फुलराणी ट्रेन
विजय चव्हाण
vijay.chavan@civicmirror.in
TWEET@VijayCmirror
गेल्या पाच वर्षांपासून कात्रज येथील सुप्रसिद्ध ‘फुलराणी’ बंद होती. रुळाखाली असलेल्या लाकडी स्लीपरला वाळवी लागल्याचे धक्कादायक वास्तव गेल्या आठवड्यात समोर आले होते. 'सीविक मिरर'ने त्या संदर्भात १५ जानेवारीला वृत्त प्रकाशित केले होते. याची तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाने फुलराणीच्या कामांसाठी व्हेईकल डेपो विभागाला सूचना केली. याबाबत स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर मंगळवारी (ता. २४) राजकीय अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली फुलराणी सुरू झाली. येत्या प्रजासत्ताकदिनापासून अधिकृत्ररीत्या बालगोपाळांसाठी फुलराणी पुन्हा सुरू होईल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज येथील आजी-आजोबा उद्यानात फुलराणी सुरू केली होती. यासाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. एकाचवेळी ७२ पर्यटकांना फुलराणीतून फिरण्याचा आनंद घेता येत होता. फुलराणी सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी तब्बल २९ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न महापालिकेला मिळाले होते. महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली. त्यानुसार मोरे यांचा प्रभाग बदलला गेला. त्यानंतर कात्रज उद्यानातील बालगोपाळांचे आकर्षण असलेल्या फुलराणीकडे दुर्लक्ष झाले. फुलराणीच्या रुळांची दुरवस्था झाली. त्यामुळे अखेर फुलराणी बंद पडली. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलनेही करण्यात आली.
याबाबत उद्यान विभागाचे अधिकारी अशोक घोरपडे म्हणाले, "फुलराणीच्या कामांसाठी व्हेईकल डेपो विभागाने तातडीने काम सुरू केले. तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून रुळाचे कामही मार्गी लागले आहे. फुलराणीची चाचणीही झाली असून, ती २६ जानेवारीला रुळावर असेल."
दरम्यान, राजकीय अनास्थेमुळे कात्रज उद्यानातील तिरंगा फडकावणेही बंद करण्यात आले. उद्यानातील कारंजेही सुरू करण्यासंदर्भात सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, तसेच तेथील तलावात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, संगीत कारंजे, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा पाटलांचा वाडा, शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राची ओळख करून देणारे आगळे ग्रंथसंग्रहालय ही विविध आकर्षणे ठरत असतानाच फुलराणी बालगोपाळांच्या आकर्षणाचा नवा केंद्रबिंदू ठरली होती.
कात्रज तलावाशेजारी असलेल्या चार एकर जागेवरील फुलराणी सिंगापूरच्या धर्तीवर बनवण्यात आली होती. फुलराणीमध्ये अद्ययावत साउंड सीस्टिम तसेच इतर आकर्षक सुविधाही आहेत. फुलराणीतून प्रवास करताना पर्यटकांना कात्रज तलाव, त्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, बायोगॅस प्रकल्प आदींची माहिती दिली जात होती. या सर्व बाबी नव्याने पाहायला मिळणार आहेत.