दहशत माजवू पाहणाऱ्याची पोलिसांकडून धिंड

आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आपली दहशत राहावी म्हणून महाविद्यालयाच्या परिसरात कोयता नाचविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. महाविद्यालयात ज्या ठिकाणी कोयता काढला तेथून डेक्कन परिसरात पोलिसांनी या तरुणाची धिंड काढून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मानसिकतेला इशारा दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 7 Jul 2023
  • 09:45 am
दहशत माजवू पाहणाऱ्याची पोलिसांकडून धिंड

दहशत माजवू पाहणाऱ्याची पोलिसांकडून धिंड

आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील प्रकार; जेथे कोयता काढला, तेथूनच काढली धिंड

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आपली दहशत राहावी म्हणून महाविद्यालयाच्या परिसरात कोयता नाचविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. महाविद्यालयात ज्या ठिकाणी कोयता काढला तेथून डेक्कन परिसरात पोलिसांनी या तरुणाची धिंड काढून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मानसिकतेला इशारा दिला.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आपली दहशत राहावी म्हणून एकाने थेट कोयता काढून दहशत माजवली. कुणाल कानगुडे (वय १९) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ महाविद्यालयामधील सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीला अटक केली. त्याने जेथे कोयता काढला होता तेथूनच त्याची डेक्कन परिसरात धिंड काढली. अशी कृत्य करण्याचे धाडस होऊ नये, त्यांना चाप बसावा म्हणून कोयता काढणाऱ्या तरुणाची धिंड काढल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कुणालचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डॅनी या तरुणाशी काही वाद झाला होता. त्यानंतर महाविद्यालयात आपली दहशत राहावी म्हणून त्याने परिसरात कोयता काढून इतरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले होते.

शहरातील अनेक भागांमध्ये कोयता गँग दहशत माजवत असल्याच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात वारंवार धारदार कोयत्याने हल्ले, तोडफोड अशा घटना मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यांना चाप लावण्यासाठी आता पोलीसही अधिक कर्तव्यतत्पर असल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर कर्तव्यात कसूर केली म्हणून काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घटना ताजी असतानाच ज्या महाविद्यालयात कोयता काढून दहशत माजविणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे. या प्रकरणी दहशत माजवणारे आणि दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेला डॅनी गँगचा मुख्य आरोपी ओंकार ननवरे ऊर्फ डॅनी याच्यासह त्याच्या आठ साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातून असे प्रकार करणाऱ्यांना पोलिसांनी एक प्रकारे इशाराच दिला आहे. पुणेकरांकडून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे.

कर्वेनगर परिसरात कुणाल कानगुडे आणि ओंकार ननवरे ऊर्फ डॅनी या दोन तरुणांमध्ये वादावादी झाली होती. त्यानंतर कुणालने थेट महाविद्यालय परिसरात कोयता दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हीडीओ समाजमाध्यमात प्रसारित झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कुणाल कानगुडेला अटक केली आणि त्याच महाविद्यालयातून त्याची धिंड काढण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत डॅनीने आपली टोळी सक्रिय केल्याची माहिती मिळाली. दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला पोलिसांनी बुधवारी (दि. ५) मध्यरात्रीनंतर सव्वा वाजताच्या सुमारात मुठा नदीपात्रात अटक केली. डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही कारवाई केली.

ओंकार ऊर्फ डॅनी बाळू ननावरे, गौतम ऊर्फ लखन अंबादास बनसोडे (राजेंद्रनगर), राम विलास लोखंडे (नवी पेठ), सुनील बाबासाहेब कांबळे, रोहन गायकवाड, रोहित कांबळे, (शिवाजीनगर), अश्रू खंडू गवळी (दांडेकर पूल), किरण सिताप्पा खेत्री (कात्रज), शाम विलास लोखंडे (नवी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी डॅनीवर मागील वर्षी विश्रामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

अटक केलेल्या आरोपींची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक धारदार लोखंडी कोयता, एक स्टीलचा रॉड, दोन चाकू, नऊ मास्क, एक मिरचीची पूड, नायलॉनची रस्सी अशा वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, जंगली महाराज रस्त्यावरील साई पेट्रोल पंप येथे हत्यारासह जाऊन लूटमार करणार होतो, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story