Open gym : शहरातील ‘ओपन जिम’ ची प्रकृती खालावली

नागरिकांचे आरोग्य सुधारावे आणि व्यायामासाठी विनामूल्य साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने शहरात विविध ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आल्या आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणच्या ओपन जिमचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोथरूड परिसरातील जिममधील जवळपास सर्व साहित्याची मोडतोड झाली असून, पर्वती आणि तळजाईवरील काही साहित्य देखभाल दुरुस्ती नसल्याने निरूपयोगी झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Mon, 8 May 2023
  • 01:07 am
शहरातील ‘ओपन जिम’ ची प्रकृती खालावली

शहरातील ‘ओपन जिम’ ची प्रकृती खालावली

देखभालीची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने व्यायाम साहित्य आले मोडकळीस

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

नागरिकांचे आरोग्य सुधारावे आणि व्यायामासाठी विनामूल्य साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने शहरात विविध ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आल्या आहेत. मात्र, बऱ्याच ठिकाणच्या ओपन जिमचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोथरूड परिसरातील जिममधील जवळपास सर्व साहित्याची मोडतोड झाली असून, पर्वती आणि तळजाईवरील काही साहित्य देखभाल दुरुस्ती नसल्याने निरूपयोगी झाले आहे.

शहरातील विविध ठिकाणी नगरसेवकांच्या प्रयत्नातून ओपन जिम उभारण्यात आल्या आहेत. मोकळ्या जागा, मैदाने, बागा, टेकड्या, पदपथ अशा विविध ठिकाणी या जिम दिसून येतात. एअर वॉकर, फन रोवर, पॅरलेल बार, व्हिल एक्सरसाईज, बायसिकल, बॅक एक्स्टेंशन, सिंगल आणि डबल सिटेड चेस्ट प्रेस असे विविध प्रकारचे व्यायाम साहित्य बसवले आहे. यामुळे नागरिकांची सोय झाली असली तरी याची देखभाल, दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणची यंत्रणा तर पूर्ण मोडकळीस आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून करण्यात येणारे काम कोणी केले याची माहिती देणारी पाटी कामाच्या ठिकाणी लावली जाते. मात्र, ओपन जिमबाबत या नियमाचे पालन केले जात नाही. कोथरूडमधील परमहंसनगर येथील जिम मैदानावर स्थानिक नगरसेवकांच्या प्रयत्नातून ओपन जिम उभारण्यात आली. एअर वॉकर, चेस्टप्रेससह अनेक साहित्य मोडून पडले आहे.

तळजाई, पर्वती येथील व्हिलसह काही साहित्यांचीही दुरवस्था पाहायला मिळत आहे. तसेच, अनेक साहित्यांचे ऑईलिंग केले जात नाही. त्यामुळे त्यातून घर्षणाचा आवाज येतो. तसेच, यंत्र चालवणे जड जाते. यामुळे नागरिकांना फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याचाच धोका अधिक आहे. या साहित्यावर नेमका व्यायाम कसा करावा, याची माहिती देणारे ठळक अक्षरातील फलकही कोठे दिसत नाहीत. योग्य पद्धतीने यंत्राचा वापर न झाल्यास त्याचा फायदा होणार नाही. उलट चुकीच्या पद्धतीने यंत्र हाताळल्याने वापरणाऱ्यास दुखापत होऊ शकते. चुकीच्या हाताळणीने यंत्रही लवकर खराब होण्याची शक्यता आहे.  

कोथरूडमधील शिवतीर्थनगर येथील रहिवासी जयश्री डिंबळे म्हणाल्या, मी नेहमी चालण्यासाठी  जित मैदानावर जाते. येथील जिमचे साहित्य मोडून पडले आहे. त्याची देखभाल, दुरुस्ती करण्यात आली नाही. काही साहित्य सुस्थितीत दिसतात. मात्र, त्याचा वापर करायला गेल्यावर त्यातून आवाज येतो. एकदा बसवल्यानंतर त्याची देखभालच केली गेली नाही. देखभाल, दुरुस्तीअभावी जिमचे साहित्य भंगार म्हणून पडले आहे. त्यामुळे असे साहित्य कोणीही उचलून नेण्याचा धोका आहे. केवळ दुर्लक्षामुळे महापालिकेने केलेला खर्च वाया गेला आहे.

