जे कारंजे गंजले

वाहतूक नियमनाबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी शहरभरात गोलाकार आयलँड उभारण्यात आले आहेत. त्यात बहुतांश ठिकाणी शिल्पांबरोबरच कारंजेही आहेत. तसेच, काही ठिकाणी आकर्षक शिल्प उभारल्याचे दिसून येते. मात्र, देखभाल दुरूस्तीअभावी हे आयलँड शोभा वाढवण्याऐवजी अस्वच्छतेची केंद्रे ठरली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Thu, 29 Jun 2023
  • 08:16 am
जे कारंजे गंजले

जे कारंजे गंजले

देखभाल दुरूस्तीअभावी शहरातील सर्वच कारंजी बंद, ठरलीत डास पैदास केंद्रे

तन्मय ठोंबरे / विशाल शिर्के 

tanmay.thombre@civicmirror.in

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@tanmaytmirror, @vishal_mirror

वाहतूक नियमनाबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडावी, यासाठी शहरभरात गोलाकार आयलँड उभारण्यात आले आहेत. त्यात बहुतांश ठिकाणी शिल्पांबरोबरच कारंजेही आहेत. तसेच, काही ठिकाणी आकर्षक शिल्प उभारल्याचे दिसून येते. मात्र, देखभाल दुरूस्तीअभावी हे आयलँड शोभा वाढवण्याऐवजी अस्वच्छतेची केंद्रे ठरली आहेत. गंभीर बाब म्हणजे, कारंजाची ही ठिकाणे डेंगीची उत्पादन केंद्र होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

शहर गलिच्छ दिसू नये, यासाठी महापालिकेने कचरा कंटेनरमुक्त शहराची संकल्पना राबवली. स्मार्टसिटी अंतर्गत काही रस्ते सुशोभित केले. शहरातील अनेक चौकांमध्ये आयलँड बसवले. तीन हत्ती, शंकराची मूर्ती, कष्टकऱ्याचे शिल्प अशा विविध कलाकृतींनी या आयलँडमध्ये स्थान मिळवले आहे. अशा आयलँडवर अनेक ठिकाणी कारंजेही बसवण्यात आली. मात्र, यातील बहुतांश कारंजे बंद पडली आहेत. देखभाल दुरूस्तीअभावी आयलँडची दुरवस्था झालेली दिसून येते आहे. साचलेले पाणी, कचरा त्यात पडला असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

धनकवडीतील तीन हत्ती चौक असो की शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरासमोरील कारंजे असो अशा सर्वच ठिकाणच्या आयलँडची दुरवस्था झाली आहे. 

साधू वासवानी चौक, लक्ष्मी रस्त्यावरील सतरंजीवाला चौक, क्वार्टरगेट चौक या महापालिका हद्दीतील आयलँडची ‘सीविक मिरर’ने पाहणी केली. तर, पुणे कॅन्टोन्मेंटमधील जे. जे. गार्डनसह परिसरातील आयलँडची दुरवस्थाही कॅमेऱ्यात टिपली आहे. या आयलँडचा उद्देश शहराच्या सौंदर्यात भर पाडणे हा आहे. त्याचबरोबर वाहन चालवणाऱ्याला आणि प्रवास करणाऱ्यासही सुखद अनुभव देण्याच्या स्तुत्य उद्देशाने ही मानवनिर्मित बेटे शहरातील चौकांमध्ये उभारली आहेत. या बेटांमुळे वाहतुकीचे नियमनही होते आणि डोळ्यांना सुखद अनुभवही येतो.

काही ठिकाणी कारंजे बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. धनकवडीतील तीन हत्ती चौकात काही काळ कारंजे सुरू होते. या चौकात सायंकाळी कारंजे पाहत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुले काही क्षण घालवताना दिसत होती. अपवाद वगळता हे कारंजे जवळपास वर्षभर बंदच असते. इतर कारंजाची अवस्थाही वेगळी नाही. एकीकडे पुणे दर्शन घडवण्यासाठी महापालिका झटत आहे. पीएमपीची त्यासाठी खास बससेवा आहे. तर, दुसरीकडे देखभाल-दुरूस्तीअभावी चौकाचौकात अस्वच्छतेचे प्रदर्शन करणारी बेटे उभी राहत आहेत.  

महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे म्हणाले, ‘‘केवळ उद्यानातील कारंजांची जबाबदारी आमच्या विभागाकडे आहे. पाणीटंचाईमुळे उन्हाळ्यात कारंजे बंद होती. उर्वरित वेळी कारंजे चालू असतात. एखाद्या उद्यानाबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा. तिथे तातडीने दुरूस्ती केली जाईल.’’

महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश माळी म्हणाले, ‘‘काही आयलँडची उभारणी कंपनी अथवा बँकांनी केली आहे. त्याची देखभाल, दुरूस्तीदेखील त्यांच्याकडून केली जाते. तसा महापालिकेने त्यांच्याबरोबर करार केला आहे. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरासमोरील कारंजे एका बँकेने बनवले आहे. त्यांनी अद्याप कारंजे आमच्याकडे हस्तांतरित केलेले नाही. याबाबत माहिती घेऊन दुरूस्ती केली जाईल. नागरिकांनीही आपल्या भागातील नादुरूस्त कारंजांची माहिती आम्हाला द्यावी. त्यांची तातडीने दुरूस्ती केली जाईल.’’

‘‘ज्या ठिकाणी पाणी साचेल तेथे डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असतोच. माहापालिका दीर्घकालीन योजना म्हणून शहर सौंदर्याकडे पाहत नाही. केवळ जी-२० सारख्या परिषदा, परदेशी पाहुण्यांचा पुणे दौरा अथवा कोणत्या स्वच्छता स्पर्धेत सहभागी व्हायचे असल्यास तात्पुरती मलमपट्टी केली जाते. शहरातील आयलँड तर सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांनी दिलेल्या निधीतून उभारण्यात आली आहेत. मात्र, त्याच्या देखभालीची व्यवस्था कशी करावी, याचा विचार महापालिकेने केलेला दिसत नाही. शहर सौंदर्यासाठी केवळ कॉस्मेटिक उपचार केले जात आहेत. लाली-पावडर लावणे म्हणजे शहर सुशोभित करणे नव्हे. या मानसिकतेमुळे आयलँडची आणि शहराची दुरवस्था झाली आहे,’’ असा आरोप जनआरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story