नाला बांधिला असा की, सफाई जमेिचना
निखिल घोरपडे
वारजे माळवाडी येथील पॉप्युलरनगर येथील नाल्याची सदोष रचना केल्याने येथील रहिवाशांना वर्षानुवर्षे दुर्गंधी आणि डासांच्या असह्य त्रासास सामोरे जावे लागत आहे. पुणे-बंगळुरू महामार्गाखालून जाणार्या नाल्यात जेसीबी मशिनने गाळ साफ करण्यासाठी जागा राहिलेली नसल्याने कचरा, राडारोडा साफ करणे अशक्य बनले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले नसल्याने पुलाच्या खालून हा नाला वळवला आहे. या सदोष रचनेमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पावसाळा सुरू झाल्याने माळवाडी परिसरातील काही प्रमुख नाल्यांची जेसीबी मशिनच्या साहाय्याने स्वच्छता करण्यात आली आहे. मात्र या भागातील नाले गाळ आणि कचऱ्याने तुंबलेले असल्याने पूरसदृश परिस्थितीला लोकांना सामोरे जावे लागत आहे. नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने पुराचे पाणी दरवर्षी वारजे चौकापर्यंत वाहात येते. रहिवासी आणि व्यावसायिकांना पुराचा जबर फटका बसत आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पुणे महानगरपालिका या समस्येवर उत्तर काढण्यात अपयशी ठरली आहे.
‘सीविक मिरर’शी बोलताना येथील नागरिक सनी वांजळे म्हणाले की, “पॉप्युलरनगरमधील नाला दरवर्षी तुंबतो. पाणी रस्त्यावर येते. पुलाखालून नाले बांधताना भविष्यातील स्थिती विचारात घेतलेली नाही. गाळ रस्त्यावर येऊ नये यासाठी तोंडावर जाळी बसवणे आवश्यक आहे, पण महापालिकेचे हुशार अभियंते ही महत्त्वाची बाब विसरलेले दिसतात.
पॉप्युलरनगरच्या शैलजा घोडके म्हणाल्या की, आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात पालिका नाल्यातील गाळ आणि रस्त्यावरील अडथळे दूर करू शकत नाही. नाले सफाईसाठी प्रशासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जात असताना, नागरिकांना अजूनही पुराचा सामना करावा लागत आहे.
शेजारी असलेल्या सलूनचे मालक आनंद कोर्हाळकर म्हणाले की, "माझे सलून नाल्याजवळ एका व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यावर आहे. गेल्या वर्षी मुसळधार पाऊस झाला तेव्हा माझ्या दुकानात पाणी शिरले. नाला ओव्हरफ्लो होतो तेव्हा असह्य दुर्गंधी पसरते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.