बिबवेवाडी येथील रहिवासी आणि महापालिकेतील माजी कंत्राटदार घनःश्याम मारणे म्हणाले, महापालिकेकडून सार्वजनिक हिताची अनेक कामे केली जातात. प्रत्येक कामाच्या ठिकाणी कोणी काम केले आणि किती खर्च झाला याची माहिती देणारी पाटी लावली जाते. ओपन जिमबाबत मात्र त्याची अंमलबजावणी केलेली दिसत नाही. एखादे काम दिल्यानंतर काही कालावधीपर्यंत त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. मात्र, ओपन जिमबाबत या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक नगरसेवक रस्ता, बाकडी बसवणे अशा विविध कामांचे श्रेयफलक संकल्पना या नावाने लावतात. मग, त्यांनी आपणच केलेल्या कामाची देखभाल होत नसेल तर त्याचीही जबाबदारी घेतली पाहिजे.

पर्वती आणि तळजाई येथे नियमित फिरायला जाणारे नागरिक सचिन शिंगवी म्हणाले, पर्वती आणि तळजाईवरील जलतरण तलावाच्या आवारात उभारलेल्या ओपन जिममधील काही साहित्य खराब झाले आहे. या साहित्याची देखभाल, दुरुस्ती होताना दिसत नाही. ओपन जिमची कल्पना चांगली आहे. मात्र, यंत्रांची देखभाल नियमित झाली पाहिजे. संबंधित कंत्राटदारावर देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी टाकली पाहिजे. तसेच, देखभाल, दुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदाराला महापालिकेने काळ्या यादीत टाकायला हवे. ओपन जिममधील साहित्य नेमके वापरायचे कसे याची माहिती नसते. त्याची माहिती व्हावी यासाठी ठळक अक्षरातील फलक तिथे हवेत. कंत्राटदाराने काही काळ साहित्य वापराचे प्रशिक्षणही दिले पाहिजे. 

तळजाईवरील जलतरण संकुलाच्या आवारातील ओपन जिममध्ये नियमित जाणारे धनकवडीतील रहिवासी नितीन कांबळे म्हणाले, येथील साहित्यांना बरेच दिवस ऑइलिंग केलेले दिसत नाही. सायकलिंग, व्हिलच्या बेअरिंग खराब झाल्या आहेत. त्यामुळे हे साहित्य उपयोगाचे नाही. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती आणि ऑइलिंग करायला हवे.

सीविक मिररच्या प्रतिनिधीने याबाबत उद्यान विभागातील कनिष्ठ अभियंता योगेश भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, उद्यान वगळता आम्ही इतर ठिकाणी एकही ओपन जिम उभारलेली नाही. शहरात २१० ते २१५ उद्याने आहेत. यातील ७० ते ७५ टक्के उद्यानांत जिम साहित्य बसवलेले आहे. त्यासाठी आमदार अथवा खासदार निधीचाही वापर झाला आहे. जिमचे साहित्य बसवताना आम्ही संबंधित कंत्राटदारावर एक वर्ष देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी देतो. त्यानंतर आम्ही त्या साहित्याची देखभाल दुरुस्ती करतो.  

महापालिकेचे क्रीडा अधिकारी प्रदीप महाडिक यांच्याशी फोन आणि एसएमएसद्वारे संपर्क साधला. त्यांनी एसएमएसला प्रतिसाद दिला. मात्र, त्यांनी या प्रश्नावर थेट भाष्य करणे टाळले.   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story