'टच'च्या समुपदेशनाने उघड झाला सामुहिक बलात्कार

आपण सहाव्या इयत्तेत असताना २०१९ मध्ये तिघांनी आपणावर सामूहिक बलात्कार केल्याची वाच्यता एका १६ वर्षीय मुलीने केली आहे. कोढव्यातील एका शाळेमध्ये समुपदेशन सुरू असताना या भयानक घटनेची वाच्यता तिने केली. या घटनेचा तपशील सांगताना पीडित मुलगी म्हणाली की, त्यांनी आपणाला घरात ओढून नेले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Archana More
  • Sat, 3 Jun 2023
  • 12:22 am
टच्या समुपदेशनाने उघड झाला सामुहिक बलात्कार

टच्या समुपदेशनाने उघड झाला सामुहिक बलात्कार

बाहेर कळू नये यासाठी संगीताचा आवाज वाढवून चार वर्षापूर्वी तिघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकास अटक

अर्चना मोरे

feedback@civicmirror.in

आपण सहाव्या इयत्तेत असताना २०१९ मध्ये तिघांनी आपणावर सामूहिक बलात्कार केल्याची वाच्यता एका १६ वर्षीय मुलीने केली आहे. कोढव्यातील एका शाळेमध्ये समुपदेशन सुरू असताना या भयानक घटनेची वाच्यता तिने केली. या घटनेचा तपशील सांगताना पीडित मुलगी म्हणाली की, त्यांनी आपणाला घरात ओढून नेले. याला विरोध करताना ओरडण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये यासाठी संगीताचा आवाज मोठा केला आणि आपणावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने ही घटना कथन केल्यावर शाळेचे प्रिन्सिपल आणि समुपदेशकांनी तातडीने कोंढवा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.    

ही घटना २०१९ मध्ये येवलेवाडी येथे घडली. तेव्हा पीडित मुलगी सहाव्या इयत्तेत होती. तक्रार दाखल केल्यावर कोंढवा पोलिसांनी मुन्ना नदाफ (वय २६) नावाच्या कोंढव्यातील व्यक्तीस अटक केली आहे. मुलीने या घटनेची वाच्यता प्रिन्सिपल यांच्या समोर केल्यावर त्यांनी मुस्कान या  स्वयंसेवी संस्थेच्या समुपदेशकांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एकत्रितपणे पोलिसांत तक्रार केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तेव्हा शाळेला सुटी लागली होती. एके दिवशी ती घराशेजारी  खेळत होती. यावेळी तिला जवळच्या घराच्या खिडकीतून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. 

यावेळी पडलेली वस्तू उचलून ती देण्यासाठी त्या घरामध्ये गेली. घरामध्ये मुन्ना नदाफ आपल्या दोन मित्रांसमवेत होता. घरात आलेल्या पीडितेला त्याने जबरदस्तीने ओढून आत नेले आणि दरवाजा बंद केला. मुन्नाच्या दोन मित्रांनी तिचे दोन्ही हात गच्च धरून ठेवले आणि मुन्नाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याला विरोध करण्यासाठी जेव्हा तिने जोराने ओरडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये यासाठी त्यांनी संगीताचा आवाज खूप वाढवला. तिघांनी लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुन्नाने तिला घराबाहेर जाण्यास सांगितले. तिघांपैकी एकाने बाहेर कोणी नसल्याचे पाहून तिला बाहेर जाऊ दिले.   

या धक्कादायक घटनेनंतर ही मुलगी आपल्या घरी गेली आणि दार बंद करून घेतले. आरोपींनी या घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबियाना ठार मारण्याची धमकी दिली होती.  या घटनेचा तिला एवढा मोठा मानसिक धक्का बसला होती की तिने या घटनेबद्दल कोणालाही सांगितले नाही. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या ३७६, ३७६-डी, ३७६-बी, ३४२ नुसार तसेच बाल संरक्षक लैंगिक अत्याचार विरोधी कलमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

याविषयी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनावणे ‘सीविक मिरर’शी बोलताना म्हणाले की, या अल्पवयीन मुलीने प्रिन्सिपल यांच्यासमोर घटनेची वाच्यता केल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. ही घटना घडली तेव्हा ही मुलगी १२ वर्षांची होती. या प्रकरणी आम्ही तातडीने एकाला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. समुपदेशक आणि महिला पोलीस पीडित मुलीशी बोलल्या आहेत. आमचा तपास सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story