तात्पुरती डागडुजी केल्याचेही दिसत होते. मात्र, पावसाने तात्पुरत्या मलमपट्टीला दाद दिली नाही. हे पाणी अंगावर पडू नये म्हणून एका महिलेने बसमध्येच छत्री उघडली होती.'

'मी नेहमी पीएमपी बसने प्रवास करतो. बसची स्थिती फारशी चांगली नसते. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर नादुरुस्त बस आल्यास प्रवाशांचे काय हाल होत असतील, याची कल्पना अधिकाऱ्यांना येणार नाही. मंगळवारी आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक आधीच संथ होती. सिग्नल बंद पडले होते. त्यामुळे बस उशिराने येत होत्या. मला तासाभराने बस मिळाली. ती बसही गळकी होती', असे डॉ. जगताप म्हणाले.

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सेंथिल अय्यर म्हणाले, 'बस रस्त्यावर सोडण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याबाबत आम्ही नुकतीच पंधरा बाबींची चेकलिस्ट पीएमपीला दिली आहे. गळकी बस रस्त्यावर सोडणे म्हणजे प्रवाशांशी केलेली थट्टाच आहे. बसची देखभाल-दुरुस्तीही केली जात नाही. केवळ नवनवीन योजनांवर अधिक खर्च कसा होईल यावर लक्ष दिले जाते. स्मार्ट बसस्टॉप त्यातील असाच एक प्रकारचा खर्च आहे. कारण या बसस्टॉपची अवस्था पुणेकर पाहात आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील केवळ जुन्या बसच नव्हे, तर पाच-सहा वर्षांचा कालावधी लोटलेल्या नवीन बसही रस्त्यातच मान टाकत आहेत. देखभाल-दुरुस्तीची कामे व्यवस्थित होत नसल्यानेच ही स्थिती उद्भवत आहे. प्रादेशिक परिवहन विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत अशा बसला फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) देतो आहे.'  

पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे म्हणाले, 'पावसाळ्यात बस रस्त्यावर सोडताना वायपर व्यवस्थित चालत आहे की नाही, बसच्या काचा व्यवस्थित बसता ना, बस गळण्याची शक्यता नाही ना आणि बसचे फ्लोअर निसरडे नसावे या बाबी किमान तपासणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार सांगूनही या गोष्टी चेक केल्या जात नाहीत.'

रस्त्यात अचानक मान टाकणाऱ्या बसमुळे पीएमपीला कायमच टीकेचा धनी व्हावे लागते. दस मे बस या एसी बस विना एसी चालवण्याची वेळ पीएमपीवर आली आहे. मे महिन्यात पीएमपीच्या १६५५ बस दररोज रस्त्यावर धावत होत्या. त्यातील ६१ बस दररोज बंद पडत होत्या. यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागले होते. एका बसमधून उतरून दुसऱ्या बसमध्ये चढणे. रस्त्यावर बस बंद पडल्याने वाहतुकीला होणारा अडथळा अशा समस्यांनाही प्रवाशांबरोबरच इतरांनाही सामोरे जावे लागत आहे. आता पावसाळ्यात गळकी बस रस्त्यावर आल्याने भिजत जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story