स्पायडर मशीन अडगळीत, हातानेच नालेसफाई

पिंपरी-चिंचवड येथील फुलेनगर क्षेत्रीय कार्यालय 'ह' आणि पिंपरी कॅम्प क्षेत्रीय कार्यालय 'ग' येथील नालेसफाईचे काम सुरू आहे. त्या कामासाठी आवश्यक स्पायडर मशीन यंत्र उपलब्ध आहेत, मात्र पालिका प्रशासन या स्पायडर मशीन यंत्रांचा वापर न करता कामगारांनाच नाल्यात उतरवून नियमबाह्य पद्धतीने नालेसफाईचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 11 Jun 2023
  • 11:17 pm
स्पायडर मशीन अडगळीत, हातानेच नालेसफाई

स्पायडर मशीन अडगळीत, हातानेच नालेसफाई

कामगारांकरवी नालेसफाई करवून घेत पिंपरी-चिंचवडमधील फुलेनगर, पिंपरी कॅम्प क्षेत्रीय कार्यालयांकडून कायद्याचे उल्लंघन

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

पिंपरी-चिंचवड येथील फुलेनगर क्षेत्रीय कार्यालय 'ह' आणि पिंपरी कॅम्प क्षेत्रीय कार्यालय 'ग'  येथील नालेसफाईचे काम सुरू आहे. त्या कामासाठी आवश्यक स्पायडर मशीन यंत्र उपलब्ध आहेत, मात्र पालिका प्रशासन या स्पायडर मशीन यंत्रांचा वापर न करता कामगारांनाच नाल्यात उतरवून नियमबाह्य पद्धतीने नालेसफाईचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. पालिका प्रशासन या संदर्भातील कायद्याचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे जिल्हा दक्षता समितीचे सदस्य सागर चरण यांनी राष्ट्रीय सफाई कामगार आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत नालेसफाईचे काम करताना त्यात कामगारांना उतरवले जाते. या नाल्यामध्ये सांडपाण्याची घाण साचलेली असते, याची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली असते. त्यामुळे त्यांची सफाई यंत्राने करणे अपेक्षेत आहे आणि तसा कायदाही आहे.  पालिका प्रशासनाकडून या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे सागर चरण यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले आहे. मागील काही दिवसांपूर्वी आयुक्त शेखर सिंह यांनी नालेसफाई करण्यासाठी त्यात कामगारांना उतरवू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांच्याच अधिकाऱ्यांकडून त्यांच्या सूचनांना केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे चरण म्हणाले आहेत.

नाल्यात खूपच दूषित पाणी असते. त्याची दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे आत काम करणाऱ्या कामगाराच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. फुलेनगर वसाहत आणि पिपरी कॅम्प येथील नाल्यांची सफाई कामगारांकरवी केली जात आहे. त्या ठिकाणी नाल्यांची रुंदी मोठी असून त्यात जेसीबी किंवा स्पायडर मशीनचा वापर करण्यास जागेचा किंवा इतर कसलाही अडथळा नाही. तरी देखील सफाईसाठी अजूनही पारंपरिक पद्धतीचा अवलंब सुरू आहे. नाल्यातील गटारात निर्माण झालेल्या विषारी वायूपासून होणारा धोका टाळण्यासाठी आणि श्वसनव्यवस्था व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी प्राणवायूची नळकांडी अथवा कृत्रिम श्वसनव्यवस्था त्या कामगारांकडे उपलब्ध नसते.

जगातील प्रगत देशात अत्याधुनिक तंत्रज्ञांच्या मदतीने बंदिस्त जागा आणि भूमिगत गटारांची साफसफाई, नालेसफाई करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर केला जात आहे. असे असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अजूनही पारंपरिक पद्धतीचा वापर करते, ही दुर्दैवाची बाब आहे. माणसांकरवी नालेसफाई कायद्याने बंद केली असताना असा प्रकार घडणे संतापजनक आहे. पालिकेच्या उदासीनतेमुळे असे प्रकार होत आहेत. यामुळेच सफाई कर्मचाऱ्यांच्या दुर्घटना घडत असतात. २०१७ साली नालेसफाई करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच २०२२ साली दोन कामगारांचे मृत्यू झाले आहेत, तरीही प्रशासन अजूनही कामगारांकरवीच सफाई करत असल्याचे चरण यांनी सांगितले. ही बाब आयुक्तांच्या लक्षात आणून दिली मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नसल्याने आयोगाकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगारांकरवी नाल्याची सफाई केली जात नाही. असा प्रकार होत असल्याचे कुठेही निदर्शनास आले नाही. प्रत्येक ठिकाणी यंत्राने सफाईचे काम केले आहे. ज्या ठिकाणी मशीन उतरूच शकत नाही अशा ठिकाणीच क्वचित कामगारांकडून नालेसफाईचे काम करण्यात आले असेल, त्यासाठीही त्यांना सुरक्षिततेची संसाधने दिली जातात.

- जितेंद्र वाघ, अपर आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story