सदस्यत्व कार्ड काढा, मगच आजारी पडा

शहरी गरीब योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी गरिबांना आजारी पडण्यापूर्वीच सदस्यत्व कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी कार्ड नसल्यास संबंधित व्यक्तीला आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vishal Shirke
  • Sat, 17 Jun 2023
  • 11:49 pm
सदस्यत्व कार्ड काढा, मगच आजारी पडा

सदस्यत्व कार्ड काढा, मगच आजारी पडा

'शहरी गरीब' योजनेच्या नियमावलीत पालिकेने केला बदल; दरवर्षी एप्रिल महिन्यात सभासदत्वाचे करावे लागणार नूतनीकरण

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

शहरी गरीब योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळवण्यासाठी गरिबांना आजारी पडण्यापूर्वीच सदस्यत्व कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी कार्ड नसल्यास संबंधित व्यक्तीला आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. महापालिकेने २०२३-२४ पासून नियमांत बदल करण्याचा निर्णय शुक्रवारी (१६ जून) जाहीर केल्याने ही स्थिती निर्माण होणार आहे.

महापालिकेच्या वतीने पिवळे रेशन कार्ड आणि एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी रेशन कार्डधारकांना शहरी गरीब योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत सहभागी असलेल्या व्यक्तीला सर्व रुग्णालयांतून वैद्यकीय उपचार मिळवता येतात. एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत मिळते, तर किडनी, हृदयरोग व कर्करोगांसारख्या आजारांवर उपचारासाठी २ लाख रुपयांपर्यंत मदत मिळते. अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना या योजनेचा खूपच फायदा होत आहे.

शहरी गरीब योजना राबवताना पारदर्शकता येण्यासाठी गेल्या वर्षीपासून संगणक प्रणाली राबवण्यात येत आहे. बरेचसे रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या योजनेचे कार्ड काढून घेतात. त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यापासून योजनेचा लाभ मिळण्याची मागणी करतात. त्यामुळे २०२३-२४ च्या आर्थिक वर्षापासून प्रत्येकाला आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर या योजनेसाठी सदस्यत्व घ्यावे लागेल. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा बदल करण्यात येत असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे. त्यामुळे आता रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शहरी गरीब योजनेचे सभासद कार्ड काढून आर्थिक सवलत घेता येणार नाही.

रुग्णालयात हमीपत्र देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. हमीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात येणार आहे. रुग्णालयात भरती होण्यापूर्वी 'शहरी गरीब' चे सभासद कार्ड असेल तरच वैद्यकीय उपचारांची बिले महापालिका देईल, असे पत्रक महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी काढले आहे. याचाच अर्थ शहरी गरीब योजनेचा लाभ हवा असेल तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर दरवर्षी एप्रिल महिन्यात सभासदत्व नूतनीकरण करावे लागणार आहे.  

जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे म्हणाले, आधीच शहरी गरीब योजनेचा फारसा प्रचार झालेला नाही. एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर अनेकांना रुग्णालयातून त्याची माहिती मिळते. सामान्यतः एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतरच शहरी गरीब योजनेचे सभासदत्व घेतले जाते. आजारी पडण्यापूर्वीच शहरी गरीबचे कार्ड काढण्यास लावणे म्हणजे गरिबांना वैद्यकीय मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. कमीत कमी लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे महापालिका प्रशासनाला वाटत असेल. उलट महापालिकेने शहरी गरीबचे कार्ड सहज मिळावे यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात सक्षम प्रणाली उभारली पाहिजे. आजही अनेकांना शहरी गरीबसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीत खेटे मारावे लागतात. हमीपत्र नेमके कसे असेल. ऑनलाईन कसे भरावे याबाबतही परिपत्रकात संदिग्धता दिसून येते. महापालिकेने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच, आजारी पडण्यापूर्वी शहरी गरीबचे सभासदत्व घेण्याची अट रद्द करावी.

शहरी गरीब योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे...

झोपडपट्टीत राहात असल्यास झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाची चालू वर्षाची सेवा शुल्क भरलेली पावती अथवा दारिद्र्यरेषेखालील पिवळे रेशनकार्ड

केशरी रेशन कार्डधारकांना वार्षिक एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला

अपत्यांचे आधारकार्ड (२५ वर्षांखालील)

कुटुंबातील पात्र सभासदांचे आधारकार्ड

नोंदणी शुल्क १०० आणि वार्षिक शुल्क १०० असे २०० रुपये सभासदत्व शुल्क आकारण्यात येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story