फायनान्सरचा ससेिमरा चुकला; पण एकजण प्राणास मुकला
नितीन गांगर्डे
चारचाकी गाडीला बनावट नंबर प्लेट लावून बेदरकारपणे जाणाऱ्या गाडीने एका व्यक्तीस जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये श्रीधर धर्मा कदम (वय ३३, रा. सिद्रानमळा, रामदरा रोड, लोणी गाव, ता. हवेली) यांना मार लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. फायनान्स कंपनीचा ससेमिरा आणि गाडीवरील दंड चुकवण्यासाठी चालकाने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अमोल मुंढे यांनी फिर्याद दिली होती. आरोपीवर भारतीय दंड विधान आणि मोटर वाहन कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. आदिल सिराज मलाणी (वय २३, रा. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रविवारी (४ जून) संध्याकाळी चार वाजता आरोपी आदिल हा वेगाने गाडी चालवत होता. तो वडकी रस्त्यावरील फुरसुंगी फाटा येथील दिवांग पार्क येथून जात असताना त्याने बेजबाबदारपणे वाहन चालवत श्रीधर धर्मा कदम या व्यक्तीला जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातामध्ये कदम यांना गंभीर मार लागला. मात्र आरोपीने धडक दिल्यावर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच ते घटनास्थळी हजर झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल मलाणीने अपघातादरम्यान कारचा रजिस्टर नंबर लावलेला नव्हता. तो न लावता जाणीवपूर्वक चुकीचा नंबर टाकून तो कार फिरवत होता. फायनान्स कंपनीचा ससेमिरा आणि गाडीवरील दंड चुकवण्यासाठी त्याने हा प्रकार केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बेफामपणे गाडी चालवल्याने तो कदम यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. कदम हे फुरसुंगी येथील वडकी रोडवरील दिवांग पार्क फाटा येथे एका रिक्षातून खाली उतरले होते. ते चालत असताना त्यांच्या पाठीमागून आदिल मलाणीने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अपघाताची चौकशी केली तेव्हा आदिल हा बनावट नंबर प्लेट लावून कार चालवत असल्याचे आढळून आले. आरोपीवर मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी जात प्रत्यक्षदर्शीकडे चौकशी केली. गाडीचा नंबर आणि आरोपीचे नाव याची माहिती घेऊन त्याचा शोध घेतला. यावेळी आरोपी गाडीसह त्याच्या घरी आढळला. फायनान्स कंपनीचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने बनावट नंबर प्लेट लावत गाडीचा वापर करत असल्याचे चौकशीनंतर उघड झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे पुढील तपास करत आहेत.