जलपर्णीवर ड्रोनद्वारे होणार औषध फवारणी
प्रिन्स चौधरी
नदी, तलावात सातत्याने वाढणारी जलपर्णी ही नागरिक आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. जलपर्णी वाढल्याने डासांची उत्पत्तीही वाढत असून, त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. जलपर्णीमुळे खोल पाण्यात उतरणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शक्य होत नसल्याने आता औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुरुवातीला प्रायोगित तत्त्वावर ही फवारणी केली जाणार असून, हा प्रयोग यशस्वी पुढील काळात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, अशा प्रकारे रसायनांची फवारणी करणे हे इतर जलचरांसाठी आणि वनस्पतींसाठी घातक ठरेल, असे मत व्यक्त करून पर्यावरणवाद्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
मुळा-मुठा नदीमध्ये मिळणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्यातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तसेच कात्रज, पाषाण यासह इतर ठिकाणच्या तलावांमध्येही परिसरातील सांडपाणी मिसळत असल्याने तेथेही जलपर्णीचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. मात्र, जलपर्णीत अडकण्याची भीती असल्याने मनुष्याला नदी व तलावात खोलवर उतरून पाण्यात औषध टाकता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी ड्रोनद्वारे औषध फवारणी केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही पद्धत वापरली जाणार असून, यासाठी दोन लाखांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. या पद्धतीमुळे डासांचा प्रतिबंध कमी झाला, तर ती पुढील काळातही राबवण्याबाबत विचार करण्यात येईल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
याबाबत पालिकेचे साहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, "नदीकाठी किंवा तलावाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना पाण्याचा दुर्गंध आणि डासांचा त्रास होत आहे. महापालिकेकडे याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. नदी व तलावातील जलपर्णी काढण्यासाठी दर वर्षी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जातो, तरी तलाव व नदी स्वच्छ होत नाही. ठेकेदाराही जलपर्णी वाहून जाण्याचीच वाट पाहत असतात. मात्र, ठोस प्रतिबंध होऊ शकत नाही. आरोग्य विभागाकडून डासांना प्रतिबंध करण्यासाठी गल्लीबोळात औषध फवारणी केली जाते. नदी व तलावांमध्येही औषध टाकले जाते. मात्र, जलपर्णीमुळे खोल पाण्यात फवारणी करता येत नसल्याने आता त्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे."
देवकर पुढे म्हणाले, "सध्या तरी ड्राेनने फवारणी करण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. सुरुवातीला ७० एकर कात्रज तलावात हा प्रयोग केला जाईल. कीटक नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांना जलपर्णीने झाकलेल्या पाण्याच्या मध्यभागी पोहोचणे अवघड जात असल्याने आम्ही ड्रोनचा वापर करून त्या भागांत फवारणी करणार आहोत. त्यामुळे डासांचा नायनाट होईल आणि त्यांची उत्पत्तीस्थळे नष्ट होतील. ही कामे पर्यावरण विभागाकडूनही केली जात आहेत.”