राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
अंकित शुक्ला
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मे महिन्यात विशेष मोहीम राबवून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली असून ३३४ दारू विक्री आणि निर्मिती होणाऱ्या ठिकाणांवर छापे मारले आहेत.
पुणे जिल्ह्यात १ ते ३१ मे २०२३ पर्यंत विविध ठिकाणांहून बाजारात येणाऱ्या अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्या ठिकाणांवर कारवाईसाठी १२ विभागात एकूण १०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महिनाभर चाललेल्या या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण विभागात अवैध दारूशी संबंधित एकूण ३३४ प्रकरणे नोंदवून बेकायदेशीर मद्यविक्रीचे धंदे मोडून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मात्र, अवैध दारू विक्री आणि निर्मितीची दुकाने कायमची बंद झाल्यावरही १६ चौरस किलोमीटरचे भौगोलिक क्षेत्र असलेल्या पुणे जिल्ह्यात अवैध दारूचा होणारा व्यवसाय हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे.
तथापि, राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरीनेच पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना अटक करण्याचा सपाटा लावल्याने मे महिन्यात मोठ्या प्रामाणात कारवाई झाल्याचे दिसून आले आहे. राज्याला मद्यविक्रीमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला महसूल वाढीबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे याचाच एक भाग म्हणून २८ एप्रिल रोजी राज्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षकांची बैठक मुंबईत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली होती. त्यानंतर पुणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी विशेष मोहिमेसाठी १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकांची नेमणूक करीत कारवाई केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडील नोंदीनुसार, २०२३ मध्ये एकूण ३३४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये दुचाकी आणि चारचाकी ४६ वाहने जप्त करण्यात आली आहेत, तर ३०७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवैध दारू आणि जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत तब्बल एक कोटी ३ लाख ४ हजार ०६८ रुपये एवढी आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागातील येरवडा, कासेवाडी, सिंदवणे, कासुर्डी, खामगाव फाटा, बोरींदी, सिरगाव, डोंगरगाव, शिक्रापूर, नांदूर, टोपी भाट, सहजपूर, बावीस नंबर फाटा, पांढरस्थळ, लोणी काळभोर, उरुळी कांचन, सस्ते वस्ती, हवालदार वस्ती, तर पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील भाटनगर, मरकळ, आंबी, मोई, चिंबळी, कोयाळी, सदुंब्रे, चांदे आदी ठिकाणी बेकायदा दारूचे उत्पादन आणि विक्रीचे मुख्य क्षेत्र असल्याचे आढळून आले आहे.
जिल्ह्यातील अवैध दारूचे उत्पादन आणि वितरण बंद करणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे. उत्पादक, वितरक व्यक्तींच्या सहभागावर कारवाई करण्यासाठी आम्ही गाव पातळीवरील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. विशेष मोहिमेबरोबरीनेच कारवाईत सातत्य राहण्यासाठी आम्ही कृती आराखडा तयार केला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले.
जप्त करण्यात आलेली अवैध दारू
रसायन १ लाख ७० हजार ९१० लीटर, ताडी- १,७१८ लीटर, विदेशी १,०२२ लीटर, अवैध दारू- २५,०४६ लीटर, बिअर- १९६.८९ लीटर, अन्य बाटल्या – १,२३०.